वोड : (डायर्स वोड लॅ. आयसॅटीस टिंक्टोरिया कुल-क्रुसीफेरी). फुलझाडांपैकी [→वनस्पति, आवृतबीज उपविभाग] वोड ह्या इंग्रजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या आयसॅटीस प्रजातीत एकूण ५० जाती असून त्या वर्षायू (एक वर्षभर जगणाऱ्या ) किंवा द्वि–बहुवर्षायू (दोन किंवा अनेक वर्षे जगणाऱ्या), सरळ शाखायुक्त ⇨ औषधी (लहान व नरम वनस्पती) असून त्या मध्य यूरोप, भूमध्य सामुद्रिक प्रदेश आणि मध्य व पश्चिम आशिया येथे आढळतात. ‘डायर्स वोड’ ही जाती मूळची पश्चिम तिबेट व अफगणिस्तान येथील असून मध्य व दक्षिण यूरोपात कृत्रिम ⇨ निळीचा प्रसार होण्यापूर्वी लागवडीत होती. ही भारतातील उद्यानातही लागवडीत असल्याची नोंद आहे.

वोड ही द्विवर्षायू औषधीय जाती सु. ०·४५–०·९ मी. उंच असून तिला देठ असलेली अखंड किंवा काहीशी दातेरी काठाची साधी, मूलज (जमिनीतून वर आलेली), व्यस्त अंडाकृती, भाल्यासारखी पाने असतात. त्यांमधून वाढणारा सु. ६०–९० सेंमी. उंचीचा फुलोरा [परिमंजरी → पुष्पबंध] असून त्यावर सकर्णिक (तळाशी कानाच्या तळाप्रमाणे भाग असलेली) बिनदेठाची केसाळ पाने आणि लहान, विपुल पिवळी फुले उन्हाळ्याच्या आरंभी येतात. सार्षप [शेंगा → फळ] साधारण मोठे, चपटे, लोंबते, एकबीजी, गोलसर, न तडकणारे, काळे व तळाशी निमुळते असून बिया लंबगोल, काळ्या व बारीक असतात. फुलाची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ क्रुसीफेरी कुलात (मोहरी कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

ब्रिटन आणि इतर यूरोपीय देशांत वोडच्या पानांपासून बनविलेला काळपट लगदा रंगद्रव्य म्हणून वापरीत. तेथील लोक त्यांचे कपडे व शरीर ह्या जांभळया रंगाने रंगवीत. ‘ब्रिटन’ हा शब्दच रंगीत किंवा चित्रविचित्र या अर्थाच्या जुन्या केल्टिक (सेल्टिक) संज्ञेपासून आला आहे. तेराव्या शतकात वोडची लागवड खूप होती. प्रथम वोड व नंतर रानटी मिग्नोनेट (रिसेडा ल्यूटिओला कुल-रेसेडेसी) वापरून प्रसिद्ध ‘सॅक्सन ग्रीन’ रंग बनवीत. विशेषत: लोकरीचे कापड रंगविण्यास वोडच वापरीत. सतराव्या शतकात निळीचा प्रसार झाल्यावर वोडचे महत्त्व कमी होत गेले.

वोडची ताजी पाने कुसकरून प्रथम लगदा बनवीत व त्यांचे गोळे करीत आणि उन्हात कवीत. पुढे त्यांची पूड करून पाण्यात ठेवीत व अधूनमधून ढवळून त्यात आंबवण्याची प्रक्रिया घडवून आणीत. हा आंबलेला पदार्थ सुकवून तो सोयीस्कर रूपात रंगाऱ्यांना दिला जात असे.

यातील मुख्य रंगद्रव्य इंडिकान (C14H17O6N-3H2O) हे असून ते निळीतही असते. जखमांवर व इतर काही शारीरिक तक्रारींवर या वनस्पतीचा उपयोग करतात. हिच्या मुळांत ग्लायकोसाइड व मायरोसीन हे एंझाइम असते. बियांत मेदी तेल (३१·३%) असून त्यात अनेक अम्ले (उदा., ओलेइक, इरूसिक) असतात. 

परांडेकर, शं. आ.