नागीन : (मोरवा, घणसपात, मुरिया हिं. मुर्वा गु. मुरवेल क. मुरुग सं. मरुर इं. द सीलोन बो-स्ट्रिंग हेंप लॅ. सॅन्सेव्हेरिया झेलॅनिका कुल-लिलिएसी). ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ओषधी मूळची कॉरोमांडल किनाऱ्यावरील असून श्रीलंका, जावा, चीन व उष्ण कटिबंधीय आफ्रिका येथे आढळते. खोड जमिनीत (मूलक्षोड किंवा तिरश्चर) असून त्यापासून जमिनीवर सरळ  उभी, तलवारीसारखी चिवट, फिकट हिरवी, टोकदार, अंतर्गोल, रसाळ व ०·३–०·९मी. लांब व २·५सेंमी. रुंद सु. ८–१५पाने येतात त्यांवर गर्द हिरवे आडवे पट्टे असतात. फुलोऱ्याचा दांडा पानांच्या झुबक्यातून वर येतो व त्यावर हिरवट पांढऱ्या फुलांच्या मंजऱ्या येतात. सॅ. झेलॅनिका प्रकार लॉरेंटी यामध्ये पानांच्या दोन्ही कडांवर ०·६—१·२५ सेंमी. रुंदीचा पिवळट उभा पट्टा असतो. फुलांची संरचना सामान्यपणे ⇨ लिलिएसी कुलात (पलांडू कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. सॅ. सिलिंड्रिका जातीत पाने शूलाकृती (टोकाकडे निमुळती होत गेलेली) व भरीव असतात.

सर्वच जाती बागेत शोभेकरिता लावतात. नागीनच्या पानांपासून फार बळकट, चिवट आणि रेशमासारखा पांढरा वाख मिळतो व तो अननसाच्या वाखासारखा असतो. त्याच्यापासून दोरा, सुतळी, दोरखंड, चटया, मासेमारीची जाळी व धनुष्याच्या प्रत्यंचा (दोऱ्या) इ. वस्तू बनवितात. तो रशियन हेंपपेक्षा अधिक बळकट असून कापड व कागद यांच्या निर्मितीत फार महत्त्वाचा समजतात. त्याचे मूळ रेचक, पौष्टिक व ज्वरनाशक असते. खोकल्यावर मुळाचा रस मधातून देतात. सॅन्सेव्हेरिया वंशाचा अंतर्भाव हल्ली हीमोडोरसी कुलात केलेला आढळतो. (चित्रपत्र ५३).

जमदाडे, ज. वि.

नागीन : (१) सॅन्सेव्हेरिया ट्रायफॅसिअँटा, (२) सॅन्सेव्हेरिया सिलिंड्रिका, (३) सॅन्सेव्हेरिया झेलॅनिका प्रकार लॉरेन्टी.