बनलगाय : (क. बळगे, नवलदीमर इं. टॉल चेस्ट ट्री लॅ.व्हायटेक्स अल्टिसीमा कुल-व्हर्बिनेसी). हा एक मोठा पानझडी वृक्ष श्रीलंकेतील व भारतातील (प. बंगाल, महाराष्ट्रात पश्चिम घाट, कारवार इ.) जंगलांत सामान्यपणे आढळतो. साल पिवळट करडी, धागेदार व खवलेदार मोठ्या फांद्या काहीशा लोंबत्या आणि लहाव डहाळ्या चौकोनी दबलेल्या पाने संयुक्त, ३-५ दली दले अवृंत (बिनदेठाची), जाडसर, वर हिरवी परंतु खाली पांढरट, लवदार टोकाची दले १५ X ४ सेंमी., बाजूची १० X ३.५ सेंमी. परिमंजरीवर [⟶पुषपबंध] मेमध्ये निळसर, विपुल, लहान फुले येतात. फळ अश्मगर्मी (आठळीयुक्त), गोलसर वाटाण्याएवढे, १.२ सेंमी. व्यासाचे, जांभळे व त्यांवर पांढुरक्या ठिपक्यांचे, पसरट व चापट असून संवर्तावर आधारलेले असते. ह्याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे व्हर्बिनेसी कुलात (साग कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. लाकूड पिंगट छटांचे पण करडे, कठीण, टिकाऊ, न चिंबणारे व झिलईस सोपे असून पाण्याशी संपर्क आल्यासही ते चांगले टिकते. सजावटी सामान, गाड्या, कपाटे, घरबांधणी, सिलिपाट व जमीन बनविण्यास ते चांगले असून त्याला मागणीही भरपूर आहे.

चौगले, द. सी.