जांब, गुलाबी : (हिं. गुलाब जामन गु. गुलाब जांबू सं. जंबू, जंबुराज इं. रोझ ॲपल लॅ. सायझिजियम जांबोस, यूजेनिया जांबोस कुल-मिर्टेसी). हा लहान वृक्ष मूळचा ईस्ट इंडीज, सिक्कीम व भारत येथील असून हल्ली उष्ण कटिबंधातील अनेक देशांत शोभेकरिता व फळांकरिता बऱ्याच प्रमाणावर लावलेला आढळतो. हा सु. ९ मी. उंच, पसरट, सदापर्णी असून पाने, फुले व फळे यांच्या सौंदर्यामुळे बागेत विशेषेकरून लावतात. याची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨जांभूळ, मलाका, जांब, ⇨ पेरू–१. इ. जंबूल कुलातील [⟶ मिर्टेसी] वनस्पतीप्रमाणे आहेत. याचे खोड सरळ व फांद्या साधारणपणे चपट्या किंवा चौकोनी असतात पाने हिरवी गर्द, चिवट, साधारण लांबट आणि टोकदार असतात. याला फेब्रुवारीत मोठी, हिरवट पांढरी किंवा तांबूस, मोहक व सुगंधी फुले अग्रस्थ मंजिऱ्यांवर येतात. फुलांतील असंख्य लांब पांढरी केसरदले अधिक दिखाऊ असतात [⟶ फूल]. फळे सफरचंदासारखी अडीच ते पाच सेंमी. जाड, फिकट पिवळी अगर तांबूस, दिसण्यात मोहक व साधारण अंडाकृती असतात. संवर्त भोवऱ्यासारखा व संदले फळावर शेवटपर्यंत सतत रहातात. मृदु फळांतील मगज (गर) कुरकुरीत, गुलाबाच्या वासाचा व स्वादाचा असतो पण तो कमी गोड असतो यापासून मुरंबा व जेली करतात. फळातील मगज मेंदू आणि यकृतास पौष्टिक असतो त्यात करड्या रंगाच्या एकदोन बिया असतात.

 गुलाबी जांब : (१) फांदीचा भाग, (२) फूल, (३) फळ.

झाडाला वर्षातून तीन-चार वेळा फळे येतात झाडाच्या अर्ध्या बाजूची फळे पिकून पाने गळतात, त्यावेळेस दुसऱ्या अर्ध्या बाजूस पाने व फुले येतात व ही पिकली की, पुन्हा पहिल्या बाजूस पाने फुले येण्याचा क्रम चालू रहातो.

दोंदे, वि. प. चौधरी, रा. मो.