शिसवी (डाल्बर्जिया सिसू) : पाने, फुलोरे व शेंगा यांसह फांदी.

शिसवी : (शिसम हिं. शिशम, शिशू गु. सिसम क. अगरू, बिरिदी सं. शिंशपा, अगरू लॅ. डाल्बर्जिया सिसू कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-पॅपिलिऑनेटी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक मोठा पानझडी वृक्ष. भारतात बहुतेक ठिकाणी तो आढळतो. मात्र पंजाब, उत्तर प्रदेश, प. बंगाल, उपहिमालयी प्रदेश व आसाम या भागांत त्यांची भरपूर लागवड केलेली आढळते.

शिसवीच्या वृक्षाचे खोड १८–२० मी. क्वचित ३० मी. उंच असते. फांद्या अनेक व पसरट असून कोवळेपणी सर्व भाग लवदार असतात. पाने संयुक्त, एकाआड एक, पिसासारखी व विषमदली असतात. टोकाकडील दल अधिक मोठे व सर्वांत खालचे दल लहान असते. प्रत्येक दल काहीसे गोलसर, लांबट टोकाचे व आखूड देठाचे असते. पानांच्या बगलेत अनेक कणिशांच्या बनलेल्या शाखायुक्त लवदार परिमंजरीयुक्त फुलोऱ्यावर, फिकट पिवळी, देठ नसलेली लहान फुले मार्च–जूनमध्ये येतात. त्यांची संरचना व इतर शारीरिक लक्षणे ⇨लेग्युमिनोजी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. शेंग दोन्हीकडे टोकदार, लांब देठाची, पातळ, पट्टीसारखी गुळगुळीत, न तडकणारी असून तिच्यावर काहीशा पीळदार शिरा असतात. बिया १–४, सपाट व काजूच्या आकाराच्या असतात.

वाळू, खडे, गोटे मिश्रित भुसभुशीत जमिनीत शिसवीची वाढ चांगली होते. बंगालमधील दुआबातील नदीकाठीलगतच्या प्रदेशात याची चांगली वाढ झालेली आढळते चिकण मातीत त्याची वाढ खुरटते. याची लागवड रोपे लावून तसेच बिया लावूनही करतात. कोरड्या प्रदेशात मुनवे लावून तसेच खुंट लावूनही लागवड करतात. शिसवीच्या रोपवनात मधेमधे तुतीची लागवडही बहुधा करतात. बागायती पिकांच्या जमिनीतील वृक्षांचा घेर २५–३० वर्षांत १·२ मी. होतो. सुमारे २० महिन्यांत त्यांची उंची ६·९ मी. पर्यंत जाते. ओंडके भरपूर लांब व सरळ असतात. रस्ते व नदीकाठच्या प्रदेशातील वृक्षांची खोडे वेडीवाकडी व खुजट असतात.

शिसवीच्या लाकडातील रसकाष्ठ पांढरे ते फिकट तपकिरी आणि मध्यकाष्ठ सोनेरी पिंगट ते गर्द पिंगट असून त्यात गर्द रंगाच्या रेषा असतात. त्याचा टिकाऊपणा त्यावर रापविताना केलेल्या प्रक्रिया व वापराचा प्रकार यांवर अवलंबून असतो. त्याचा उपयोग उच्च दर्जाचे सजावटी सामान, पेट्या व कपाटे तयार करण्यासाठी करतात. शिवाय आगगाडीचे शिळेपाट, विविध प्रकारच्या लाकडी वस्तू, फर्निचर, हातोड्यांचे दांडे, बुटाचे तळवे इत्यादींसाठी त्याचा उपयोग करतात. शिसवीच्या मध्यकाष्ठापासून ५·३५% फिकट तपकिरी रंगाचे स्थिर तेल मिळते. ते न सुकणारे व उच्च तापमानाने अपघटन न होणारे असल्यामुळे त्याचा उपयोग अवजड यंत्रात वंगण म्हणून करतात.

शिसवीची पाने कडू व उत्तेजक असून त्यांचा काढा पर्म्यावर गुणकारी असतो. पाने गोडेतेलात खलून त्यांचा लेप जखमांवर लावतात. पाला जनावरे आवडीने खातात. मोळे स्तंभक असून लाकडाची भुकटी व बियांचे तेल त्वचारोगांवर उपयुक्त असते. शेंगात दोन टक्के टॅनीन असते.

कानिटकर, उ. के.