पिनांगा : फुलझाडांपैकी (आवृतबीज, एकदलिकित) ताल कुलातील [→पामी] एका वंशाचे शास्त्रीय नाव. या वंशात सु. ११०–११५ जाती असून आग्नेय आशियात व इंडो-मलायात त्यांचा प्रसार झाला आहे. भारतात सु. पाच ते आठ जाती असून त्यांपैकी काही बागांतून शोभेकरिता लावल्या आहेत. पिनांगा हे मूळचे मलायी नाव आहे. सर्व जाती बारीक, बिनकाटेरी बांबूप्रमाणे, पण तालवृक्ष आहेत. पिनांगा डिक्सोनाय (क. कडु अडिके) हा अधिक सामान्यपणे आढळतो त्याचा प्रसार गिरसप्पा, नीलकुंड घाट (उ. कारवार), मलबारआणि त्रावणकोर येथील डोंगराळ भागात सु. ३०० ते ९०० मी. उंचीवर आहे.

पिनांगा कुहलाय : कुंडीत वाढविलेला लहान वृक्ष.

उत्तर कारवारातील सदापर्णी जंगलात त्याची बेटे आढळतात. जमिनीत सतत वाढत राहणाऱ्या मूलक्षोडापासून (अनेक मुळे धारण करणाऱ्या जाडजूड खोडापासून) जमिनीवर सु. ४–८ मी. उंची व २·५–५ सेंमी. व्यास असलेली अनेक गुळगुळीत, बारीक हिरवी खोडे येतात व त्यांवर मोठी (सु. १·३० मी. लांब) व व्दिशाखी संयुक्त व पिच्छाकृती (पिसासारखी) पाने येतात. दले बिन देठाची, लांबट, अरुंद (३०–६० X २·५ सेंमी.) व असंख्य असतात स्थूलकणिश फुलोरा, संयुक्त असून त्याच्या ४–८ शाखांवर अनेक एकलिंगी फुले येतात. साध्या आणि ताठर महाच्छदाने तो प्रथम वेढलेला असतो. एका स्त्री-पुष्पाजवळ दोन पुं-पुष्पे असून पुं-पुष्पात २०–३० केसरदले असतात. स्त्री-पुष्पात किंजल्क तीन व किंजपुटात एक कप्पा असतो [→ फूल]. मृदुफळ लहान, १·२५–१·८ सेंमी. लांब, लंबगोल (०·८ सेंमी. व्यासाचे) व फलावरण धागेदार असते बी लांबट-दीर्घवृत्ताकृती व लहानअसून पुष्क रेषाभेदित (गर्भाबाहेरील अन्नांश अनेक रेषांनी विभागल्यासारखे) असते. सुपारीऐवजी ही फळे स्थानिक लोक खातात. झाडे बागेत शोभेकरिता लावतात. चीन, जपान व व्हिएटनाम येथे फळांची सुकी साल जलशोफ (द्रवयुक्त सूज), पोटदुखी व पटकी यांसारख्या पोटाच्या काही विकारांवर देतात. खासी टेकड्यांत वाढणाऱ्या पि. हूकरियाना या जातीची फळे खाद्य असतात. जावा व सुमात्रातील पि. कुहलाय  हा सु. ६–९ मी. उंचीचा व शोभादायक वृक्ष बागेत, मोठ्या कुंडीत लावतात. पि. ग्रॅसिलिस  हा सु. २–६ मी. उंच असून हिमालयात व ब्रह्मदेशात आढळतो. त्याची फळे शेंदरी असतात.

पाटील, शा. दा.; परांडेकर, शं. आ.