ट्यूलिप वृक्ष : (इ. व्हाइट वुड, यलो पॉप्लर, कॅनरी वुड लॅ. लिरिओडेंड्रॉन ट्यूलिपिफेरा कुल-मॅग्नोलिएसी). ह्या जास्तीत जास्त ७५ मी. उंच व ४·२ मी. व्यास असलेल्या भव्य, पानझडी आणि त्रिकोणाकृती वृक्षाचे मूलस्थान चीन आणि ईशान्य अमेरिका असून भारतात काही टेकड्यांवर याची लागवड केलेली आहे. लहान वृक्षाची साल पातळ व खवलेदार असून जुन्या वृक्षाची साल जाड व भेगाळ असते. पाने साधी, उपपर्णयुक्त, एकाआड एक, लांब देठाची, त्रिखंडी, सात ते पंधरा सेंमी. लांब आणि तितकीच रुंद असतात. फुले मोठी, घंटाकृती, हिरवट पिवळी, आत नारिंगी व सुवासिक आणि फळ भुरे व शंकूसारखे असते. इतर सामान्य लक्षणे चंपक कुलात [→ मॅग्नोलिएसी] वर्णिल्याप्रमाणे असतात.

ट्यूलिप वृक्षाची पाने व फूल

मुळे, खोड व फांद्यांची साल कडू, सुगंधी, ज्वरनाशी स्वेदकारी (घाम आणणारी) असतात. अग्निमांद्य, संधिवात व हिवताप यांवर देतात मुळाच्या सालीत ट्यूलिपिफेरीन अल्कलॉइड, बाष्पनशील (उडून जाणारे) तेल, पिवळे रंगद्रव्य व टॅनीन असते. लाकूड पिवळसर भुरे, चकमदार, मऊ, हलके व टिकाऊ असून त्याचा उपयोग चरक, तेलाची घाणी, सजावटी सामान, कोरीवकाम, वाद्ये, नावा, कपाटे, पेट्या, हलके बांधकाम, रेडिओ व ग्रामोफोनची खोकी व तक्ते इत्यादींसाठी होतो. फुलांपासून भरपूर मध मिळतो. एका वृक्षापासून सु. एक किग्रॅ. मध मिळतो. तो तांबूस पिवळट व स्वादिष्ट असतो. हा वृक्ष सावलीकरिता व शोभेसाठी बागेत व कुंपणाच्या कडेने लावतात रोपांपासून किंवा दाब कलमांनी नवीन लागवड करतात. निचऱ्याची जमीन आणि भरपूर सूर्यप्रकाशात याची वाढ चांगली होते.

जमदाडे, ज. वि.