ॲश: परिजातक, करंबा, ऑलिव्ह इ. वनस्पतींचा समावेश असलेल्या फुलझाडांच्या ओलिएसी कुलात ॲश या इंग्रजी (लॅ. फ्रॅक्सिनस  वंश) नावाने ओळखल्या जाणाऱ्या सर्व वनस्पती (सु. ७० जाती ) येतात व त्यांचा प्रसार मुख्यतः उ. समशीतोष्ण कटिबंधात (पू. आशिया, उ. अमेरिका व भूमध्यसामुद्रिक प्रदेश) असून भारतात सु. ६ जाती आढळतात. हे सर्व पानझडी वृक्ष किंवा क्षुपे (झुडपे) असून त्यांची पाने मोठी, समोरा- समोर, संयुक्त व पिसासारखी विभागलेली असतात. फ्रॅक्सिनस ॲनोमॅला  या जातीच्या पानास फक्त एकच दल परंतु इतर जातींत दले अधिक (५—१३), समोरासमोर, संख्येने विषम व अनेकांत दातेरी संयुक्त पानाची मध्यशीर काही जातींत सपक्ष. फुले लहान, एकलिंगी किंवा द्विलिंगी, एकाच झाडावर किंवा विभक्त, हिरवट किंवा पांढरी असून परिमंजरीवर बहुधा पाने येण्यापूर्वी येतात. काही जातींत पाकळ्या व काहींत संदले  ( फुलाचे सर्वांत बाहेरचे हिरवटसर मंडल, पुष्पकोश ) नसतात. फळे एकबीजी, शुष्क व सपक्ष (आवरणाला पंखासारखा भाग असणारी ). कमीजास्त प्रमाणात सर्वच जाती उत्तम व उपयुक्त लाकडाकरिता प्रसिद्ध आहेत.

यूरोपीय ॲश (फ्रॅ. एक्सेल्सियर ) फक्त भारतात कोठे कोठे लावलेला आढळतो. भारतीय शास्त्रज्ञ ज्याला या नावाने ओळखत तो हूकर ॲश (फ्रॅ. हूकेरी  ) होय हा वायव्य हिमालयात सु. १,२४०—३,१०० मी. उंची- पर्यंत आढळतो. तो २५—२८ मी. उंच असून त्याचा घेर २·५० मी. असतो. याचे लाकूड करडे, तपकिरी, चकचकीत, कठीण, जड व लवचीक असून कोरीव व कातीव कामांस चांगले तोफांच्या गाड्या, वल्ही, नावा, क्रीडासामग्री, सुटसुटीत सजावटी सामान इत्यादींस उपयुक्त. साल कडू, स्तभंक (आकुंचन करणारी ), तापनाशक व पाने विरेचक (तीव्र रेचक) असतात.

फ्रॅ. फ्लोरिबंडा (हिं. अंगन) व फ्रॅ मायक्रँथा (हिं. अंगू) हे वृक्ष अनुक्रमे पू. हिमालयात व खासी टेकड्यांत आणि वायव्य हिमालयात व कुमाऊँत आढळतात. यांचे लाकूड चिवट, मध्यम कठीण व जड असून नांगर, खांब, वल्ही वगैरेंकरिता वापरतात. फ्रॅ. झँथोझायलॉइड्स  हा लहान वृक्ष काश्मीर ते कुमाऊँ या समशीतोष्ण हिमालयी प्रदेशात असून याच्या लाकडापासून शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे व हातातील काठ्या बनवितात जळणाकरिता लाकूड वापरतात व पाला गुरांना चारतात.

फ्रॅ. एक्सेल्सियर  व फ्रॅ. अमेरिकाना (व्हाइट ॲश) यांची उंची ३७ मी. पर्यंत असते. फ्रॅ. नायग्रा (ब्‍लॅक ॲश) २३ मी. उंच, फ्रॅ. पेन्सिल्व्हानिका (रेड ॲश) १९ मी. उंच असून या सर्व परदेशी जातीही लाकडाबद्दल सुप्रसिद्ध आहेत. फ्रॅ. ऑर्नस (हिं. शिर्खिस्त इं. फ्लावरिंग ॲश) व यूरोपीय ॲश शोभेकरिता लावतात.फ्रॅ. ऑर्नस  व फ्रॅ.फ्लोरिबंडा  यांपासून सालीवर चरे पाडून मिळणारा गोड पदार्थ ‘मान्ना’ लहान मुलांना सौम्य सारक म्हणून देतात.

पहा : ॲस्पेन ओलिएसी मान्ना शर्करा.

संदर्भ : 1. Bor, N. L. Mannual of Indian Forest Botany, Bombay, 1953.

          2. Uphof, T. C. The Dictionary of Economic Plants, New York, 1968.

परांडेकर, शं. आ.