ओक: (वंजू लॅ. क्वर्कस कुल-फॅगेसी). फुलझाडांपैकी द्विदलिकित वर्गातील एका लहान वंशाचे हे इंग्रजी नाव असून ह्यामध्ये एकूण सु. ४०० जातींचा अंतर्भाव होतो. त्यांचा प्रसार विशेषेकरून उत्तर गोलार्धातील व दक्षिणेस कोलंबिया व मलायापर्यंतच्या उंच प्रदेशातील जंगलांत आहे. भारतात हिमालयी प्रदेश व आसाम ते ब्रह्मदेशापर्यंत ह्या वंशातील सु. ३५ जाती आढळतात. सर्वच जाती वृक्ष किंवा क्षुपे (झुडपे) असून त्या वंजू, मोरू, मारा, बान, बंज, बार्चर, कार्शू इ. स्थानिक नावांनी भारतात ओळखल्या जातात. काही ओक सदापर्णी व काही पानझडी असून मनुष्याला त्यांचा अनेक प्रकारे उपयोग होतो. पाने साधी, एकाआड एक, सोपपर्ण (उपपर्णासह), दातेरी किंवा काहीशी विभागलेली, पतिष्णू (झडणारी) किंवा सतत टिकणारी फुले फार लहान, एकलिंगी व एकच झाडावर पुं-पुष्पे अनेक व लोंबत्या कणिशावर स्त्री-पुष्पे एकएकटी किंवा दोन-तीनच्या झुपक्यात [→ फूल] वंजुफळे [ॲकॉर्न, → फळ] कठीण कवचाची, तळाशी कठीण पेल्याने (छदमंडलाने) वेढलेली, तपकिरी, पिवळी किंवा पिंगट, गोलसर किंवा लंबगोल व एकबीजी असतात इतर सामान्य लक्षणे फॅगेसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे (पहा : आकृती). 

ओक (क्वर्कस लँग्विनोजा) : (१) पुं-फुलोर्‍यासह फांदी, (२) पुं-पुष्प, (३) स्त्री-पुष्प, (४) पक्व फळ

बहुतेक जातींचे लाकूड बळकट, टिकाऊ काहींत कठीण, तर काहींत नरम असून जळण, घर बांधणी, जहाजे, रेल्वेमार्ग, पूल, गिरण्या, पिपे, सजावटी सामान, काठ्या इत्यादींसाठी वापरतात. जगातील उत्तम लाकडांत याची गणना करतात. काही ओक वृक्षांची पूर्ण वाढ पन्नास ते शंभर वर्षांत होते काही थोडे वृक्ष एकूण एक हजार वर्षे जगले, तरी पाचशे वर्षे टिकून राहिलेले अनेक वृक्ष आहेत. ‘पांढरे’ व ‘काळे’ ओक असे दोन प्रकार सामान्यपणे आढळतात. पांढऱ्या प्रकारात साल फिकट व पानांचे खंड गोलसर असून वंजुफळ वर्षभरात पिकते उलट. काळ्या जातीच्या वृक्षांची साल काळसर व पानांचे खंड टोकदार असून फळे पिकण्यास दोन वर्षे लागतात त्यांचे लाकूड पांढऱ्यापेक्षा कमी टिकाऊ व स्वस्त असते.

भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील सदापर्णी ओक वृक्षांच्या (कॉर्क ओक = क्वर्कस स्यूबर) सालींपासून बुचाचे उत्पादन करतात. काही जातींच्या सालींपासून व काहींच्या फळांपासून कातडी कमाविण्याचे द्रव्य (टॅनीन) मिळते. ‘व्हॅलोनिया ओक’ च्या सालीपासून पिवळा रंग काढतात. काहींची (उदा., होम ओक) वंजुफळे माणसे खातात तर काहींची फळे डुकरांना व हरिणांना चारतात. पूर्व आशियातील दोन जातींची पाने रेशमाच्या किड्यांचे खाद्य आहे. कीटकांच्या दंशाने पानांवर गाठी येतात त्यांत भरपूर टॅनीन असल्याने या गाठी व साल ह्यांपासून काळी शाई बनवितात. काही जातींवरच्या शल्क कीटकांपासून (खवले किड्यांपासून) किरमिजी रंग बनवितात. कित्येक जाती (उदा., तुर्की ओक व होम ओक) शोभेकरिता व सावलीकरिता लावतात. बिया व कलमे लावून नवीन लागवड करतात. भारतातील ओक वृक्षांच्या जातींपासून काही महत्त्वाच्या शंकुमंत [→ कॉनिफेरेलीझ] वृक्षांना संरक्षण मिळते, शिवाय इमारती लाकूड व जळण ह्यांकरिताही त्यांचा बराच उपयोग केला जातो. ‘बान’ नावाच्या हिमालयी ओक वृक्षाची फळे (बलूत) मूत्रल (लघवी साफ करणारी) व श्वासहर (दम्यावर गुणकारी) असून परमा व दमा आणि मुलांचे अजीर्ण, जुलाब इत्यादींवर देतात.

पहा : त्वक्षा बूच मायफळ.

परांडेकर, शं. आ.