सापकांदा : (क. अवुभारी गिड, इं. कोब्रा प्लँट लॅ. ॲरिसीमा टॉर्चुओसम कुल-ॲरेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] सु. एक मीटर उंचीची ही गंथ्रिल (जाडजूड व गाठीप्रमाणे दृढकंद) खोडाची ⇨ओषधी वनस्पती भारतात (प. द्वीपकल्प, प. बंगाल, बिहार, ओरिसा, आसाम, सिमला ते सिक्कीम व भूतान इ. ठिकाणी) सु. २,४०० मी. उंचीवर आढळते. गोलसर दृढकंदाचा व्यास सु. १२ सेंमी. पाने २-३, पक्षि पदाकृती खंडित (पक्ष्याच्यापायाप्रमाणे विभागलेली) मोठी व तळास जांभळट ठिपक्यांच्या आवरकाने वेढलेली देठलांब (३०–९० सेंमी.) दले (पाकळ्या) ५–१२ फुलांना परिदले नसतात. स्थूलकणिश फुलोरा [ ⟶ पुष्पबंध] एकलिंगी किंवा द्विलिंगी दांडा बराच लांब, टोकास उंदराच्या शेपटीसारखा व दोनदा वाकलेला महाछद लांब, बाहेर हिरवा, आत जांभळट व खाली नळीसारखा, मध्ये पसरट व शेवटी टोकदार पुं-पुष्पे संवृत सापकांदा(देठाची) असून किंजपुट (स्त्री-केसराचा तळभाग) लंबगोल व किंजल फार आखूड असतात. मृदुफळात ४-५ बिया असतात. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ॲरॉइडी (सुरण) कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. ही वनस्पती विषारी असून मुळे जनावरांना कृमिनाशक म्हणून देतात तसेच बिया मेंढ्यांना शूलावर (पोटातील विकारांवर) मिठाबरोबर देतात. कंदाचा वापर कीटकनाशकांकरिता करतात.

सापकांदा हेच मराठी नाव याच प्रजातीतील दुसऱ्या एका जातीलाही (ॲरिसीमा मुरायी)दिले जाते. भारतात प. द्वीपकल्पात (विशेषतः माथेरान, महाबळेश्वर इ.) ही जाती सामान्यपणे आढळते हिच्यात विषारी वा औषधी गुण नसतात. ॲरिसीमा ह्या प्रजातीत सु. १५० जाती असून त्यांपैकी ४२ भारतात आढळतात. या प्रजातीतील काही जातींच्या कंदासारख्या खोडात भरपूर पिष्ठयुक्त (स्टार्चयुक्त) मगज असून दुष्काळात आदिवासी लोक त्याचा खाद्य म्हणून उपयोग करतात. काही जातींचे दृढकंद डुकरांना खाऊ घालतात कुलू येथे ॲ. स्पेसिओझम या जातीची मुळे मेंढ्यांना शूलावर देतात ‘किरालू’ हे तिचे पंजाबी नाव आहे.

पहा : वनस्पति,विषारी.

संदर्भ : 1. Chopra, R. N. Nayar, S. L. Chopra, I. C. Glossary of Indian Medicinal Plants, New Delhi, 1956.

2. Chopra, R. N. and others, oisonous Plants of India, Vol. II, New Delhi, 1956.

3. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. I, New Delhi, 1948.

4. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. IV., New Delhi, 1975.

वैद्य, प्र. भ. परांडेकर, शं. आ.