बांडगूळ : (१) पाने व फुलोरा यांसह फांदी, (२)फुलोरा, (३)फळे.बांडगूळ : (वांडा हिं. बांदा गु. वांदो क. बदनिके सं. वंदा, जीवंतिका लॅ. लोरँथस फॅल्कॅटस, डेंड्रॉप्थी फॅल्कॅटा कुल–लोरँथेसी). या झुडूपवजा अर्धजीवोपजीवी (अंशतः दुसऱ्‍या सजीवावर अवलंबून असणाऱ्‍या) वनस्पतीचा प्रसार श्रीलंकेत व भारतात बहुतेक सर्वत्र आहे. ती शिसवी, आंबा, हिवर, दत्रंग, वड, पिंपळ इ. अनेक वृक्षांच्या आश्रयाने त्यांच्या फांद्यांवर वाढत राहते व त्यामुळे आश्रय देणाऱ्‍या वनस्पतीचे बरेच नुकसान होते इतकेच नव्हे, तर कधीकधी तिचा नाशही होतो. बांडगुळाची साल करडी व गुळगुळीत असते. पाने साधी, समोरासमोर, जाड, ठिसूळ, लंबगोल, विशालकोनी (टोकदार नसलेली) आकार व सिराविन्यास विविध असून मध्यशीर लालसर असते व सर्वच शिरा खालच्या बाजूस ठळकपणे दिसतात. फुले (२.५–५ सेंमी.) खाली नळीसारखी, वर पसरट शेंदरी किंवा नारिंगी, सच्छद असून पेऱ्‍यावर आखूड मंजरीत नोव्हेंबर-जानेवारीत येतात[⟶फूल]. मृदुफळे लांबट, गोलसर, पक्कावस्थेत काळी, फेब्रुवारी–एप्रिलमध्ये येतात. फुलांची इतर सामान्य लक्षणे ⇨ लोरॅथेसीमध्ये (बंदाक कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फळांचा प्रसार पक्ष्यांद्वारे होतो. ही जीवोपजीवी वनस्पती उपद्रवकारक असल्याने ती समूळ नाहीशी करणे (फांद्या तोडून) हाच एकमेव उपाय आहे. हिच्या कोवळ्या भागात १०% टॅनीन असून कातडी कमाविताना ते मऊ होण्यास शेवटी वापरतात. साल स्तंभक (आकुंचन करणारी) व मादक (गुंगी आणणारी) असते आणि तिचा उपयोग जखमांवर व ऋतुस्त्रावाच्या(मासिक पाळीच्या) तक्रारींवर, तसेच राजयक्ष्मा (क्षयरोग), दमा व उन्माद यांवर होतो.

 

पहा: जीवोपजीवन.

 

जमदाडे, ज. वि.