अट्टाक: (चंपेर क. हण-संपिगे लॅ. फ्लॅकोर्टिया माँटॅना कुल-फ्लॅकोर्टिएसी). या मध्यम आकाराच्या काटेरी वृक्षाचा प्रसार कोकण, प. घाट व कारवार येथील सदापर्णी जंगलात आहे. साल पातळ, करडी व गुळगुळीत फुलांच्या फांद्या बिनकाटेरी व लवदार पाने साधी, मोठी, अंडाकृती किंवा लांबट, दातेरी, चिवट, गुळगुळीत, वर चकचकीत पण खाली केसाळ. स्त्री-व पुं-पुष्पे भिन्न झाडांवरच्या दाट लवदार मंजऱ्‍यांवर जानेवारी-फेब्रुवारीत येतात. फुलांना पाकळ्या नसतात. फळ अश्मगर्भी (बाठा असलेली), शेंदरी व बोराएवढे बिया अनेक. याच्या लाकडाला चमक असून ते बळकट पण दुर्गंधी असते. कारवारात घरबांधणीकरिता वापरतात. पूर्ण पिकलेले फळ आंबट व खाद्य असते त्याची जेली करतात.

पहा : फ्लॅकोर्टिएसी.

जमदाडे,ज.वि.