लक्ष्मणा : (हिं. लुफा इं. मँड्रेक लॅ. मँड्रेगोरा ऑफिसिनॅरम, कुल-सोलॅनेसी. (फुलझाडांपैकी) [⟶वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक विषारी व दुर्गंधी, औषधीय [⟶ ओषधि] आणि बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) वनस्पती. मँड्रेक हे इंग्रजी नाव उ. अमेरिकेत मे ॲपल (लॅ. पोडोफायलम पेल्टॅटम) या वनस्पतीसाठी वापरतात भारतात  

लक्ष्मणा : (१) पाने व फुले यांसह खोडाचा भाग, (२) मांसल मूळ व त्यावर खोडाचा भाग.  आढळणारी  ⇨पादवेल (लॅ. पो. इमोदी) व मे ॲपल या दोन्हीं त वांतिकारक व रेचक गुणधर्म आढळतात. ख्रिश्चन धर्मग्रंथात मँड्रेक ही संज्ञा एका भिन्न वनस्पतीकरिता वापरलेली आढळते. ती वनस्पती ज्या मँड्रेगोरा प्रजातीत घातली आहे, तीत एकूण सहा जाती असून भारतात त्यांपैकी फक्त एकच (मँ. कॉलेसेन्स) हिमालयात (सिक्कीममध्ये सु. ३,६००-३,९०० मी. उंचीवर) आढळते. गुरांना हानिकारक हे दर्शविण्याकरिता मँड्रेगोरा हे प्रजातीचे नाव हिपॉक्राटीझ यांनी प्रथम त्या जुन्या मँड्रेक (मँ. ऑफिसिनॅरम) औषधी वनस्पतीकरिता वापरले व ते पुढे रूढ झाले. यूरोपीय व भारतीय जातींतील गुणधर्मांचे साम्य लक्षात घेऊन लक्ष्मणा या संस्कृत (व हिंदी) नावाखाली येथे दोन्हींची माहिती दिली आहे. चरकसंहितेत (दुसरे शतक) लक्ष्मणाचा उल्लेख शाक वर्गात आला आहे.

मँ. ऑफिसिनॅरम : (ॲदोपा मँड्रेगोरा). हिचे मूलस्थान भूमध्य सामुद्रिक प्रदेश असून खो ड फार लहान, मूळ मांसल व त्याचा खालचा भाग कधी कधी विभागलेला असतो. पाने मोठी, सांधी, तरंगित (नागमोडी) किनारीची, अंडाकृती, पहिली टोकांस गोलसर पण नंतरची लांबट (प्रकुंचित) असतात त्यांचा एक गुच्छच असतो. फुले जांभळी, लहान, घंटेसारखी व पंचभागी असून त्यांचा गुच्छ पानांच्या गुच्छात असतो मृदुफळे शेंदरी, रसाळ व लंबगोल असतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणेसोलॅनेसी अथवा धोत्रा कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. फार प्राचीन काळपासून हिचे मादक गुणधर्म माहीत असून ती त्वचेस बधिरपणा आणते शस्त्रक्रियेपूर्वी ती वापरीत (मुळाची साल उगाळून लावीत) तसेच ती कामोत्तेजक व वंध्यत्वावर उतारा म्हणून वापरीत. तिचे एकूण स्वरूप काहीसे मनुष्याचे धड, मांड्या व पोटऱ्यांशी वरवर साम्य दर्शवीत असल्याने तिच्यासंबंधी पाश्चात्त्य देशांत अदभूत कल्पना फार पूर्वी प्रचलित होत्या. आधुनिक संशोधनानुसार ह्या वनस्पतीच्या मुळातबेलाडोनासारखे गुणधर्म असतात ही मुळे शामक, संमोहक, शुद्धिहारक, मारक व ताराप्रसारक (डोळ्याच्या बाहुल्यांचा अतिविस्तार करणारी) असतात.

मँ. कॉलेसेन्स : हिची उंची सु. ३०-६० सेंमी. असते मुळे मांसल व खाली विभागलेली आणि ते विभाग परस्परांभोवती कधी कधी वेढून राहतात. पाने साधी, व्यस्त अंडाकृती आणि फुले घंटाकृती व हिरवट निळी असतात. इतर सर्व लक्षणे वर वर्णन केल्याप्रमाणे असतात.

संदर्भ : 1. Bailey, L.H. The Standard Cyclopedia of Horticulture, Vol.II, New York, 1960.

           2. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol.VI., New Delhi, 1962.

           3. Hill, A.F. Economic Botany, Tykyo, 1952.

           ४. देसाई, वा.गो. ओषधीसंग्रह, मुंबई, १९७५.

परांडेकर, शं. आ.