वनस्पति, विषारी : सर्वसाधारण प्रकृतीच्या मनुष्याला ज्या वनस्पतींशी निकट संबंध आल्याने, त्याच्या शरीरव्यापारात अडथळे येऊन वेदना होतील, गंभीर स्वरूपाचा त्रास होईल अथवा जीवनव्यापार सर्वस्वी थांबून क्वचित मृत्यूही ओढवेल अशा वनस्पतींना ‘विषारी वनस्पती’ असे व्यापक अर्थाने म्हटले जाते. इतर सामान्य प्राण्यांना (उदा., मासे, कुत्री गुरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, घोडे इ.) अशाच प्रकारचा त्रास देणाऱ्या वनस्पतींचाही येथेच अंतर्भाव केला जातो. त्रासाला कारणीभूत असणाऱ्या वनस्पतींतील विशिष्ट पदार्थांना ‘विष’ असे मानतात. विषाच्या परिणामाची गंभीरता विषाच्या प्रमाणावर व तीव्रतेवर (जहालपणावर) अवलंबून असते. ऋतुमान व जमीन यांवरही वनस्पतीचा विषारीपणा अवलंबून असतो, तसेच जंगली व लागवडीतल्या जाती यांच्या विषारीपणात फरक पडतो, असे आढळले आहे. मनुष्याच्या बाबतीत, प्रकृतीतील व्यक्तिगत फरक विषाच्या परिणामाच्या बाबतीत थोडेफार प्रभावी ठरतात. अशी कित्येक विषे सूक्ष्मप्रमाणात रोगावर गुणकारी ठरली आहेत, मात्र अधिक प्रमाणात चुकून किंवा बळेच घेतल्याने बाधक ठरतात. विशिष्ट विषाचा प्रभाव सामान्यपणे सर्व मनुष्यां वर किंवा इतर सामान्य प्राण्यांवर सारखाच आढळतो. विषबाधा झाल्याची लक्षणे सारखीच दिसतात.  

विषारी पदार्थ एखाद्या वनस्पतीच्या सर्वच भागात व नेहमीच असतो असे नाही, उदा., कुचल्याच्या बियांत विष असते पण फळातील मगजात (गरात) फारच कमी असते. गुंजेची पाने गोड असून विषारी नसतात पण बियांच्या टरफलात विषारी पदार्थ असतो. फुले येण्यापूर्वी जोंधळ्याचे खोड व पाने गुरांना विषारी असतात. कित्येक वनस्पतीत फक्त सालीत विष असते, तर काहींच्या शरीरावरील केसांत असते. टॅपिओकाच्या मुळातील आणि गुंजेच्या बियांतील विषारीपणा उकडल्यावर (शिजल्यावर) कमी होतो. वनस्पतींच्या प्रजातीतील एखाद्या जातीत विष आढळते पण केव्हा केव्हा सर्व जातीत आढळते (उदा., बचनाग, धोतरा, रुई), क्रुसीफेरी कुलातील (मोहरी, मुळा, नवलकोल, फुलकोबी इत्यादींचे कुल) वनस्पतींत विष बहुधा असत नाही, असे आढळते परंतु याउलट ॲरॉइडी (सुरण, अळू इत्यादींचे कुल), यूफोर्बिएसी (एरंड, शेर, जमालगोटा इत्यादींचे कुल), ॲपोसायनेसी, लोगॅनिएसी, ॲस्क्लेपीएडेसी, अर्टिकेसी, सोलॅनेसी, अंबेलिफेरी इ. कुलांतील अनेक वनस्पतीत विषारीपणा आढळतो. सामान्यपणे चीक असलेल्या वनस्पतींची पूर्णपणे माहिती नसल्यास जपूनच वागावे लागते कारण त्यांचे विषारीपणाशी अधिक सख्य असल्याचे आढळून आले आहे. 

कित्येक विषे फार पूर्वीपासून विषारी परिणाम मुद्दाम घडवून आणण्यासाठी उपयोगात आहेत, उदा., मासे पकडण्याअगोदर त्यांची हालचाल मंद करण्यास किंवा त्यांना गुंगविण्यास, द्वेषप्रेरित हेतूने गुरेढोरे ठार मारण्यास, गर्भपात करण्याकरिता अथवा शत्रूस मारण्यासाठी त्याच्या अन्नात मिसळण्यास विषप्रयोग केला जातो, ही गोष्ट परिचित आहे. जंगली, आदिवासी इ. लोक अजुनसुद्धा बाणांच्या किंवा भाल्याच्या टोकास विषाचा सर्रास लेप देतात. खाली दिलेल्या काही सामान्य विषारी वनस्पतींच्या माहितीवरून याची सत्यता पटेल. यापैकी *अशी खूण केलेल्या वनस्पतींखेरीज इतर सर्व वनस्पतींवर मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत.  

अंकोल : (ॲलजियम साल्व्हिफोलियम). मुळाच्या सालीतील सत्त्व भयंकर वांत्या करणारे व हृदयक्रिया मंदावणारे असते.  

अटकी *: (मीसा इडिका). माशांना विषभाधा करण्यास पानांचा उपयोग करतात.  

अतिविष: (ॲकोनिटम हेटेरोफायलम). मुळे विषारी रसामुळे भयंकर गुंगी येते, नाडी मंद होते व श्वासोच्छ्‌वासात अडथळे येतात.  

 

आंबा : (जिफेरा इंडिका). फळाची साल व खोडातील रस (चीक) पोटात विशेष प्रमाणात गेल्यास मळमळ, वांत्या, अतिसार, चर्मदाह इ. विकार होतात.  

आग्या : (अर्टिका इंटरप्टा) खोड व पाने यांवरील केसाचा कातडीशी संपर्क झाल्यास भयंकर खाज सुटते. 

इंगळी : (समुद्रफळ बॅरिग्टोनिया ॲक्युटॅंग्यूला). सालीचे चूर्ण माशांना विषारी असते.  

उंबळी* : (कुंबल नीटम उला). पाने माशांना विषारी असतात. (नीटेलीझ)  

उरा : (सेपियम इन्सायने). चिकट दुध्या रसाने कातडीवर फोड येतात.  

कडू कवठ* : (हिदनोकार्पस लॉरिफोलिया). फळे माशांना विषारी असतात.  

कडू एडवळ* : (ट्रायकोसॅंथस कुकुमारिना). मुळे, पाने व फळांचा रस जास्त प्रमाणात पोटात घेतल्यास वांत्या व मोठे रेच होतात. [⟶ पडवळ]  

कडवी नाई* : (कोरॅलोकार्पस एपीजी). मुळांचा रस घेतल्याने सव अन्ननलिकेत आग होते व भयंकर वांत्या, मूर्च्छा, जुलाब इ. होतात.

कण्हेर: (लाल कण्हेर नेरियम ओडोरम). मुळे, खोड, पाने व फुले इत्यादींचा रस, विशेषतः मुळांच्या सालीचा रस, पोटात गेल्यास हृदयक्रिया मंदावते किंवा थांबते व मृत्यु येतो. मेंदू व ज्ञानतंतूवर अनिष्ट परिणाम व धनुर्वात होतो, तो रस चर्मरोगावरील औषधात वापरतात.

कण्हेर, पिवळी : (थेवेशिया नेरेफोलिया). फळे व बी यांचा रस पोटात गेल्यास वांत्या, आचके, हृदयक्रियेवर दुष्परिणाम इ. होतात.

कलांचो : (कलांचो स्पॅथ्युलॅटा). पानांच्या रसाने जुलाब होतात, गुरे व शेळ्यांनाही विषबाधा होते.  

कळलावी : (ग्लोरिओसा सुपर्वा). गड्डा खाल्ल्यास भयंकर ओकाऱ्या व वेदना होतात.

कांगणी : (ब्लॅक नाइटशेड सोलॅनम नाग्रम). फळे विषारी असतात. खाल्ल्यावर पक्षाघात, ग्लानी, लाळ सुटणे, वांत्या, अतिसार, फूग येणे इ. विकार होतात.  

काकमारी : (ॲनॉमिर्टा कॉक्यूलस). विषारी बिया मासे मारण्यास व मद्रासकडे गुरांना मारण्यात उपयोगात आणतात.  

काजू : (ॲनाकार्डियम ऑक्सिडेंटेल). काजू फळाच्या सालीतील तेल आणि पानातील व खोडावरील सालीतील रस विषारी, कातडीस लागल्यास दाह, लाली व सूज येते, फोडही येतात.  

कारवी: (कारबिया कॅलोसस). ताजी पाने पौष्टिक व तापावर औषध म्हणून घेतात परंतु कधीकधी त्यांपासून भयंकर वांत्या, जठरशोथ(जठराची दाहयुक्त सूज) इ. होतात.  


 कारीट : (कुकुमिस ट्रायगोनस). फळातील कडू मगज खाल्ल्यास पोटात आग होऊन भयंकर जुलाब होतात गर्भपात होतो. 

कुचला : (काजरा स्ट्रिक्नॉस नक्स-व्होमिका) बियांतील स्ट्रिकनीन हे अल्कलॉइड पोटात गेल्यास तंत्रिका तंतू (मज्जातंतू) व स्नायू यांवर अनिष्ठ परिणाम, धनुर्वात, रक्तदाब वाढणे, नाडी मंद होणे, आकडी इ. विकार होतात मलायात याचे सत्त्व बाणाच्या टोकांना लावतात.

कोद्रा : (पॅस्पॅलम स्क्रोबिक्युलेटम). नवीन धान्याचे दाणे खाल्यास गुंगी येते तसेच खाल्ल्यास गैरशुद्धी, बडबड, कापरे, मंद नाडी इ.विकार होतात.  

कौंडळ* : (ट्रायकोसॅंथस पामेटा) फळाची साल व मगज पोटात गेल्यास तीव्र रेचक गुरांना हे विष मारक ठरते.  

खाजकुइली : (म्युक्यूना प्रूरिएन्स). शेंगांवरील राठ केसाशी कातडीचा संपर्क आल्यास भयंकर खाज सुटते व गांधी उठतात.  

खाजकोलती : (ट्रॅजिया इन्व्होल्यूक्रॅटा). मुळाखेरीज सर्व भागांवरचे केस विषारी असतात, संपर्क झाल्यास भयंकर खाज सुटते व गांधी येतात.  

खाजोटी, मोठी : (जिरार्डिनिया हेटेरोफायलाजि. झेलॅनिका) मुळाखेरीज सर्व भागांवरचे केस विषारी असतात, संपर्क झाल्यास परिणाम वरीलप्रमाणे होतो.  

गांजा : (भांग कॅनाबिस सॅटिव्हा), पाने व फुले यांचा रस पोटात घेतल्यास भयंकर गुंगी येते. 

गुंज : (ॲब्रप्रिकॅटोरियस), बी जास्त प्रमाणात खाल्ल्यास मृत्यू येतो.  

गेवा : (एक्स्कोकॅरिया अगलोचा) दुधासारखा चीक कातडीस लागल्यास फोड येतात व आग होते चीक रेचक व गर्भपातक डोळ्यात गेल्यास अंधत्व येते, फिजी बेटातील लोक कुष्ठावर वापरतात, मत्स्यविष.

गेळा : (रँ डिया ड्युमेटोरम), मुळांचे चूर्ण माशांना विषारी असते.

घेवडा, श्रावण : (फॅसि व्हल्गॅरिस) मूळ खाल्ल्यास घेरी येऊन आजार होतो.

चांदकुडा : (अँटिॲरिस टॉक्सिकॅरिया) खोडाची साल विषारी, रस बाणांना लावण्यास वापरतात.

चाफा, भुई : (केंफेरिया रोटुंडा) गड्‌ड्याचा रस पोटात गेल्यास भयंकर लाळ सुटते व ओकाऱ्या येतात.

चित्रक : (प्लंबॅगो झेलॅनिका). मूळ विषारी, मुळाच्या सालीचा लेप लावल्यास आग होते व कातडीवर फोड येतात, विष पोटात गेल्यास जिवास धोका असतो, गर्भपातही होतो.

चित्रक लाल*: (प्लंबॅगो रोजिया). मूळ विषारी, बाधावरील प्रमाणे [⟶ चित्रक].

 

चिल्ला : (कॅसिॲरिया टोर्मेटोजा). फळांचा दुधी रस माशांना विषारी असतो.

जमालगोटा : (कोटॉन टिग्लियम). बी अथवा तिचे तेल पोटात गेल्यास भयंकर जुलाब होऊन जिवास धोका पोहोचतो, तेल कातडीस लागल्यास फोड येतात, फुले व पाने चुरगाळून माशांना विषारी द्रव्य तयार करतात.

जलमुखी : (अम्मानिया बॅक्सिफेरा). पाने कुस्करून लावल्यास कातडीवर फोड येतात, रस पोटात गेल्यास तीव्र वेदना व ओटीपोटात भयंकर दाह होतो.

ज्वारी : (सोर्वम व्हल्गेर). फुले येण्यापूर्वी झाडपाला गुरांनी खाल्ल्यास विषबाधा होते. गुंगी येते, पोट फुगते, शेवटी मृत्यूही येतो.

टॅपिओका : (कसावा मॅनिहॉट एस्क्युलेंटा). कच्च्या मुळांच्या रसामुळे आचके येतात.

डिफेनबेकिया : (डिफेनबेकिया सेग्िने). झाडांचा रस पोटात गेल्यास भयंकर त्रासदायक होतो. जिभेला थोडाही लावल्यास लुळेपणा कित्येक दिवसपर्यंत राहतो.

डेल्फिनियम : (डेल्फिनियम) सर्व भाग विषारी असतात तोंड व कातडीची आग होते भोवळ, वांत्या, अतिसार, अस्वस्थता, रक्तदाब खाली येणे, मंद नाडी व आचके इ. विकार होतात.

ताग : (ज्यूट कॉर्कोंरस कॅप्सुलॅरिसकॉ. ओलिटोरियस). खोड विषारी, दमा व नासिकदाह होतो.

दंती : (बॅनिओस्पर्मम माँटॅनम). बी जास्त खाल्ल्यास भयंकर जुलाब होऊन जिवास धोका संभवतो.

देवनळ : (लोबेलिया निकोटिनीफोलिया). पाने व बी अम्लीय व विषारी असून सुकलेल्या झाडापासून घसा व नाकपुड्यांची आग होते. धोतऱ्याप्रमाणे परिणामकारक असते.

 

धोतरा, काळा* : (दत्तुरा फॅस्टुओजा). सर्व भाग विषारी असून विशेषतः बी पोटात जाणे जास्त हानिकारक असते गैरशुद्धी, जलद श्वासोच्छ्वास, मंद नाडी, आचके, असंबद्ध बडबड असे परिणाम होतात. [⟶ धोतरा].

निवडुंग, त्रिधारी* : (यूफोर्बिया अँटिकोरम). दुधी चीक डोळ्यास लागल्यास कायम आंधळेपणा येतो, तो चीक तीव्र वांतिकारक व रेचक असतो. [⟶ निवडुंग].

पराया : (करवती, खरोटा स्ट्रेब्लस ॲस्पर) पिवळी फळे खाद्य पण खोडाची साल विषारी असते. [⟶ पळस].

पांढरफळी : (सेक्युरिनेगा व्हिरोजा). सर्व भाग माशांना गुंगी आणतात.

बकुळ : (मिम्युसॉप्स एलेंगी). सालीच्या रसाने पडजीभ व तोंडातील त्वचेस सूज येते व बराच वेळ सतत पाणी सुटते.

बचनाग : (ॲकॉनिटम फेरोक्स ॲ. नॅपेलस). मुळे विषारी, रसामुळे भयंकर गुंगी येते, नाडी मंद होते व श्वासोच्छ्‌वासात अडथळे येतात.

बिब्बा: (सेमेकार्पस ॲनाकार्डियम). फळाच्या सालीतील तेलाने कातडीवर सू ज व फोड येतात आणि जखमही होते.

बेला डोना : (ॲट्रोपा बेलडोना), फळे विषारी असून परिणाम धोतऱ्याप्रमाणे होतात.

बेहडा : (टर्मिनॅलिया बेलिरिका) बियांतील मगज खाल्ला असतासुस्ती येते डोकेदुखी, पोटात अस्वस्थता व ओकाऱ्या येतात.

बोखरा : (कॅसिॲरिया ग्रॅव्हिओलेन्स). पानांचा रस मनुष्यांना विषारी व फळांचा रस माशांना विषारी असतो. [⟶ चिल्ला].

भद्रदंती : (जट्रोफा मल्टिफिडा). बी विषारी, खाल्ल्यास मोगली एरंडाप्रमाणे पण अधिक बाधा होते, तेलाने गर्भपात होतो, भोवळ, वांत्या, रक्तातिसार, बेशुद्धी इ. परिणाम होतात.

भोपळा, दुधी : (लॅजिनेरिया सायसेरेरिया). याचा कडू प्रकार तीव्र रेचक असतो.

मोगली एरंड* : (जट्रोफा कुर्कास). बी खाल्ल्यास वांत्या, जुलाब व पोटात वेदना होतात. [⟶ एरंड, जंगली].

मोह : (मधुका इंडिका). बियांचे तेल काढून राहिलेली पेंड माशांना विषारी असते.

युका : (युका ग्लोरिओजा). मुळे विषारी, योग्य प्रमाणात मलशुद्धी करणारी आहेत.

यू * : (टॅक्सस बॅकेटा). लाकूड, साल, पाने व बी सर्व विषारी खाल्ल्यास वांत्या, भोवळ, अतिसार, आचके इ. विकार होतात. [⟶ टॅक्सेलीझ]


 रताळे : (आयपोमिया पटाटाज). पाने खाल्ली असता ओकाऱ्या व जुलाब होतात.

रामेठा : (लॅसिओसायफन एरिओसेफॅलस). पाने कडू, तिखट व विषारी खोडाची साल माशांना विषारी असते.

रिठा : (सॅपिंडस ट्रायफोलिएटस). फळे व त्यांचा पातळ फेस माशांना विषारी असतो.

रुई : (कॅलॉट्रॉपिस जायगॅंशिया). सर्व भाग विषारी, रस कातडीस लागल्यास आग होते, पोटात घेतल्यास वांत्या व जुलाब होतात.

 

ऱ्हाडोडें ड्रॉन : सर्व भाग विषारी पोटात गेल्यास लाळ सुटणे, अश्रु येणे, नाक वाहणे, वांत्या, आचके, मंद नाडी, रक्तदाब खाली येणे, पक्षाघात इ. विकार होतात.

लाख : (लॅथिरस सॅटिव्) बियांच्या तेलाने भयंकर रेच होतात अधिक घेतल्यास पक्षाघात, मंद नाडी, श्वसन मंद होणे, आचके येणे इ. विकार होतात. [⟶  लाख-२]

वुडी नाइटशेड*: (कटुगोड, बिटरस्वीट सोलॅनम डलकॅमेरा)फळे विषारी असून खाल्ल्यावर कांगणीप्रमाणे (ब्लॅक नाइटशेडप्रमाणे) विकार होतात. [⟶ नाइटशेड].

 

शिरीष पांढरा : (किन्हई ॲल्बिझिया प्रोसेरा). सालीचे चूर्ण पाण्यात टाकल्याने माशांना गुंगी आणते. [⟶ शिरीष]

शेर, नांग्या : (युफोर्बिया तिरकाली). दुधी चीक अंगास लागल्यास फोड येतात व पोटात गेल्यास वांत्या व जुलाब होतात. माशांना विषारी असते.

सुकाणू : (सेर्बेरा ओडोलम). फळातील गराने आग होते, बाठा मादक व विषारी, हिरवे फळ कुत्र्यास विषारी असते.

सुरण : (ॲमोर्फोफॅलस कपॅन्युलेटस). रानटी जातीचा गड्डा खाल्ल्यास तोंड, घसा, जीभ व सर्व अन्ननलिका यांना खाज सुटते. पिकवलेली जात खाल्ल्यास सूज येते व लाळ सुटते, बाकी लक्षणे वरीलप्रमाणे पण कमी प्रमाणात असतात. शिजविताना आंबट फळे (चिंच वगैरे) व मीठ घातल्यास विषारीपणा जातो.

सूर्यावर्त : (क्रोझेफोरा प्लिकॅटा). मुळाशी कातडीचा संपर्क झाल्यास फोड येतात.

हुरा* : (हुरा केपिटान्स), दुधी चीक लागल्यास डोळे जातात, पोटात गेल्यास भयंकर रेच होतात व मृत्यूही संभवतो.

यांखेरीज अरण, गुलबुश, वत्सनाभ, सापकांदा इ. अनेक वनस्पती कमीजास्त प्रमाणात विषारी आहेत. गवतावर वाढणाऱ्या ⇨ अरगट (लॅव्हिप्स परप्यरिया) या कवक वनस्पतीची (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीची) कुडी (काळी व सु. २सेंमी. लांब व अर्धा सेंमी. व्यासाची) धान्यातून किंवा चाऱ्यातून पोटात गेल्यास फारच गंभीर परिणाम होतात. शरीरातील अनैच्छिक स्नायूं वर (विशेषतः गर्भायाच्या स्नायूंवर) उद्दीपक परिणाम होऊन जनावरांमध्ये अकाली गर्भपात होतो व क्वचित मृत्यूही येतो. मनुष्याच्या रक्तभिसरणावर व तंत्रिका तंतूवरही अनिष्ट परिणाम होतात, हातापायाची बोटे बधिर होऊन ती सडू लागतात कापरे भरणे, झटके येणे इ. प्रकार घडतात. सूक्ष्म प्रमाणात अरगटातील द्रव्य (अरगोमेट्रीन) स्त्रियांना बाळंत झाल्यावर टोचतात. त्यामुळे रक्तस्त्राव थांबून गर्भाशय आकुंचन पावण्यात मदत होते व त्यामुळे टाकाऊ पदार्थाचे त्वरित विसर्जन होते. काही प्रकारच्या बुरशी (उदा. ॲस्परजिलस) व सूक्ष्मजंतू यांच्यामुळे आंबलेले, नासलेले व कुजलेले पदार्थ खाल्ल्यास विषबाधा होते, हे परिचित आहे. तसेच अनेक भूछत्रे विषारी असतात.

संदर्भ :  1. Chopra, R. N. and others, Poisonous Plants of India, New Delhi, 1965.  

           2. Dreisbach, R.H. Handbook of Poisonling, Los Altos, 1963.

           3. Hardin. J.W. Arena, J.M. Human Poisoning from Native and Cultivated Plants, Durham, N.C. 1974.

           4. Kingsbury, J.M. Deadly Harvest: A Guide to Common Poisonous Plants, Englewood Clffs, N.J. 1946.  

           5. Kirtikar. K.R. Poisonous Plants of Bombay, 1903.

           6. Lewis, W.H. Elwin-Lewis, M.P.F. Medical Botany : Plants Affecting Man’s Health, New York, 1977.  

परांडेकर, शं. आ.