सिकॅमूर : तीन भिन्न वनस्पतींना ‘सिकॅमूर’ हे नाव दिलेले आढळते. प्राचीन काळी ‘फारोचे अंजीर’ या अंजिराच्या एका जातीला (सिकोमोरस अँटिकोरम किंवा फायकस सिकोमोरस) सिकॅमूर म्हणत आता यूरोपात ॲसर स्यूडोप्लॅटॅनस  या ॲसरेसी कुलातील वृक्षाला आणि अमेरिकेत प्लॅटॅनस ऑक्सिडेंटॅलिस  या प्लॅटॅनेसी कुलातील वृक्षाला सिकॅमूर म्हणतात. या दोन्ही वृक्षांचा अंतर्भाव फुलझाडांपैकी द्विदलिकित वर्गात करतात.

आ. १. अमेरिकी सिकॅमूर (प्लॅ. ऑक्सिडेंटॅलिस ) : (अ) पान, (आ) घोसफळ.

अमेरिकी सिकॅमूर : (प्लॅ. ऑक्सिडेंटॅलिस ). या पानझडी वृक्षाला ‘अमेरिकी प्लेन वृक्ष’ असेही म्हणतात बटनबॉल व बटनवुड ही नावेही वापरतात. दक्षिण मिनेसोटा ते नेब्रॅस्का आणि त्याच्या दक्षिणेस टेक्सस व उत्तर फ्लॉरिडा या प्रदेशांत त्याचा प्रसार आहे. त्याची उंची १८–४२ मी. असून खोडाचा व्यास सामान्यपणे ०·६–१·५ मी. असतो परंतु जास्तीत जास्त ७·२० मी. व्यासही आढळतो. पाने साधी, हृदयाकृती, एकाआड एक, ३–५ खंडी, जाड, फिकट हिरवी आणि लवदार असतात. देठाच्या पोकळ तळाशी ग्रीष्मकलिका झाकलेल्या असतात. उपपर्णे मोठी व खोडाभोवती नळीप्रमाणे जुळलेली फुलोरा गोलसर स्तबकाप्रमाणे व लोंबता असून ग्रीष्म ऋतूत तो तसाच टिकून राहतो व त्याला ‘बटन-बॉल’ म्हणतात. फुले एकलिंगी व त्यांचे स्वतंत्र फुलोरे एकाच झाडावर असतात ती परिकिंज असून किंजदले सुटी आणि बीजक ऊर्ध्वमुख व एक असते परागण वाऱ्याने होते. चेंडूसारख्या २·५ सेंमी. व्यासाच्या घोसफळातील प्रत्येक घटक (सस्यफल) केसाळ व त्यावर किंजलाचा अवशेष असतो. त्याचे लाकूड चिवट व घट्ट असून सजावटी सामान, खोके, वाहने, तंबाखू व सिगार यांकरिता आणि पेट्या, पिपे, टोपल्या-करंडे इत्यादींकरिता उपयोगात आहे शोभेकरिता याची लागवड करतात. मेक्सिकन सिकॅमूरचे (प्लॅ. मेक्सिकाना) लाकूड चमचे, बश्या इ. बनविण्याकरिता वापरतात. प्लॅ. ऑक्सिडेंटॅलिस व लॅ. ओरिएंटॅलिस (ओरिएंटल प्लेन वृक्ष) यांचा संकरज प्रकार प्लॅ. ॲसरिफोलिया (लंडन प्लेन वृक्ष) हा शहरी रस्त्यांच्या दुतर्फा व मोठ्या बागेतून लावण्यास अधिक योग्य मानतात आणि लंडनमध्ये रस्त्यांच्या कडेने लावलेला आढळतो. याची फळे जोडीने येतात. प्लॅ. ओरिएंटॅलिस      [→चिनार] काश्मीरात सामान्यपणे आढळतो.

यूरोपीय सिकॅमूर : (ॲ. स्यूडोप्लॅटॅनस ). वर निर्देश केल्याप्रमाणे हा वृक्ष ॲसर प्रजातीत समाविष्ट आहे. या प्रजातीतील जातींना इंग्रजीत ⇨ मॅपल  म्हणतात. ते लहान-मोठे विविध आकाराचे पानझडी किंवा सदापर्णी वृक्ष असून त्यांची पाने समोरासमोर, साधी अथवा संयुक्त किंवा खंडित असतात. शरद ऋतूत पानांचा रंग बदलल्याने वनश्री सुंदर दिसते. उपपर्णे नसतात फुले नियमित, एकलिंगी, लहान व बहुधा एकाच झाडावर येतात. पुष्पबंध मंजरी, गुलुच्छ किंवा चामरकल्प असून सामान्यपणे फुलांत बहुधा संदले व प्रदले प्रत्येकी पाच व सुटी, केसरदले आठ, किंजदले दोन व जुळलेली आणि किंजपुट ऊर्ध्वस्थ असतो. कीटक परागण असते. जोडफळे शुष्क व सपक्ष कपालिका. यूरोप व आशिया या खंडांत त्यांचे मूलस्थान व विशेष प्रसार आहे. त्यांची सावली चांगली गडद पडते. शोभा व सावली यांकरिता विशेषेकरुन त्यांची लागवड करतात अनेकांचे लाकूड इमारतीकरिता उपयुक्त असून शुगर मॅपलपासून (ॲ. सॅकॅरम) साखर मिळते. या प्रजातीतील काही जाती हिमालयात आणि आसाम ते म्यानमार (ब्रह्मदेश) या प्रदेशातील डोंगराळ भागांत आढळतात.

आ. २. यूरोपीय सिकॅमूर (ॲ. स्यूडोप्लॅटॅनस ) : (अ) पुं-पुष्प, (आ) स्त्री-पुष्प (केसरदले कमी केलेले).

यूरोपीय सिकॅमूर याचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. रंगीत पानांचे काही वक्षृ प्रकार यूरोपात लावतात. भारतातील पंजाबच्या टेकड्यांत त्याच लागवड केलेली आहे. तसेच समुद्रकिनारीदेखील लावण्यास तो महत्त्वाचा आहे. तो सु. २१ मी. उंच, भव्य व जलद वाढणारा असून खुल्या ठिकाणी चांगला वाढतो. त्याची पाने पंचखंडी, दातेरी, ८– १६ सेंमी. रुंद, वर गर्द हिरवी-निळसर व खाली गुळगुळीत असतात फुले सु. १२ सेमी. लांब मंजऱ्यांवर व फळे गुळगुळीत असतात. लाकूड पिवळट पांढरे, कठीण, जड व लवचिक असून त्याला चांगली झिलई येते ते सजावटी सामान, गाड्या, बिल्यर्ड्‌स क्यू , बुटाचे ठोकळे, बंदुका, व्हायोलिन, कातीव काम व फरसबंदी इत्यादींकरिता उपयोगात आणतात. (चित्रपत्र).

पहा : चिनार.

परांडेकर, शं. आ. कुलकर्णी, स. वि.

सिकॅमूर (अमेरिकन) (प्लॅटॅनस ऑक्सिडेंटॅलिस)