सायक्लॅमेन : (कुल-प्रिम्युलेसी).हे फुलझाडांपैकी [⟶वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एका प्रजातीचे शास्त्रीय नाव असून या प्रजातीत सु. १५ जाती आढळतात. या मूळच्या मध्य यूरोप, आल्पीय प्रदेश व भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील असून त्यांचे अनेक प्रकार शोभेकरिता बागेत कुंड्यांतून लावतात. फुलदाणीत ठेवण्याकरिता यांची लांब देठाची फुले सोयीची असतात. ह्या बुटक्या व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) सायक्लॅमेन पर्सिकम (पर्शियन सायक्लॅमेन) : पूर्ण वनस्पती व जवळच दुसऱ्या प्रकारची फुले.ओषधींना [नरम व लहान वनस्पतींना ⟶ ओषधि] खाली जमिनीत मोठे पसरट कंद असतात त्यांच्यापासून जमिनीवर मोठ्या पानांच्या व फुलांच्या लांब देठांचे झुबके येतात. पाने साधी, रुंद, हृदयाकृती किंवा मूत्रपिंडाकृती फुले देठाच्या टोकावर लोंबती, गुलाबी किंवा जांभळी असून पाच संदले व पाच प्रदले तळाकडे वळलेली असतात [⟶ फूल]. हिची इतर सामान्य लक्षणे ⇨प्रिम्युलेलीझ गणात वर्णिल्याप्रमाणे असतात. फलन क्रियेनंतर फुलांच्या देठाचे बहुधा वेटोळे झाल्याने फळ (पंचखंडी बोंड) जमिनीवर पडते. सायक्लॅमेन पर्सिकम (इं. पर्शियन सायक्लॅमेन) ही प्रसिद्घ जाती भारतात विशेषेकरुन थंड हवेच्या ठिकाणी चांगली वाढते. सा. आफिकॅनमसा. निॲपॉलिटॅनम या जातीही भारतात लावलेल्या आढळतात. भारतीय बाजारात ‘बखुरऐ-इ-मिऱ्याम’ या नावाने पर्शियन सायक्लॅमेन मिळते तिचे कंद वांतिकारक, रेचक, आर्तवजनक (मासिक पाळी सुरु करणारे) व मूत्रल ( लघवी साफ करणारे ) असून ते मत्स्यविष म्हणून वापरतात. सा. यूरोपियम ( हिं. हाथजूडी इं. सो-ब्रेड ) यूरोप व कॉकेशियसामध्ये आढळते. तिचे कंद फार विरेचक (पोट साफ करणारे) असतात ते आर्तवजनक व रेचक असून दातदुखी, शूल व मूत्रपिंडातील वेदना यांवरही घरगुती उपचार म्हणून वापरतात. सो-ब्रेड हे इंग्रजी नाव पडण्याचे कारण याचे कंद डुकरे शोधून काढीत असतात, असे सांगितले जाते याचा ‘स्वो-इ-ब्रेड’ असा पाठभेद आढळतो. सायक्लॅमेनाच्या सर्वच जाती थंड व ओलसर हवा आणि निचऱ्याच्या जमिनीत चांगल्या वाढतात. पालापाचोळा व नदीतील वाळूमिश्रित दुमट (चिकणमातीसारख्या) जमीन यांच्या वाढीस पोषक असते.सायक्लॅमेनामध्ये सॅपोनीन व सायक्लॅमीन ही ग्लुकोसाइडे असतात.

पहा : प्रिम्युलेलीझ.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, NewDelhi, 1950.

परांडेकर, शं. आ.; जमदाडे, ज. वि