सिटॅमिनी : फुलझाडांचा [ ⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक गण. या गणात म्यूझेसी, झिंजिबरेसी, कॅनेसी व मॅरेंटेसी ह्या कुलांचा समावेश होतो. बहुतेक सर्व वनस्पती मूलक्षोडयुक्त बहुवर्षायू (अनेक वर्ष जगणारी) ⇨ ओषधी असून वायवीय खोडावर एकांतरित व आवरक तळाची पाने येतात. फुले द्विलिंगी, क्वचित एकलिंगी, बहुधा अनियमित परिदले ३ + ३ केसरदले (फलनक्षम) एक किंवा पाच (क्वचित सहा) किंजदले तीन (जुळलेली) किंजपुट अधःस्थकप्पे तीन व प्रत्येक कप्प्यात एक किंवा अधिक बीजके मृदुफळ किंवा बोंड बीजे पुष्क व परिबीजयुक्त किंवा फक्त परिबीजयुक्त असतात.

म्यूझेसी : प्रजाती पाच व जाती सु. १५० प्रसार उष्ण व उपोष्ण प्रदेशांत मोठ्या ओषधी, काही लहान वृक्षाप्रमाणे फक्त काहींत (रॅव्हेनेलास्ट्रेलिट्‌झियाच्या काही जाती) जमिनीवरचे खोड काष्ठयुक्त परंतु इतरांत फुलोऱ्याच्या दांड्याभोवती आवरकांनी झाकलेले (मिथ्या) खोड असते पाने मोठी, साधी, आयताकृती मध्यशीर जाड व बाजूच्या शिरा समांतर असतात. फुलोरा जाड, मांसल छदांनी वेढलेले स्थूलकणिश फुले कधीकधी मोठी व आकर्षक, बहुधा लहान व छदाच्या आत झाकलेली संवर्त व पुष्पमुकुट दोन्ही पाकळ्यांसारखे किंवा भिन्न केसरदले पाच पूर्ण, एक वंध्य किंवा नसते. म्यूझा ह्या प्रजातीत संवर्त चिरलेल्या नळीप्रमाणे व मृदुफळ रॅव्हेनेला पाममध्ये संदले सुटी, केसरदले सहा व बोंड असते. भाजीची केळी व खाण्याची केळी यांमुळे म्यूझा प्रजाती प्रसिद्घ आहे. [⟶ केळ].

झिंजिबरेसी : प्रजाती सु. ४७ व जाती सु. १,४०० प्रसार मुख्यतः उष्ण व उपोष्ण कटिबंधांत लहान सगंध ओषधी पर्णतलावर जिव्हिका फुलोरा सच्छद कणिश किंवा मंजरी संदले व प्रदले बहुधा भिन्नस्वरुप केसरदले एक पूर्ण, एक नसतो, चार वंध्य व पाकळ्यांसारखे, त्यांपैकी दोन जुळून एक मोठी पाकळी (ओष्ठ) तयार होते.[ ⟶ आले कोष्ट कोळिंजन चाफा, भुई नागदमनी वेलदोडा सोनटक्का हळद].

कॅनेसी : प्रजाती एक व जाती ३०–६० मूलस्थान उष्ण व उपोष्ण अमेरिका प्रसार विशेषतः सर्व उष्ण प्रदेशांत केळीपेक्षा लहान ओषधी फुलोरा कणिश असमात्र, सच्छद, मोठी आकर्षक फुले असतात. संवर्त व पुष्पमुकुट भिन्न केसरदले एक पूर्ण परंतु अर्धा पाकळीसारखा व त्यावर अर्धा परागकोश, एक नसते व चार वंध्यापैकी एक ओष्ठ व इतर पाकळ्यासारखी किंजल पाकळीसारखा व त्यावर तिरपा किंजल्क फळ बोंडावर बोथट काटे व सतत संवर्त. [⟶ कर्दळ].

मॅरेंटेसी : प्रजाती सु. २६ व जाती सु. ३०० प्रसार मुख्यतः उष्ण प्रदेशांत लहान ओषधी व क्षुपे पानांवर पात्याच्या तळाशी फुगवटा (पुलवृंत) फुलोरा महाछदयुक्त एकशाखित वल्लरी किंवा परिमंजरी फुले कॅनेसी प्रमाणे आतील केसरमंडलातील एक पाकळीसारखे, वंध्य केसरदल फडीप्रमाणे, एका पूर्ण केसरावर अर्धा परागकोश व एक वंध्य पाकळीसारखे बाहेरच्या मंडलात एक किंवा दोन पाकळीसारखे किंवा सर्वांचा अभाव किंजल सपाट, फळ शुष्क बीजे अध्यावरणयुक्त असतात. [ ⟶ आरारुट मॅरांटा].

जमदाडे, ज. वि.