वनस्पति-भूगोल : पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी जीवन (जगणे) शक्य झाले आहे त्या त्या ठिकाणी निसर्गतः वाढत असलेल्या वनस्पतींच्या व वनस्पति-समुदायांच्या कक्षांचे व विशेष वितरणासंबंधीचे (प्रसारासंबंधीचे) सर्व बाजूंनी केलेले व केले जात असलेले अध्ययन व संशोधन यांचे संकलन करणाऱ्या वनस्पतिविज्ञानाच्या एका प्रमुख शाखेला वनस्पति-भूगोल (इं. प्लँट जिऑग्रफी, फायटोजिऑग्रफी, फायटोकोरॉलॉजी, जिओबॉटनी, जिओग्राफिकल बॉटनी इ.) अशी संज्ञा आहे. ह्या वनस्पतींचा विचार नैसर्गिक वर्गीकरणातील जाती, प्रजाती (वंश), कुल यांसारख्या एककांच्या भाषेत करतात अथवा वन, तृणप्रदेश, मरूक्षेत्र इत्यादींसारख्या सामुदायिक एककांच्या भाषेतही करतात. या शाखेत बव्हंशी स्थलीय निसर्गदृश्यापुरतीच (भूदृश्यापुरतीच) मर्यादा कोणी काटेकोरपणे पाळतात तथापि जलवनस्पतींचा अंतर्भावही त्यामध्ये अभिप्रेत आहे, असे अनेक मानतात. ज्याअर्थी परिसरातील जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) व इतर अनेक घटक वनस्पतींचे (आणि प्राण्यांचेही) जीवन नियंत्रित करतात, त्याअर्थी ह्या सर्व घटकांशी संबंधित अशा ⇨परिस्थितिविज्ञान ह्या वनस्पतिविज्ञानाच्या शाखेचा ह्या वनस्पति-भूगोल शाखेशी फार निकट संबंध आहे. कालमानाच्या संदर्भात इतिहासजमा झालेल्या जीवाश्मरूप (शिळारूप) वनस्पतींच्या भूकवचातील वितरणासंबंधीची माहिती येथे विचारात घेण्याचा संकेत पाळला जातो त्यामुळे ⇨पुरावनस्पतिविज्ञान व ⇨पुरापरिस्थितिविज्ञान ह्या शाखांशी येथे संबंध येणे अटळ असते. तसेच वनस्पति-भूगोलाच्या विकासाच्या इतिहासात ⇨क्रमविकास (उत्क्रांती) व ⇨आनुवंशिकी यांच्याही प्रगतीचा फार निकट संबंध आलेला आढळतो त्यामुळे निसर्गेतिहास, परिस्थितिविज्ञान व निवास तंत्रे (वनस्पति-समुदायातील सर्व सजीव व निर्जीव घटकांचे परस्परावलंबी एकत्रित व्यूह) यांचे विश्लेषण यांपासून वनस्पति-भूगोलाचे क्षेत्र सुसंगतपणे अलग ठेवणे अद्याप शक्य झालेले नाही. भूगोल वैज्ञानिकांच्या मते, तर ही शाखा भूगोलविज्ञानाची एक शाखा आहे आणि त्यामुळे ते या शाखेत अधिकाधिक लक्ष घालू लागले आहेत, ही बाब तर्कशुद्ध दिसते. पृथ्वीवरील साधन सामग्रीच्या योग्य व्यवस्थापनात वनस्पति-भूगोलाचा संबंध वाढत असल्यामुळे त्याच्या विस्ताराला अधिक संधी मिळत आहे. वनस्पतींच्या वितरणात दिसून येणाऱ्या व अनुभवास येत असलेल्या वस्तुस्थितीची नोंद करणे व त्यातील कार्यकारणभाव स्पष्ट करणे हे वनस्पति  भूगोलाचे प्रमुख कार्य आहे. वनस्पतींच्या वितरणाची महत्त्वाची लक्षणे आणि प्रत्यावर्ती आकृतिबंध निश्चित करणे आणि त्यांची मौलिक कारणे शोधणे हा वनस्पति-भूगोलाचा उद्देश आहे. त्यांच्या जीवनास आवश्यक असलेली परिस्थिती आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थिती यांतील परस्परसंबंध, तसेच त्यांच्या क्रमविकासाचा इतिहास व त्यांचे स्थानांतर इत्यादींत ह्या शोधाची मुळे असतात असे अनुभवास आले आहे. यामध्ये ⇨जाती, समुदाय (परिस्थितीच्या संदर्भात बनलेले निश्चित स्वरूपाचे समूह), पादप संख्या (वनस्पतिरूप व्यक्तींची संख्या) व एकात्मीकरणाच्या निवास तंत्रातील पातळ्या यांचा विचार आवश्यक असतो. तसेच वनस्पतींना पीडा देणारे इतर सजीव (उदा., जीवोपजीवी, कीटक इ .), त्यांचा प्रसार, त्यांचे नियंत्रण आणि त्याचप्रमाणे इष्ट जाती व ⇨वनश्रीचे (नैसर्गिक वनस्पतींच्या आवरणाचे) प्रकार यांचा प्रवेश यांची दखल घेणे अटळ असते. याशिवाय वनविद्या, कृषी, गवताळ प्रदेश व चराऊ कुरणे, वन्य जीवन, उद्यानविद्या, मृदा संधारण, जल संधारण इत्यादींचे व्यवस्थापन वनस्पति-भूगोलाशी सुसंगत असल्याचे आढळते. वनस्पति-भूगोल प्रायोगिक आणि परिमाणात्मक नसल्याने त्याच्या अध्ययनात प्रायोगिक कार्यपद्धतीची व तांत्रिक साधनसामग्रीची सहसा जरूर लागत नाही मात्र नवीन जातींच्या निर्मितीतील आनुवंशिकीय संशोधन व त्यानंतरचे त्यांचे द्वीपकल्पे व बेटे यांतील विकीरण (चोहीकडे विखुरणे) व जीवनाची परंपरा हे त्याबाबत अपवादात्मक आहे. ⇨आंड्रेआस फ्रांट्स व्हिल्हेल्म शिंपर यांनी १८९८ मध्ये वनस्पति-भूगोलावर प्रचंड ग्रंथ (Pflanzen Geographic auf Physiologishner Grundlege, १८९८ इं. भा. प्लँरटजिऑग्रफी अपॉन फिजिऑलॉजिकल बेसिस, १९०३) लिहिला असून त्यात जगातील वनश्रीचे वर्गीकरण व त्यांचे तपशीलवार वर्णन दिले आहे. त्यांचा दर्जा जे. ई. बी. व्हार्मिंग यांच्या Plantesanfund (१८९५) ह्या ग्रंथाइतका असून व्हार्मिंग व शिंपर यांनी आधुनिक परिस्थितिविज्ञानाच्या क्षेत्रात मौलिक आद्य कार्य केले आहे.

पादपजात (फ्लोरा) व वनश्री : वनस्पति-भूगोलात ह्या दोन प्रमुख घटकांचे फार मोठे महत्त्व असल्याचे आढळते वनस्पतिजीवनात दोन सामान्यपणे उपयोगात असलेल्या एकात्मीकरणाच्या पातळ्यांचा त्यांना आधार आहे. ⇨पादपजात म्हणजे विशिष्ट नैसर्गिक स्थानातील वनस्पतींची यादी. पादपजातीय वनस्पति-भूगोलाची व्याप्ती पादपजातींच्या वितरणासंबंधी असून वनश्रीविषयक वनस्पति-भूगोलात भिन्न प्रकारच्या वनश्रींच्या स्थल संबंधित वितरणाचा अंतर्भाव करतात. पादपजात ह्या संज्ञेचा उपयोग सर्वसामान्य नसून एखाद्या क्षेत्रातील उदा., हिमालयाच्या पूर्व उतरणीवरील किंवा काळातील (उदा., कार्बॉनिफेरस कल्पातील म्हणजे ३१ ते ३५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) पादपजात म्हणजे त्या विशिष्ट भौगोलिक एककातील सर्व जाती, मग त्यांची सापेक्ष वैपुल्ये व त्यांचे सापेक्ष आप्तसंबंध काहीही असतील. एका विशिष्ट क्षेत्रातील एकाच जातीच्या सर्व व्यक्तींबद्दल सामूहिक अर्थाने निर्देश करण्यास ‘पादपसंख्या’ ही तांत्रिक संज्ञा वापरतात. सामान्य भाषेतील वनश्री (वनसंपदा) ही संज्ञा शास्त्रीय चर्चेत अनेक वनस्पतींच्या निसर्गतः एकत्र वाढण्याने बनलेल्या समुदायाच्या चित्ररूप मांडणीप्रमाणे (चित्रन्यास) अथवा कुट्टिम चित्राप्रमाणे असणाऱ्या निसर्गदृश्याला वापरतात. कधी कधी हे निसर्गदृश्य चित्र जवनिकेसारखे (बुटिदार कापडासारखे) किंवा गालिचा सारखे दिसते. त्याला स्थानिक पादपजातीतील असंख्य वनस्पतींची विविधतापूर्ण व बदलती मिश्रणे व त्यांची वृद्धी ही जबाबदार असतात. तांत्रिक दृष्ट्या वनश्री हे संघटित व एकात्मीकृत साकल्य (एकत्र केलेल्या घटकांचे व संपूर्ण) असते, ते सुट्या किंवा अलग अलग वाढलेल्या जातीपेक्षा एकात्मीकरणाच्या उच्च स्तरावरील असते आणि त्यामध्ये त्याच जाती व त्यांच्या पादपसंख्या अंतर्भूत असतात. कधी कधी एकात्मीकरण फार सौम्य असते, उदा., पडीत शेतात इतस्ततः विखरून वाढलेल्या आद्य (पायाभूत) वनस्पती. तसेच कधी कधी ती वनश्री अस्पर्शित (मानवी स्पर्श न झालेल्या) उष्ण कटिबंधीय वर्षारण्याप्रमाणे फारच एकात्मीकृत (दाटीवाटीने वाढलेली) असते. ती स्वयंमेव साकल्य तंत्र असते, कारण तिच्यातील उद्‌भवशील गुणधर्म जातींत आढळतातच असे नाही. परिस्थितीतील अन्य घटकांबरोबर वनश्रीचा अंतर्भाव निवास तंत्रात होतो, त्यामुळे सु. १९५० सालापासून तिच्या सखोल अध्ययनाचा पाठपुरावा केलेला आढळतो [⟶ परिस्थितिविज्ञान].

पादपजातीय वनस्पति-भूगोल : कोणत्याही पादपजातीच्या संघटनेत त्यातील प्रत्येक भिन्न वनस्पती [⟶ जाति ] हे प्रमुख एकक असते. हे घटक परस्परवर्ज्य नसतात. त्यांचे लहान मोठे गट व उपगट करता येतात. उदा., सारख्याच पूर्वजापासून क्रमविकास होऊन बनलेल्या भिन्न जातींचा एक पादपजातीय ‘जननिक’ (आनुवंशिकीय) गट असू शकतो त्या क्षेत्रात समान मार्गाने स्थानांतर करून आलेला, स्थानांतर घटक (उदा., पाण्यातील हायसिंथ) आढळणे शक्य असते ‘ऐतिहासिक’ घटकाचा उगम एखाद्या जुन्या घटनेत आढळतो ‘पारिस्थितिक’ घटक तेथील विशिष्ट परिस्थितीतील एखाद्या घटकाला अनुकूलित असतो [ उदा.,⟶ लवण वनस्पति ]. ‘अन्यदेशीय’ (उदा., काटेधोत्रा, ओसाडी),‘विमुक्त’ (अन्य ठिकाणाहून निसटून आलेला) आणि ‘अतिप्रसारित’ जातींचा (घटकांचा) विचार स्वतंत्रपणे होतो एखाद्या मर्यादित व विशेष महत्त्वाच्या क्षेत्रातच आढळणाऱ्या घटकास ‘प्रदेशनिष्ठ’ म्हणतात. [उदा., चीन व जपान येथील गिंको वायलोबा ही जाती ⟶ गिंकोएलीझ].


वनस्पति-भूगोलात कोणत्याही जातीचा, घटकाचा किंवा संपूर्ण पादपजातीचा नैसर्गिक अधिवास (वाढण्याचे ठिकाण) किंवा प्रसार येथे आढळतो त्या संपूर्ण प्रदेशाला ‘क्षेत्र’ म्हणतात. क्षेत्रासंबंधीच्या विशेष माहितीला ‘क्षेत्र वर्णन’ ही संज्ञा आहे. क्षेत्रातील एखाद्या जातीच्या स्थानिक प्रसाराला त्या क्षेत्राचे ‘स्थलवर्णन’ म्हणतात. क्षेत्रांचा साधारण आकार, त्यांचे आकारमान, त्यांच्या किनारीचे (काठाचे) सलग, खंडयुक्त (तुटक) असे प्रकार आणि शेजारी असलेल्यांशी त्यांचे संबंध येथे विचारात घेतले जातात. अनेक क्षेत्रे एका बिंदूभोवती असल्यास त्यांचा ‘एककेंद्री’ गट व ती अनेक बिंदूभोवती असल्यास ‘अनेककेंद्री’ गट अशा संज्ञांनी ओळखतात त्यांचा भौगोलिक दृष्ट्या एकच प्रांत असतो किंवा तसे अनेक असतात. निकट संबंधाच्या परंतु परस्परवर्ज्य जातींच्या क्षेत्रांना प्रतिनिधीरूप (बदली) म्हणतात. जुन्या आणि अधिक विस्तृत क्षेत्राच्या विद्यमान लहान उर्वरित किंवा शेष मात्र भागाला ‘अवशिष्ट क्षेत्र’ म्हणतात. विविध क्षेत्रे व त्यांचे पादपजातीय संबंध यांच्या आधारावर भूपृष्ठाचे अनेक (सु. ३०) पादपजातीय प्रदेश ओळखले जातात.

पादपजाती व त्यांचा प्रसार यांचा कार्यकारणभाव समजून घेऊन, त्यांचा इतिहास व परिस्थितिविज्ञान यांच्या संदर्भात त्यांचे वर्णन करण्याची पद्धत रूढ आहे. ऐतिहासिक वस्तुस्थिती व जातींचा क्रमविकास यांमध्ये बदलणाऱ्या भूपट्टांचे सिद्धांत [⟶ भूपट्ट सांरचनिकी], महाद्वीपकल्पी या राशींची हालचाल, बदलत्या समुद्र पातळ्या आणि भूवैज्ञानिक काळातील पर्वत वर्णनविषयक व जलवायुमानविषयक विभेद (बदल) ह्या सर्वांशी संबंधित असलेल्या विचारांचा अंतर्भाव होतो या सर्वामुळे पादपजातींचे स्थानांतर आणि त्याची शाश्वती यांवर परिणाम झालेले आढळतात. पारिस्थितिक घटकांत ज्यांचे निरीक्षण करता येते व परिमाणात्मक मापन करता येते अशा पुढील बाबींचा समावेश करतात. वर्णन, आर्द्रता, पाण्याच्या पातळ्या, तापमान, वारा, जमीन (मृदा) प्राणी, माणसे इत्यादींच्या तत्कालिक व समकालीन भूमिका [⟶ परिस्थितिविज्ञान पुरावनस्पतिविज्ञान पुरापरिस्थितिविज्ञान]. पादपजातीय वनस्पति-भूगोलाचा पाया घालून त्याला सुस्थित करण्यास रोनाल्ड गुड, लीऑन क्रोइझॅत आणि इतर कित्येक शास्त्रज्ञांनी फार परिश्रम केले. या उपशाखेचे अंतिम उद्दिष्ट ज्ञात वस्तुस्थितीचे अर्थपूर्ण पुनःसंयोजन करणे आणि संकल्पनांची पुनर्रचना करणे हे आहे अर्थात ज्या वेळी सागरमध्यातील तडे (भेगा) आणि पालटणारे भूपट्ट ह्यासंबंधीची भूविज्ञानातील विकासाची माहिती उपलब्ध होईल, त्या वेळी ते साध्य होईल.

काही शास्त्रज्ञांनी पृथ्वीवर एकूण सहा प्रमुख पादपजातीय विभाग भौगोलिक परिस्थितीच्या संदर्भात केले आहेत त्यांचेही लहानमोठे उपविभाग केले असून प्रत्येकात विशिष्ट प्रकाराच्या परिस्थितीत वाढणाऱ्या विशिष्ट गुणसंपन्न पादपजातींचा अंतर्भाव केलेला आढळतो. पादपजातीय संघटनेवरूनच वनश्रीचा प्रकार ओळखता येतो. हे पादपजातीय विभाग असे : (१) उत्तरीय (होलार्क्टिक बोरियल) (२) पुराउष्णकटिबंधीय (पॅलिओट्रॉपिकल) (३) नवोष्ण कटिबंधीय (नीओट्रॉपिकल) (४) ऑस्ट्रेलियन (५) दक्षिण आफ्रिकी (६) दक्षिण ध्रुवीय (अंटार्क्टिक). ह्या प्रत्येक विभागातील पादपजात व त्यातील अंतर्भूत जाती व त्यांचे सापेक्ष प्रमाण त्या त्या विभागातील भौगोलिक परिस्थितिसापेक्ष भिन्न प्रकारचे असतात.

 

वनश्रीविषयक वनस्पति-भूगोल : कोणत्याही प्रदेशातील वनश्रीचे मूलभूत घटक म्हणजे तीत आढळणारे वनस्पतींचे लहान मोठे समुदाय. ह्या संबंधीच्या उपशाखेला काही शास्त्रज्ञ वनस्पतींचे (पादप–) परिस्थितिविज्ञान म्हणतात, तर काही जण वनस्पतींचे (पादप–) समाजशास्त्र [इं. प्लँट इकॉलॉजी प्लँट (फायटो) सोशिऑलॉजी व्हेजिटेशन सायन्स] म्हणतात. वनस्पति-समुदाय ह्या त्यातील घटकाच्या अनेक व्याख्या प्रचलित असून सर्वसंमत व्याख्या नाही.

  

भूपृष्ठावरील पादपजातीय प्रदेश : (१) उत्तर ध्रुवीय व उप-उत्तरध्रुवीय (२) यूरो-सायबीरियन : (अ) यूरोप, (आ) आशिया (३) चिनी–जपानी (४)पश्चिम व मध्य आशियाई (५) भूमध्य-सामुद्रिक (६) अटलांटिक उत्तर अमेरिका : (अ) उत्तर, (आ) दक्षिण (७) पॅसिफिक उत्तर अमेरिका (८) आफ्रिकी-भारतीय मरूक्षेत्र (९) सूदानी पार्क-स्टेप (१०) ईशान्य आफ्रिकी उच्च प्रदेश (११) पश्चिम आफ्रिकी वर्षावन (१२) पूर्व आफ्रिकी स्टेप (१३) दक्षिण आफ्रिकी (१४) मादागास्कर (१५) भारतीय (१६) महाद्वीपकल्पीय आग्नेय आशियाई (१७) मलेशियाई (१८) मेलानीशिया व मायक्रोनीशिया (१९) कॅरिबियन (२०) व्हेनेझुएला व गियाना (२१) ॲमेझॉन (२२) दक्षिण ब्राझीलीय (२३) अँडीयन (२४) पॅंपास (२५) केप (२६) उत्तर व पूर्व ऑस्ट्रेलियाई (२७) नैर्ऋत्य ऑस्ट्रेलियाई (२८) मध्य ऑस्ट्रेलियाई (२९) न्यूझीलंड (३०) पॅटागोनियाई. 

१९२० पूर्वी एच्. ए. ग्लिमसन यांनी संमत केलेल्या संकल्पनेनुसार समुदाय ही नैसर्गिक घटना असून त्यातील जातींच्या व्यक्तींत उच्च दर्जाचे स्वालंबन आढळते. तज्ञांच्या मते समुदाय ही अनेकदा सृष्टीतील केवळ सापेक्ष सामाजिक निरंतरता असून तिच्याभोवती सापेक्ष सातत्याभाव असतो. ह्या वैज्ञानिक उपशाखेत तथाकथित वनश्रींचे (वानस्पतिक) प्रदेश दर्शविणारा नकाशा बनविण्यावर आणि परिस्थितीच्या प्रभावाच्या संदर्भात त्याचे अर्थबोधन करण्यावर भर दिलेला असतो. नकाशे बनविण्यास उपयुक्त ती माहिती व त्यांचे तंत्र संक्षिप्त रूपात ए. डब्ल्यू. कुक्लर यांनी संकलित केले आहे. 


 वनश्रीचे भौगोलिक एकक ओळखता येईल, अशी वनस्पतींच्या समुदायांच्या चित्रन्यासाची (कुट्टिम चित्रांची) अनेक लक्षणे सांगता येतात जी अद्याप साहित्यात प्रामुख्याने उल्लेखिलेली आढळतात. त्यांचा उगम विज्ञानबाह्य लोकवाङ्मयात आढळतो. वन, गवताळ प्रदेश, मरूक्षेत्र आणि याशिवाय विरळ जंगले, रूक्षवन (सॅव्हाना), खुरटी झाडी इ. प्रकारांतील भूस्वरूपी फरक (दिसण्यातील वेगळेपणा) वारंवार स्पष्टपणे मांडले जातात. वनांच्या बाबतीत सदाहरित, शंकुमंत (सूचिपर्णी), रूंदपर्णी पानझडी व रूंदपर्णी सदाहरित या संज्ञांनी ढोबळ फरक दर्शवितात याशिवाय मूळची अस्पर्शित वनश्री, भावी  ‘वनश्री ’ किंवा ‘चरम’ (अंतिम) वनश्री असे प्रकार नकाशावर दर्शवितात. तसेच मानवाच्या क्रियाशीलतेमुळे बनलेली प्रत्यक्ष पादपावरणे (जमिनीवरील वानस्पतिक आच्छादाने) यांनाही त्यात स्थान देतात. असे अपुरे अभिगमन असमाधानकारक ठरले आहे परंतु वैज्ञानिक दृष्ट्या योग्य पर्याय स्वीकारले गेलेले नाहीत. तथाकथित अस्पर्शित वनश्रीसंबंधी जी सुधारित माहिती मिळते ती ह्या असमाधानाचे मूळ आहे. प्राचीन मानवी लोकसमुदायाचे संस्कार काही प्रमाणात तिच्यावर झालेले आहेत. उदा., मानवामुळे निर्माण झालेले वणवे (आगी) व उत्तर प्लाइस्टोसीन युगातील (सु. ६ लाख वर्षांपूर्वीच्या काळातील) शाकतृणाहारी मोठ्या प्राण्यांचे विलोपन. इतर अनेक बाबतींत बराच सारखेपणा असणाऱ्या वनश्रींचे शंकुमंत व पानझडी प्रकार अशी पृथकता आली. उदा., उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागातील यलो बर्च व हेमलॉक तसेच एरवी संबंध नसलेले प्रतिनिधी (उदा., उष्ण कटिबंधापासून टंड्राच्या काठापर्यंत पसरलेल्या पाइनच्या जातींचे गट) एकत्र आले. याखेरीज पूर्वीच्या तृणभूमीत बिघाड झाल्याने तेथे वरवर पाहता स्वयंमेव चिरस्थायी होणाऱ्या काष्ठयुक्त (वृक्ष व झुडपे असलेल्या) वनश्रीचे आक्रमण होते किंवा त्याउलट प्रक्रियाही आढळते. परिणामी भूस्वरूपी वर्गीकरणातील मौलिकता कमी होते. पादपजातीय वनस्पतिविज्ञानात क्रमविकासाचे एकच एकीकरण तत्त्व आधारभूत असते याउलट वनश्रीचा स्वभाव तिच्या भौगोलिक प्रसारात असा असतो की, प्रदेशांचे आणि वर्गीकरणाचे अनेक प्रकार ह्या दोन्हींना नैसर्गिक घटनेचे बुद्धिसंमत कार्यकारणभाव लावण्यात सारखेच औचित्य असते. वनश्रींच्या प्रसाराची संगती लावताना सरासरीने जी विद्यामान परिस्थिती कारणीभूत असते तिच्या भाषेत ते बव्हंशी केले जाते. तथापि वादळे, अवर्षणे, वणवे व जलवायुमानातील इतर अनित्य बदल किंवा ज्वालामुखी उद्रेक यांसारख्या धोक्यांची दखल घ्यावीच लागते. त्यामानाने भिन्न जातीतील आनुवंशिकतेमुळे आलेल्या फरकांना फारसे महत्त्व दिले जात नाही परस्परांपासून पूर्ण स्वतंत्र असलेल्या पादपसंख्याबाबत त्यांच्या कक्षांच्या सीमेवर हे विशेषपणे आढळते. प्राप्त परिस्थितीतून आवश्यक घटकांचे ग्रहण करण्यातील जातींची भिन्नता आनुवंशिकतेने नियंत्रित केली असल्याने त्यांचे एकत्र वाढणारे भिन्न समुदाय बनतात. ⇨वृक्षोद्यानात व ⇨शास्त्रीय उद्यानात वाढविलेल्या अनेक जाती त्यांच्या वैयक्तिक नित्यबर्धनसीमेबाहेर असूनही उत्तम प्रकारे वाढतात, त्यामुळे परिस्थितीला अवास्तव महत्त्व देता येत नाही माळी (मोकळ्या जमिनीवर झाडे वाढविणारा माळी) आणि इतरत्र वनस्पतींच्या नैसर्गिक समुदायात तीच झाडे वाढताना पाहणारा परिस्थितिवैज्ञानिक यांमधील व्यावसायिक दरी बुजलेली नाही.

समान परिस्थितीत असण्याच्या वस्तुस्थितीचा पाठपुरावा करून वनश्रीच्या भिन्न प्रदेशांची संगती लावण्यास भरपूर लेखी पुरावा उपलब्ध आहे. यांमध्ये जलवायुमानाला प्राथमिक महत्त्व दिले आहे तापमान व आर्द्रता यांच्या एकत्रित परिणामाचा विचार करून त्यांच्या विविध अनुभवांतून मिळालेल्या सूत्ररूप माहितीच्या सहसंबंध विविध स्वरूपी वनश्रींच्या प्रसाराशी जोडतात. त्यामानाने जमिनीला दुय्यम महत्त्व आहे त्याशिवाय जैव घटकांचे (इतर वनस्पती व मानवासह संबंधित प्राणी यांचे) परिणाम मर्यादित असल्याचे मानतात. वनश्रींच्या प्रकाराच्या वितरणाची संपूर्ण कल्पना येण्यास नित्य परिस्थितीचे विश्लेषण आवश्यकच असते. शिवाय परिस्थितीतील भिन्न घटक व वनश्रींचे प्रकार यांचे संबंध प्रत्यक्ष व साधे आणि कार्यकारणभाव दर्शविणारे असतातच असे नाही. १९५० सालानंतरचे बरेच संशोधन फक्त पादपजात आणि वनश्री यांपुरतेच नसून त्याचा विशे, भर ⇨जीवसंहती (एकाच विशिष्ट परिस्थितीत असलेल्या व तिच्याशी समरस झालेल्या वनस्पती आणि प्राणी यांचा गट) व निवास तंत्रे [⟶ परिस्थितिविज्ञान] यांसारख्या एकात्मीकरणाच्या उच्च पातळीवरील विषयांवर आहे त्यामुळे त्यांची उकल होऊन त्यातून पादपजात, वनश्री व इतर अनेक घटकांसंबंधी अधिक उपयुक्त माहिती उपलब्ध होणे शक्य आहे.

सर्व जगातील वनस्पति-समुदायांचे बनलेले भिन्न प्रादेशिक आकृतिबंध त्या त्या प्रदेशाचा इतिहास, प्राकृतिक वर्णन आणि भूवैज्ञानिक मूलभूत (आधारभूत) द्रव्य यांवर अवलंबून असतात. यामध्ये त्या प्रदेशातील निचरा प्राकृतिक माहितीतून कळतो भूवैज्ञानिक आधारद्रव्याच्या माहितीमुळे, तो समुदाय बनतो तेथील भौतिक रासायनिक संघटन समजून येते प्रमुख जलवायुमानविषयक बदल आणि मानवाने केलेली कमीअधिक विक्षोभक ढवळाढवळ हे इतिहासावरून दिसून येते. एखाद्या लहान तळ्यात व तळ्याभोवती असलेल्या वनस्पतींचे गट साधारणपणे वर्तुळाकृती समुदायाच्या स्वरूपात मांडल्यासारखे दिसतात त्यांचे भिन्नत्व त्या लहानशा क्षेत्रातही असलेल्या भिन्न स्थानिक परिस्थितिजन्य असते. तसेच एखाद्या डोंगराच्या भिन्न उंचीवर वाढणाऱ्याव अनेक भिन्न वनस्पति-समुदायांच्या स्वरूपात त्यावर वर्तुळाकृती पट्ट्यांमध्ये आढळतात त्यांना वनश्रीचे पट्टे (क्षेत्रविभाग) म्हणतात त्यांची भिन्नताही डोंगराच्या भिन्न उच्चतेतील भिन्न परिस्थितीतून उद्‌भवलेली असते प्रत्येक पट्ट्यात एकच किंवा अनेक वनस्पति-समुदाय असू शकतील. यापेक्षा अधिक विस्तृत प्रमाणावर, भौगोलिक पातळीवर, पृथ्वीच्या भिन्न कटिबंधानुरूप वनश्रींचे वितरण कटिबंधस्वरूपात आढळते, कारण वर चर्चा केल्याप्रमाणे वनश्रींचे सर्वसाधारण स्वरूप व संघटना भौगोलिक परिस्थितीशी अनुकूलित असते तपशीलात मात्र वनश्रीमध्ये जमिनीविषयक फरकांमुळे बनलेले किंवा इतर परिस्थितिक घटकानुकूलित असे लहान मोठे समुदाय असतात. थोडक्यात, वनस्पति-भूगोलात पृथ्वीवरच्या वनश्रींच्या वितरणाचे कटिबंध आणि त्यांची संकलित माहिती अभिप्रेत असते. ह्या संदर्भात अलीकडे सु. वीस वनश्रीविषयक वर्ग केले असून त्यांपैकी प्रत्येक एका विशिष्ट प्रकारच्या वनश्रीविषयक वैशिष्ट्याबाबत प्रातिनिधिक स्वरूपाचा असतो आणि तो विशिष्ट प्रदेशात आढळतो त्या प्रत्येकाला ‘क्षेत्रीय समावास’ म्हणतात.

स्थूलमानाने प्रमुख प्रकाराच्या वनश्रींच्या वितरणाची माहिती आवश्यक ठरते याकरिता वर उल्लेख केल्याप्रमाणे ज्यात बहुधा अनेक समुदाय असतात असे नऊ प्रमुख वनश्रीविषयक गट ओळखले जातात त्यासंबंधीचा तपशील खाली दिला आहे.

 

(१) वर्षारण्ये (वर्षावने) : उष्ण कटिबंधात सर्व ऋतूंत पाऊस, उष्णतामान व आर्द्रता भरपूर असलेल्या ठिकाणी ही आढळतात. यांमध्ये वृक्षांची गर्दी असून त्यांच्या माथ्यांचे सलग छत असते. येथे असंख्य जातींचे मिश्रण असले, तरी कधी कधी एकाच जातीतील अनेक व्यक्ती एकाच स्थानी (शुद्ध समुदाय) आढळतात. त्यांची पाने रूंद व सदाहरित असतात ⇨अपिवनस्पती (दुसऱ्या झाडावर आधारून वाढणाऱ्या वनस्पती) व ⇨महालता (मोठ्या वेली) बहुधा विपुल असतात. येथील जमीन निकस असून तिच्यात सदैव त्या झाडांचे मृतभाग मिसळून ते एकरूप होतात. काँगो व ॲमेझॉन या नद्यांच्या खोऱ्यांत आणि म्यानमार, आसाम, बंगाल, मलेशिया इ. भागांत वर्षावनांचे मोठे प्रदेश आहेत.

(२) सदाहरित चर्मिलपर्णी (लॉरेल-पर्णी) समुदाय : येथे सदैव हिरव्या व काष्ठयुक्त वनस्पती असून त्यांचे उपोष्ण कटिबंधीय वर्षावन बनलेले असते सतत गरम उष्णतामान, नियमित पर्जन्य व भरपूर आर्द्रता असते. बहुतेक वृक्षांना रूंद व ⇨लॉरेलसारखी चिवट पाने असतात काही शंकुमंत (शंकूच्या आकाराचे प्रजोत्पादक इंद्रिय असलेले सूचिपर्णी) वृक्ष असतात व अपिवनस्पती फार कमी असतात. भूमध्यसामुद्रिक प्रदेशात स्थानिक स्वरूपाचे लहान समुदाय असतात परंतु दक्षिण हिमालयात विस्तृत क्षेत्रात आणि चीन, जपान, उत्तर व पूर्व ऑस्ट्रेलिया येथे व्यापक प्रदेशात ते आढळतात पूर्व व दक्षिण आफ्रिकेत स्थानिक स्वरूपात, अँडीज पर्वताच्या बाजूस, ब्राझीलमध्ये मोठ्या प्रदेशात आणि फ्लॉरिडाच्या वनांतील बराच भाग त्या प्रकारच्या समुदायांचा आहे.


(३) दृढपर्णी, काष्ठमय व इतर भूमध्यसामुद्रिक प्रकांरांची वनश्री : उन्हाळ्यात शुष्क व उष्ण हवा आणि हिवाळ्यात सौम्य पाऊस यांशी समरस होणारे वनस्पति-समुदाय येथे आढळतात व त्यात सदाहरितांचे प्राबल्य असते (उदा., स्ट्रॉबेरी वृक्ष–आर्बुटस उनेडो अलेप्पो पाइन−पायनस हॅलेपेन्सिस) वसंत ऋतूत व शरद ऋतूत येथील वनस्पतींना फार अनुकूल परिस्थिती असते. कंदयुक्त व इतर ओषधीय [लहान व नाजूक ⟶ ओषधि] वनस्पती येथे सामान्यपणे आढळतात. भूमध्य समुद्राच्या काठाकाठाने ‘मॅकी’ किंवा ‘मॅक्सिया’ प्रकारचे अनेक चर्मिलपर्णी वनस्पतींचे खुरटे समुदाय असून तसेच अनुकूलन असलेले इतरत्र (कॅलिफोर्नियातील ‘चपरल’ व फ्रान्समधील ‘गॅरीग’) आढळतात दक्षिण आफ्रिकेचा नैर्ऋत्य भाग, दक्षिण ऑस्ट्रेलियाचा काही भाग, चिलीतील एक लहान क्षेत्र इ. ठिकाणीही ही वनश्री आढळते.

(४) मोसमी जंगले व रूक्षवने (सॅव्हाना) : पावसामुळे व उन्हाळे असे ऋतू स्पष्टपणे जेथे आढळतात अशा उष्ण कटिबंधीय व क्वचित उपोष्ण कटिबंधीय जलवायुमानांत ही वनश्री किंवा हे समुदाय प्रकार आढळतात. येथे वृक्षांनी किंवा लहानमोठ्या झुडपांनी भरलेली जंगले यांपासून ते कोठे कोठे तुरळकपणे विखुरलेली झाडे असलेले गवताळ प्रदेश (उदा., सॅव्हाना, काँपो व लानो) ह्या पल्ल्यात येणारे विविध वनस्पति-समुदाय आढळतात. वनश्रीच्या मानवी व्यवस्थापनात वेळोवेळी आग पेटवून निदान उंच गवते (व काही लहान रोपटी व झुडपे) नाहीशी करतात त्यामुळे येथील वनश्री विरळ राहून लहान गवते व अग्निकरोधक झाडेच टिकून राहतात. कोरड्या ऋतूत झाडांची पाने गळून पडल्याने ही वनश्री पानझडी ठरते तिचा आढळ उष्ण कटिबंधीय आफ्रिकेच्या वर्षारण्याच्या पट्ट्याच्या उत्तर व दक्षिण भागांत, मध्य व पूर्व भारतात आणि अँमेझॉनच्या खोर्या च्या प्रदेशातील सदाहरित बनात (मधून मधून) आणि त्याच्या उत्तर व दक्षिण भागांत आहे.

(५) तृणसंबात (स्टेप्‌स) : ओषधीय वनस्पतींचे प्राधान्य असलेल्या आणि वृक्ष व झुडपे यांचा अभाव असणाऱ्या ह्या प्रकारच्या वनश्रीत काही प्रदेशांत गवते भरपूर असतात परंतु इतर कित्येक ठिकाणी थोड्या गवताबरोबर असलेल्या विपुल औषधींना दोन ऋतूंच्या मध्यावकाशात फुले येऊन वातावरण रम्य होते. दक्षिण रशिया, मध्य आशियातील काही भाग व मध्यपूर्व ह्यांत तृणसंघात विशेषेकरून आढळतात. उत्तर अमेरिकेतील प्रशाद्वले (प्रेअरीज) व दक्षिण अमेरिकेतील सदातृणक्षेत्रे (पॅंपास) स्थूलमानाने याच सदरात येतात. दक्षिण ऑस्ट्रेलियातील मरू प्रदेशांभोवती व दक्षिण आफ्रिकेत काहीशी अशीच वनश्री आढळते. [⟶ गवताळ प्रदेश].

(६) मरुभौम वनश्री : नित्याचे वार्षिक पर्जन्यमान २५ सेंमी. पेक्षा अधिक नसल्याने येथील वनस्पतींना जीवन कठीण जाते. बहुतेक मरू वनस्पती बहुवर्षायू नसून परस्परांपासून त्या दूर व मरुभूमीत विखुरलेल्या असतात जेथे खोलवर असलेले पाणी (भूजल) पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकते अशा ठिकाणी (मरुवनात) तेथील वनश्री इतर समुदायापेक्षा वेगळी असते. मरुभौम वनश्रीतील जाती रुक्षतारोधक अथवा मांसल (रसाळ) असतात रुक्षता कमी असलेल्या ठिकाणी पावसानंतर लागलीच काही अल्पायुषी जातींचे जीवन सुरू होते त्यामध्ये बीज रुजणे, पालवी येणे, फुले व नंतर फळे येणे ह्या सर्व क्रिया काही आठवड्यांत संपतात व वनस्पतींचे जीवन संपते. मरूभूमीचा प्रदेश (मरू प्रदेश) सहारा ते अरबस्तानापर्यंत सलगपणे असून पुढे तुटकपणे मध्य आशियापर्यंत आढळतो शिवाय मध्य ऑस्ट्रेलिया, कालाहारी, दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेकडील एक पट्टी, उत्तर अमेरिकेच्या पश्चिमेकडील काही भाग इ. ठिकाणी मरुभौम किंवा अर्धमरुभौम वनश्री आढळते.

(७) पानझडी वने : समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत, जेथे थंड हिवाळे, गरम उन्हाळे व वाढीच्या वेळी पुरेसा पाऊस असतो तेथे ह्या प्रकारातील नैसर्गिक वनस्पति-समुदाय आढळतात. त्यांत ओक, बीच, मॅपल, लाइम, चेस्टनट इ. अनेक वृक्ष असून मनुष्याची लुडबूड नसती, तर मध्य यूरोपाचा बहुतेक भाग, पूर्व आशियाचा मध्यभाग आणि उत्तर अमेरिकेचा पूर्व भागही त्यांनी व्यापला असता. ह्या प्रकाराची उन्हाळ्यात हिरवी राहणारी वने इतरत्र (दक्षिण अमेरिकेतही) स्थानिक स्वरूपात आढळतात.

 

(८) शंकुमंत वने (तैगा) : उत्तर यूरेशिया व उत्तर अमेरिका येथे विस्तृतपणे वाढलेली सलग वने या प्रकारची असून त्यांत पाइन, स्प्रूस, हेमलॉक, लार्च इ. मऊ लाकडाचे वृक्ष आढळतात. कोठे कोठे एकाच जातीच्या वृक्षाची क्षेत्रे असून ती पाहण्यास कंटाळवाणी वाटतात. ह्या वनांच्या निर्भेळपणामुळे त्यांचा समुपयोग करणे सोपे व फायद्याचे असते. त्यांचा उपयोग इमारती लाकूड व कागदाकरिता लगदा मिळविण्यास होतो. [⟶ तैगा].

 

(९) ध्रुवीय व उच्च पर्वतीय (वनश्रीतील) समुदाय : उंच पर्वतांच्या शिखराकडे वर जाताना आणि ध्रुव प्रदेशाकडे जाताना विशिष्ट मर्यादेपुढे वृक्षांचे वास्तव्य संपून झुडपांची उंची कमी झालेली आढळते (उदा., जूनिपर, बर्च इ.). उत्तरेच्या परिसीमेवर ⇨टंड्रा हा दोन-तीनशे जातींच्या लहान (ओषधीय) वनस्पतींचा एक उत्तर ध्रुवीय सामान्य समुदाय आढळतो. येथे गवते, लव्हाळे भरपूर असून ⇨शेवाळी व दगडफुले [⟶ शैवाक] यांचे जाड आवरण जमिनीवर हिरवळीप्रमाणे पसरलेले आढळते. अति-उंच डोंगरावर वरच्याप्रमाणे समुदायांचे पट्टे असून प्रथम उपक्षुपवन (लहान झुडूपवजा वनस्पतीची वाढ) व त्यानंतर पर्वतीय शाद्वले [ नरम व उंच गवतांचे प्रदेश ⟶ गवताळ प्रदेश गवते] व कुरणे (चराऊ राने) असतात. यापुढे अधिक उंच जावे तसे हेच समुदाय अधिकाधिक विरळ होत जाऊन शेवटी फक्त उघड्या खडकांवरची शेवाळी व दगडफुलेच आढळतात. कारण इतक्या उंचीवर बर्फाचे थर कमीअधिक प्रमाणात सतत असतात. दक्षिण ध्रुवावर फक्त दोन फुलझाडे असल्याची नोंद आहे.

उष्ण कटिबंधातील समुद्रकिनाऱ्यांच्या काठाने काही ठिकाणी खारट दलदली असून त्यांतील विशिष्ट वनस्पतींची एक कच्छ वनश्री बनते. [⟶ वनश्री, कच्छ].

प्रस्तुत नोंदीत ज्या देशांचा उल्लेख केला आहे, त्यांवरील स्वतंत्र नोंदीत तेथील वनस्पतींची माहिती दिलेली आहे तसेच ज्या वनस्पतींचा वर उल्लेख केला आहे त्यांच्या स्वतंत्र नोंदी आहेत त्या पहाव्यात.

पहा : गवताळ प्रदेश टंड्रा तैगा परिस्थितिविज्ञान पादपजात वनविद्या वनश्री वृक्ष.

संदर्भ : 1. Cain, S. A. Foumdations of Plant Geography, New York, 1971.

            2. Croirat, L. Manual of Phytogeography, The Hague, 1952.

            3. Eyre, S. R. Vegetation and Soil : A World Picture, Chicago, 1968.

            4. Good, R. The Geography of Flowering Plants, London, 1974.

            5. Hardy, M. E. A. Junior Plant Geography, London, 1954.

            6. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

            7. Polunin, N. Introduction to Plant Geography, New York, 1960.

            8. Schimper, A. F. W. Plant Geography upon Physiological Basis, Oxford, 1903.

            9. Wuiff, E, V. An Introduction to Historical Plant Geography, Waltham, 1943.

घन, सुशीला प. परांडेकर, शं. आ.