कार्नेशन : (इं.पिंक लॅ. डायांथस कॅरिओफायलस  कुलकॅरिओफायलेसी). या शोभिवंत वनस्पतीचे मूलस्थान दक्षिण यूरोप असून हल्ली ती सर्वत्र बागेत लावतात. लॅटिन भाषेत ‘डायांथस’ म्हणजे देवाचे फूल आणि ‘कॉर्निस’ म्हणजे मांस. या वनस्पतीच्या फुलांचा रंग मांसासारखा असल्याने कार्नेशन नाव पडले. ही ओषधी [→ओषधि]  ३०–९० सेंमी. उंच खोड शाखित, शाखायुक्त काष्ठमय  व फुगीर पेऱ्यांचे. पाने जाड, रेषाकृती व समोरासमोर. सच्छद फुले बहुधा टोकास व एकाकी येतात संवर्त नळीसारखा पाकळ्या पाच व सुट्या. पाकळीचा खालचा भाग उभा व अरुंद, वरचा भाग पसरट केसरदले पाच किंजदले पाच आणि जुळलेली [→फूल]. फळ (बोंड) शुष्क. लागवडीखालील प्रकार त्यांच्या सुंदर रंगांच्या व मधुर लवंगांसारख्या सुवासाच्या फुलांकरिता प्रसिद्ध आहेत. तथापि मूळची फुले पांढरी असतात.

कार्नेशन (डायांथस चायनेन्सिस) : (१) कळी व फुलासह फांदी, (२) फुलाचा उभा छेद.

या झाडांची अभिवृद्धी दाब किंवा छाट कलमांनी आणि बियांपासूनही करतात. शेणखत किंवा पालापाचोळ्याचे खत घालून तयार केलेली सुपीक दुमट जमीन यांना चांगली मानवते. मैदानी प्रदेशात पावसाळ्याच्या अखेरीस मुळे फुटलेली छाट कलमे किंवा रोपे लावतात. फुले ऑक्टोंबर ते एप्रिलपर्यंत मिळतात. अमेरिकेत या फुलांचा गुलाबाखालोखाल खप असतो. ‘शेंदरी कार्नेशन’ ओहायओ राज्याचे फूल समजतात.

पिंक चायना : (इं.इंडियन पिंग, रेनबो पिंग लॅ. डायांथस चायनेन्सिस ). ही कार्नेशनची दुसरी जाती द्विवर्षायू किंवा बहुवर्षायू (दोन किंवा अनेक वर्षे जगणारी) ओषधी असून १५–७५ सेंमी. उंच वाढते. फक्त शेंड्याला फांद्या येतात. पाने बिनदेठाची फुले आकर्षक निरनिराळ्या रंगांची, एकेरी किंवा दुहेरी परंतु बिनवासाची असतात.

जपानी पिंग प्रकार (लॅसिनेट्‌स) व फ्रिंज्ड पिंक (हेड्‌डेविगी) जपानमधून भारतात आणलेले आहेत त्यांना मोठी फुले येतात.

फुले येऊन वाळलेले कार्नेशन चीनमध्ये मूत्रल (लघवी साफ करणारे), कृमिनाशक, गर्भपातक म्हणून व मलायात परम्यावर वापरतात. भारतात कार्नेशन शोभेसाठी बागेत जावतात.

पहा : कॅरिओफायलेसी.

जमदाडे, ज.वि. चौधरी, रा.मो.