पांशी : पाने व फुलोरापांशी : (पुंशी, फणशी, शेंगळी क. अंदिपुनरू इं. कॅरालिया वुड लॅ. कॅरालिया इंटेजेरिमा. कॅ. ब्रॅकियाटा कुल-ऱ्हायझोफोरेसी). सु. १२–१५ मी. उंची व १·५–१·८ मी. घेर असलेला हा सदापर्णी वृक्ष भारतात सर्वत्र पण तुरळकपणे आढळतो शिवाय अंदमान बेटे, आसाम, ब्रह्मदेश, श्रीलंका, मलेशिया, चीन, ऑस्ट्रेलिया इ. प्रदेशांतही आढळतो. खोडावरची साल गडद करडी पातळ पाने साधी, समोरासमोर, गडद हिरवी, गुळगुळीत, चिवट व चकचकीत, ५–९ × २·५–६ सेंमी. व साधारण अंडाकृती असतात. दोन देठांमधील उपपर्णे शीघ्रपाती (लवकर गळून पडणारी) फुले बिनदेठाची, फार लहान, अष्टभागी पिवळट, पांढरी, कक्षास्थ (बगलेतील) वल्लरीत [⟶ पुष्पबंध] फेब्रुवारी ते मार्चमध्ये येतात. मृदुफळे मांसल, खाद्य, गोलसर, वाटाण्याएवढी, लाल व एकबीजी असून एप्रिल ते जूनमध्ये येतात बिया क्वचित दोन प ण सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश असलेल्या) असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ऱ्हायझोफोरेसी  कुलात (कांदल कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. ह्या कुलातील बहुतेक झाडे कच्छ वनश्रीत [⟶वनश्री] आढळतात, परंतु हा अंतर्देशीय आहे. लाकूड लालसर किंवा पिंगट, जड व दर्शनीय असून त्याला चांगली झिलई होते. घरबांधणी, दारे, खिडक्या, जिने, मुसळे, सजावटी सामान, कपाटे, लाकडी जमीन, चित्रांच्या चौकटी, ब्रशांच्या पाठी इत्यादींसाठी वापरतात. बियांचे तेल कारवारात तुपाऐवजी वापरतात. फळे संसर्गजन्य जखमांवर व साल इंडोचायनात खाजेवर लावतात. तोंड आल्यास व घसा खवखवल्यास साल वापरतात. मलाक्कात पानांचा चहा पितात. जहाजांत इंधनाकरिताही याचे लाकूड वापरतात, कारण त्याचे उष्णता मूल्य जास्त असते.

जमदाडे, ज. वि.