परिकाष्ठ : (लॅ. फ्लोएम, बास्ट, लेप्टोम). सर्व वाहिनीवंत (वाहक घटकयुक्त) वनस्पतींत अन्नरसाची ने-आण करण्यास सामान्यपणे उपयोगात असलेल्या विशिष्ट ऊतक तंत्रास (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांच्या संस्थेस) ही संज्ञा वापरतात. यामध्ये मुख्यतः चाळणीसारखी संरचना असलेले शरीर घटक असतातच, शिवाय सहचरी-कोशिका, दृढसूत्रे, कठक [⟶ दृढोतक भेंड], निकाष्ठ-किरण इ. घटकांपैकी सर्व किंवा काहींचा समावेश त्यात असतो. मुख्यतः पाण्याची ने-आण करणाऱ्या कोशिका (पेशी), वाहिका (पाण्याचे वहन करणारा व काष्ठात असणारा तीक्ष्ण टोकांचा लांबट घटक), वाहिन्या इत्यादींच्या बनलेल्या भागाचा [⟶ प्रकाष्ठ] ह्या ऊतक तंत्राचा निकट संबंध असून दोन्ही मिळून वाहक ऊतक तंत्र [⟶ वाहक वृंद] बनते. परिकाष्ठाची कार्यक्षमता थोडा काळ (बहुधा एक ऋतू) असते. तसेच त्याचा फारच थोडा व्यावहारिक उपयोग होतो. शिवाय वर उल्लेखिलेल्या त्यातल्या घटकांच्या संरचनेत व कार्यात बरेच बदल होतात. ते कालपरत्त्वे चिरडले जातात इतकेच नव्हे, तर काष्ठयुक्त वनस्पतींत ⇨ परित्वचेच्या निर्मितीमुळे सुटूनही जातात.

परिकाष्ठ : (१, २, ३) चालनी-नलिका (उभा छेद) (४) चालनी प्रदेश (पृष्ठदर्शन) (५) चालनी-प्रदेश (उभा छेद) : कोरा भाग कॅलोज, काळा भाग-प्राकल धागा, रेषांकित-कोशिकावरण (६) चालनी-पट्टिका, (७) सहचरी-कोशिका (८) मृदूतक-कोशिका.

चाळणीयुक्त घटक : यांच्या कोशिकावरणात सूक्ष्म छिद्रे असलेले चाळणीसारखे प्रदेश (चालनी-प्रदेश) असून त्यातून कॅलोजाने (एका कार्बोहायड्रेटाने) वेढलेले प्राकलाचे (कोशिकेतील सजीव द्रव्याचे) सूक्ष्म धागे शेजारच्या घटकांशी परस्परसंबंध राखतात. कोशिकावरणावर येणाऱ्या मुक्ताभ (मोत्याच्या रंगासारख्या) निक्षेपामुळे (साचलेल्या द्रव्यामुळे) त्यांची जाडी वाढते. प्राथमिक प्राकल जसजसा विकसित होतो तसतसा तो बदलत जातो. प्रथम असलेल्या श्लेष्मल (बुळबुळीत) कणांचा समूह होऊन प्रकलाचे (कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल गोलसर पुंजाचे) विघटन होते. प्राकणू (कोशिकेत अंतर्भूत झालेला लहान दाट प्राकलाचा भाग) विशेषत्व पावतात आणि प्राकल व रिक्तिका (रिकाम्या जागा) यांमधील मर्यादा अस्पष्ट होतात. कार्यक्षमता संपतेवेळी आतील पदार्थांचे विघटन होते, कॅलोजाचे प्रमाण वाढते व नंतर तो प्राकलाच्या धाग्यांसह नाहीसा होतो व छिद्रे मोकळी होतात, घटकात हवा शिरते व पुढे भोवतालच्या ऊतकामुळे ते घटक चिरडून जातात.

चालनी-कोशिका व चालनी-नलिका घटक: चालनी-कोशिका लांबट असून सर्व चालनी-प्रदेश सारखे परंतु संख्याप्रमाण भिन्न भित्तींवर कमीजास्त असते. याउलट चालनी-नलिकेतील काही चालनी-प्रदेश विस्तृतपणात इतरांपेक्षा अधिक विशेषत्व दर्शवितात. अनेक चालनी-प्रदेश असलेल्या कोशिकावरणाच्या भागाला चालनी-पट्टिका म्हणतात. आडव्या कोशिकावरणातील पट्टिकेवर बहुधा एकच चालनीतप्रदेश असून तिला ‘साधी’ व तिरप्या भित्तीवर दोन किंवा अधिक प्रदेश असतात म्हणून तिला ‘संयुक्त’ म्हणतात. चालनी-नलिकेतील घटक एकावर एक असून प्रकाष्ठातील वाहिन्यांप्रमाणे त्यांची भूमिका असते. हे घटक चालनी-कोशिकांपेक्षा आखूड असतात. चालनी-नलिकेबरोबरच बनलेल्या व त्यांच्या कार्याशी निकट संबंध असलेल्या मृदूतक-कोशिकांना [⟶ मृदूतक] सहचरी-कोशिका म्हणतात. त्यांचा आकार, स्थान व संख्या भिन्न असली, तरी त्यांचे प्रकल टिकून असतात. प्रकटबीजी वनस्पतींत व नेचाभ (नेचाच्या स्वरूपाच्या वनस्पतींत त्याचा अभावही आढळतो. चालनी-नलिका व सहचरी-कोशिका यांच्या कार्यसंबंधाबद्दल फारशी माहिती नाही, तथापि त्यांची कार्ये एकाच वेळी समाप्त होतात. परिकाष्ठात आढळणाऱ्या मृदूतक-कोशिका एकेकट्या किंवा दोन अथवा अधिक कोशिकांच्या रांगांत असतात. त्यांत स्टार्च, टॅनीन किंवा स्फटिक असून चालनी-घटक नाहीसे होतेवेळी त्या विस्तार पावतात किंवा त्यांचे कठकात किंवा ⇨ त्वक्षा निर्माण करणाऱ्या ऊतकात रूपांतर होते.

दृढसूत्रे : परिकाष्ठातील सूत्रांची लांबी विविध असते. ती एका मिमी.च्या अंशापासून जास्तीत जास्त ०·५ मी.पर्यंत असते उदा. ⇨ रॅमी. यांची कोशिकावरणे जाड असून त्यावर साध्या खाचा असतात कधी लिग्निन असते. उच्च दर्जाच्या (वनस्पतींच्या दोन्ही टोकांस असलेल्या ⇨ विभज्येपासून (सतत विभागणाऱ्या कोशिकांच्या समूहापासून) प्राथमिक परिकाष्ठ बनते. आदिपरिकाष्ठात (प्रथम बनलेल्या परिकाष्ठात) चालनी-घटक, सहचरी-कोशिका वा तिचा अभाव व मृदूतक-कोशिका असतात. चालनी-घटक लवकरच नाश पावून उरलेल्या कोशिकांचे ⇨ स्थूलकोनोतक  बनते किंवा दृढसूत्रे बनतात. त्यानंतर शेजारच्या कोशिकांची लांबी वाढते व ‘उत्तर परिकाष्ठ’ बनते यामध्ये बहुधा दृढसूत्रे नसतात, परंतु बाकीचे घटक फुलझाडांत [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] असतात. द्वितीयक परिकाष्ठाची निर्मिती द्वितीयक प्रकाष्ठाप्रमाणे पार्श्विक ⇨ ऊतककरापासून होते.

पहा : शारीर, वनस्पतींचे.

संदर्भ: 1. Eames, A. J. MacDaniels, L. H. Introduction to Plant Anatomy, New York, 1953.

2. Esau, K. Plant Anatomy, New York, 1960.

परांडेकर, शं. आ.