पुनर्नवा : (घेटुळी, तांबडी वसू, खापरा हिं. साट, ठिकरी गु. राती साटोडी क. कोमेगिड सं. पुनर्नवा, रक्त पुनर्नवा, शोथघ्नी इ. स्प्रेडिंग हॉगवीड लॅ. बुर्हाविया डिफ्यूजा, कुल-निक्टॅजिनेसी). कोठेही तणासारख्या व पसरून वाढणाऱ्या या बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या ) ओषधीय [→ ओषधि] वनस्पतीचा प्रसार भारतात सर्वत्र असून हिच्या वंशातील एकूण सहा जाती भारतात आढळतात.

पुनर्नवा : (१) फुलोर्यां सह फांदी, (२) फूल, (३) फळ.

बलुचिस्तान, श्रीलंका, उष्ण व उपोष्ण कटिबंधीय आशिया, आफ्रिका व अमेरिका ह्या प्रदेशांतही तिचा प्रसार आहे. सुश्रुतसंहितेत (इ. स. तिसरे शतक) ह्या पुनर्नव्याचा उल्लेख शाकवर्गात केला आहे त्यावरून त्या काळी ही वनस्पती भारतीयांस ज्ञात असून तिच्या गुणधर्मांची ओळख झाली होती असे दिसते. हिची मुळे मोठी, मधे फुगीर आणि दोन्ही टोकांस निमुळती (लुंठसम) असतात खोड व फांद्या बारीक, चिवट, जांभळट (६–९सेंमी. लांब) असून ते जमिनीसरपट वाढतात व फांद्या टोकाशी वर वाढतात. पाने साधी, समोरासमोर व जोड्या असमान असतात ती अर्धवर्तुळाकृती, वरून हिरवी आणि खालून पांढरट असतात. फुले लालसर, सच्छद व फार लहान असून ४–५ फुलांचे चवरीसारखे फुलोरे लांब दांड्यावर पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकांस सप्टेंबर ते डिसेंबर या काळात येतात. परिदले जुळलेली असून त्यांचे नाळक्यासारखे मंडल तळाशी किंजपुटाला वेढून असते केसरदले २–३, काहीशी बाहेर डोकावणारी, किंजपुट ऊर्ध्वस्थ, किंजल लांब, किंजल्क छत्राकृती व बीजक एकच असते [→ फुल]. शुष्कफळ एकबीजी, प्रपिंडयुक्त (ग्रंथीयुक्त) व परिदल-तळाने आच्छादलेले असून त्यावर पाच धारा असतात इतर सामान्य लक्षणे ⇨ निक्टॅजिनेसी कुलात (पुनर्नवा कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

पुनर्नव्याचे मूळ मूत्रल (लघवी साफ करणारे), सारक, कफोत्सारक (कफ पाडून टाकणारे), दीपक (भूक वाढविणारे) व जलसंचयी शोथ (सूज), दमा, रक्तक्षय, कावीळ, स्थानिक जलोदर, अंतर्दाह इत्यादींवर गुणकारी असून अधिक घेतल्यास ओकारी होते. मुळात पुनर्नव्हाइन हे क्रियाशील अल्कलॉइड ०·०४%असते. डोळ्याच्या काही रोगांत (फूल, खुपन्या  इ.) पुनर्नव्याची मुळी मधात उगाळून डोळ्यांत घालतात व पोटात देतात.

जमदाडे, ज. वि.