बंटीच्या दोन जाती : (अ) एकिनोक्लोआ क्रुसगल्ली (आ) ए. स्टॅग्निना.बंटी : (बरटी). ⇨ ग्रॅमिनी कुलातील (तृण कुलातील) एकिनोक्लोआ या वंशातील दोन जातींची गवते ‘बंटी’ अथवा ‘बरटी’ या नावाने ओळखली जातात. दोन्ही जातींचा उपयोग गरीब लोकांचे धान्य आणि गुरांचा चारा यांसाठी केला जातो. यांखेरीज आणखी दोन जाती (ए. कोलोनम व ए. फ्रुमेंटॅशिया) भारतात आढळतात. त्यांचाही कमी प्रमाणात तसाच उपयोग केला जातो.

(१) एकिनोक्लोआ क्रुसगल्ली (पॅनिकम क्रुसगल्ली इ. बार्नयार्ड मिलेट) : हे १ ते १·२५ मी. उंचीचे वर्षायू (जीवनक्रम एका हंगामात पूर्ण होणारे) गवत लागवडीत आहे. याची पाने सपाट व पट्टीसारखी असून याचे दाणे गुळगुळीत व अंड्याच्या आकाराचे असतात. असतात. भारतात ते सु. २,००० मी. उंचीपर्यंत सर्वत्र आढळते. भाताच्या शेतात ते सर्वसामान्यपणे आढळून येणारे तण आहे. त्याचा उपयोग विशेषेकरून मुरघासाकरिता करतात. रक्तस्त्राव थांबविण्यासाठी आणि पानथरीच्या रोगांतही ही वनस्पती वापरतात. हलक्या जमिनीत त्याची लागवउ करतात. उ. गुजरातेत फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये पेरणी करतात. महाराष्ट्रात नासिक, धुळे, जळगाव, जिल्ह्यांतच या पिकाचे क्षेत्र केंद्रित झालेले आहे. जुलैमध्ये पाभरीने ३० सेंमी. अंतरावर पेरणी करतात व त्यासाठी हेक्टरी ८-१० किग्रॅ. बी वापरतात. कापणी ऑक्टोबरमध्ये करतात. यापासून हेक्टरी ५०० ते ८०० किग्रॅ. दाणे अणि १,२०० किग्रॅ. पेंढा मिळतो. ईजिप्तमध्ये खार जमिनी सुधारण्यास ह्या गवताची लागवड करतात.

(२) ए. स्टॅग्निना (पॅ. स्टॅग्निनम) : हे सु. ०·९ ते १·२५ मी. उंचीचे वर्षायू किंवा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) गवत भारतात सर्वत्र आढळते. साचलेल्या पाण्यात, शेतात अगर दलदलीच्या जागी हे अर्धवट बुडालेल्या स्थितीत आणि सरोवरे व तळ्यांच्या काठांवर वाढते. पिकाखालील शेतातही हे वाढते. याचे खोड मऊ व रसाळ, पाने सपाट व पट्टीसारखी असून त्यांवर जांभळे पट्टे असतात. गुरेढोरे व घोडे यांच्यासाठी ओली अगर वाळलेली वैरण म्हणून हे गवत फार उपयुक्त आहे. गरीब लोक दुष्काळात याचे दाणे भातासारखे उकडून खातात. याच्या खोडात सु. १७% साखर असते. खोडांचा रस आटवून काकवी किंवा तो आंबवून मद्य (बिअर) अगर शिर्का (व्हिनेगार) तयार करतात. या गवताचा घरांच्या छपरासाठी व भेंडाचा नावांच्या भेगा बुजविण्यासाठी उपयोग करतात. फिलीपीन्समध्ये भेंडाचा काढा लघवी साफ होण्यास घेतात.

जमदाडे, ज. वि. तत्त्ववादी, गो. रा.