सूक्ष्मछेदक : वनस्पतींच्या व प्राण्यांच्या ऊतकांचा (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहांचा) सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने अभ्यास करण्यासाठी त्यांचे पातळ छेद घ्यावे लागतात. असे पातळ छेद घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनास सूक्ष्मछेदक म्हणतात. प्रिचर्ड यांनी १७३५ मध्ये टेबल सूक्ष्मछेदक तयार केला. शेव्हलिअर यांनी या साधनास मायक्रोटोम असे नाव दिले.

सूक्ष्मछेदकांचे मुख्य दोन प्रकार :(१) हस्त सूक्ष्मछेदक : कनिंग यांनी १७९० मध्ये पहिला हस्त सूक्ष्मछेदक तयार केला. या यंत्रामध्ये धातूच्या पोकळ दंडगोलाच्या वरील बाजूस सपाट गोल मंच (चकती ) क्षितिजसमांतर पातळीत असतो. या मंचाच्या मध्यभागी दंडगोलाच्या वरील बाजूस एक भोक असते. दंडगोलाच्या आतील पोकळ भागात ऊतक पकडून ठेवणारा नमुनाधारक असतो. मंचावर क्षितिजसमांतर पातळीत सुरी बसविलेली असते. या सूक्ष्मछेदकाच्या खालील भागात सूक्ष्ममापक स्क्रू असतो. या स्क्रूच्या साहाय्याने दंडगोलातील नमुनाधारक वरच्या दिशेने मंचाच्या पृष्ठभागावर सरकविता येतो. सुरी मंचावर मागे-पुढे हलविता येत असल्यामुळे नमुन्याचे छेद घेता येतात. यामध्ये फीत तयार होत नाही. या यंत्राने २०–३० म्यूमी. (मीटरचा दशलक्षांश भाग) जाडीचे छेद घेता येतात. याने कठीण भागाचे छेद चांगल्या प्रकारे घेता येतात.

आ. १. हस्त सूक्ष्मछेदक : (१) जिभेच्या आकाराची पकड, (२) टेबलासारखा मंच, (३) नमुनाधारक, (४) सूक्ष्ममापक स्क्रू, (५) झडप ढकलणारा स्क्रू.

(२) यांत्रिक सूक्ष्मछेदक : यांत्रिक सूक्ष्मछेदकात (१) पॅराफीन मेणामध्ये असलेल्या नमुन्यांचे छेद घेणारे घूर्णी सूक्ष्मछेदक, (२) सेलॉयडीन आणि प्लॅस्टिकमधील नमुन्यांचे छेद घेणारे सरकते सूक्ष्मछेदक, (३) गोठलेल्या नमुन्यांचे छेद घेणारे गोठण सूक्ष्मछेदक, (४) अत्यंत कठीण अशा द्रव्यांचे (उदा., लाकूड व अस्थी) छेद घेणारे स्लेज सूक्ष्मछेदक आणि (५) इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकासाठी सूक्ष्मछेद घेणारे अतिसूक्ष्मछेदक यांचा समावेश होतो.  नमुन्याची हालचाल करु शकणाऱ्या यंत्रणांवर आधारित सूक्ष्म-छेदकाचे दोन प्रकार मानले जातात : (१) आंदोलनकारी सूक्ष्मछेदक : या यंत्रात नमुन्याची हालचाल हस्तकाच्या साहाय्याने मागे-पुढे सरकवून केली जाते. (२) घूर्णी सूक्ष्मछेदक : या यंत्रात नमुन्याची हालचाल चाकाच्या साहाय्याने घडवून आणली जाते. काही सूक्ष्मछेदकांचे वर्णन पुढे दिले आहे.

घूर्णी (परिभ्रमी) सूक्ष्मछेदक : पॅराफीन मेणामध्ये बुडविलेल्या जीवाच्या नमुन्याचे सूक्ष्मछेद घेण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. १७७८ मध्ये सरकता सूक्ष्मछेदक तयार करण्यात आला. त्यानंतर १७८३–८६ मध्ये घूर्णी सूक्ष्मछेदक विकसित करण्यात आला. स्पेन्सर लेन्स कंपनीने वैद्यकीय निदानाकरिता १९१० मध्ये मोठ्या आकाराचा घूर्णी सूक्ष्मछेदक तयार केला.

या सूक्ष्मछेदकाचा पोलादी जड भाग तळाशी व पुढील बाजूस असतो. या भागावर क्षितिजसमांतर पातळीत सुरी बसविलेली असून तिची धारदार बाजू वरील बाजूस असते. सुरी स्थिर राहण्यासाठी ती धारकामध्ये स्क्रूने घट्ट केलेली असते. सुरी उजव्या किंवा डाव्या बाजूस सरकविण्याची यात सोय असते.

नमुनाधारक भाग पोकळ नळीसारखा असून तो धातूचा असतो. त्यामध्ये धातूच्या दोन पट्ट्या असतात. वरच्या बाजूस असलेल्या स्क्रूने धातूच्या पट्ट्या स्थिर करतात. रॅचेट चाक पितळी व दातेरी असून त्याच्या एका बाजूस सूक्ष्ममापक स्क्रू जोडलेला असतो. या चाकाच्या वरील बाजूस नियंत्रक खिटी (कुत्रे) असल्यामुळे या यंत्राची उलट दिशेने हालचाल होत नाही. ही खिटी कर्णाच्या दिशेत पट्टीला जोडलेली असल्यामुळे चाकाच्या प्रत्येक फेऱ्यानंतर नमुनाधारक भाग काही अंतर सुरीच्या दिशेने पुढे सरकतो. नमुनाधारकाची हालचाल पाठीमागे करण्यासाठी यंत्रामध्ये प्रत्यावर्तन हस्तक असतो. या यंत्रातील सूक्ष्ममापक स्क्रूच्या साहाय्याने नमुन्याच्या सूक्ष्मछेदाची जाडी ठरविता येते.


आ. २. घूर्णी सूक्ष्मछेदक : (१) फिरणारे चाक, (२) नमुनाधारक, (३) सुरी, (४) सुरीधारक, (५) पोलादी जड मंच, (६) प्रत्यावर्तन हस्तक.

स्लेज सूक्ष्मछेदक : हा सूक्ष्मछेदक हाडे व लाकूड यांसारख्या कठीण द्रव्यांचे छेद घेण्याकरिता उपयुक्त आहे. यामध्ये नमुना स्थिर असतो व सुरीची हालचाल होत असते. याचा आधार तळ मजबूत व जड असतो. वरच्या भागात पोलादी सुरीधारक असून तो घसर रुळावर पुढे-मागे सरकविता येतो. सुरीची लांबी ९ सेंमी. व रुंदी १·५–२ सेंमी. असते. तिची धारदार बाजू व्ही (V ) आकाराची असून खालची बाजू जाड असते.

नमुनाधारक हा सुरीधारकाच्या विरुद्घ बाजूला असून तो सुरीच्या सरकत्या मार्गात असतो. नमुनाधारक भाग वर-खाली करण्याची सोय असते. यामुळे सुरी व नमुना एकाच पातळीत आणता येतात. सुरी रुळावरुन पुढे-मागे जात असताना नमुन्याचे छेद घेता येतात.

आ. ३. स्लेज सूक्ष्मछेदक : (१) सुरीधारक, (२) घसर रुळ, (३) आधार तळ, (४) नॅप्लेस पकड, (५) रॅचेट चाक, (६) सूक्ष्ममापक स्क्रू, (७) नमुनाधारक.

नमुनाधारकाच्या खालील बाजूस रॅचेट चाक आडवे बसविलेले असते. त्याच्याशेजारी सूक्ष्ममापक स्क्रू असतो. त्याच्या साहाय्याने छेदाची जाडी ठरविता येते.

गोठण सूक्ष्मछेदक : संस्कारित नमुने तयार करुन पॅराफीन मेणात किंवा सेलॉयडिनामध्ये बुडविल्यामुळे त्यांच्या सूक्ष्मसंरचनेत काही बदल होतात आणि ऊतकातील रासायनिक द्रव्याचा नाश किंवा रुपांतर होते. ही अडचण दूर करण्यासाठी गोठण सूक्ष्मछेदक वापरतात. या यंत्रामध्ये द्रुत शीतनाने दृढ केलेल्या ताज्या ऊतकाचे छेद घेता येतात. यामध्ये नमुन्याचे छेद सलगपणे घेता येत नाही. ते पॅराफीन मेणात किंवा सेलॉयडिनामध्ये बुडवून घेतलेल्या नमुन्याच्या छेदाइतके पातळ नसतात.

आ. ४. आंदोलनकारी सूक्ष्मछेदक : (१) प्रगत दंड, (२) उद्वाहक दंड, (३) लांबट स्क्रू, (४) हस्तक, (५) खाचा असलेली गोल चकती, (६) तरफ, (७) सुरीधारक, (८) सुरीचा कोन ठरविण्याकरिता स्क्रू, (९) ठोकळाधारक, (१०) ठोकळाधारक घट्ट बसविण्याकरिता स्क्रू.

आंदोलनकारी सूक्ष्मछेदक : या यंत्राचा तळ अतिशय जड असतो. यामध्ये एक लांब आडवी पट्टी म्हणजे प्रगत दंड, उद्वाहक दंड, खाचा असलेली गोल चकती व तिच्या मध्यभागी लांबट स्क्रू असतो. छेदाची जाडी ठरविण्यासाठी एक तरफ असते. पुढील भागात ठोकळाधारक व सुरीधारक भाग असतात. सुरीधारक भागातील सुरीचा कोन गरजेनुसार स्थिर ठेवण्यासाठी स्क्रू असतो. या यंत्रातील हस्तक हाताने पुढे-मागे हलवून नमुन्याचे छेद घेतले जात. हा सूक्ष्मछेदक कालबाह्य झाला आहे.


आ. ५. इलेक्ट्रॉन सूक्ष्मछेदक : (१) पाण्यामध्ये तरंगत असलेला सूक्ष्मछेद, (२) सूक्ष्म छेदकातील नमुना धारक, (३) प्लॅस्टिक, (४) काप घेणारी धार, (५) मेण, (६) काचेची सुरी, (७) पाण्याचे भांडे, (८) पाणी.अतिसूक्ष्म छेदक :  इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकासाठी सूक्ष्मछेद घ्यावयाची पद्घत : प्रकाशीय सूक्ष्म-दर्शकासाठी छेद घेण्यासाठी वापरली जाणारी पद्घत थोडा बदल करुन इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकासाठी वापरली जाते. यासाठी वापरल्या जाणाऱ्या अतिसूक्ष्म छेदकाची रचना व त्याची गुणवत्ता उच्च दर्जाची असते. यामध्ये काचेचे किंवा हिऱ्याचे पाते असलेली सुरी वापरतात. या सूक्ष्मछेदकामध्ये प्लॅस्टिकापासून बनविलेला नमुनाधारक ठोकळा वापरतात. पात्याने प्लॅस्टिकचा नमुनाधारक ठोकळा खरवडून (कापून) बारीक करतात. यामध्ये ०–५ मिमी. आकाराचे व २ म्यूमी.पेक्षा कमी जाडीचे छेद घेतले जातात. छेद वाऱ्याने उडून जाऊ नयेत म्हणून सुरीजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवतात. या भांड्यातील पाण्याची पातळी सुरीच्या पातळीबरोबर ठेवतात. यामुळे तयार झालेला छेद पाण्यावर तरंगतो व छेदाची सलग फीत मिळविता येते. [⟶ सूक्ष्मतंत्रे, जीवविज्ञानीय].

संदर्भ : 1. Marimutha, R. Microscopy and Microtechnique, Chennai, 2008.

    2. Swarup, H. Arora, S. Pathak, S. C. Laboratory Techniques in Modern Biology, Ludhiana, 1992.

पाटील, चंद्रकांत प.