सालवण : (डाव, डवला हिं. सारीवन, सालपण क. मुरेले होन्ने गु. सालवण सं. शाल-सालपर्णी, विदारी गंधा लॅ. डेस्मोडियम गँजेटिकम कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-पॅपिलिऑनेटी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ०·६ ते १·२ मी. उंचीचे हे एक शिंबावंत (शेंगा असलेले) लहान झुडूप असून

सालवण (डेस्मोडियम गँजेटिकम) : (अ) संयुक्त पान, (आ) शिंबा (शेंगा). त्याचा प्रसार श्रीलंका, आफ्रिका, मलाया, फिलिपीन्स, चीन, भारत आणि पाकिस्तान येथे सामान्यतः सर्वत्र आहे. ते हिमालयात सस.१,५०० मी. उंचीपर्यंत आढळते. डेस्मोडियम ह्या प्रजातीत सस. ४५० जाती असून त्यांपैकी भारतात सु. ४२ जाती आढळतात. सालवणाच्या शारीरिक लक्षणांत बरीच विविधता आढळते पडीक ठिकाणी व जंगलात आढळणाऱ्यांत ही विविधता सहज जाणवते. याच्या फांद्या कोनीय असून पाने एकदलाची, संयुक्त व दले ८–१३ × ३–६·६ सेंमी. व थोडीफार अंडाकृती असतात. फुलोरे [ मंजऱ्या; ⟶ पुष्पबंध] पानांच्या बगलेत येतात व त्यांवर लहान, पांढरी वा निळसर फुले येतात. शिंबा (शेंग) लहान (१·३– १·८ × ०·२ सेंमी.), वाकडी असून तिचे अधिक रुंद एकबीजी, चापट व न तडकणारे भाग पुढे सुटे होतात. फुलाची सर्वसाधारण संरचना पतंगरूप [ ⟶ अगस्ता] असते. सालवणाची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी (शिंबावंत) कुलात व पॅपिलिऑनेटी (पलाश) उपकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

सालवणाची फक्त मुळे औषधी असतात. ती श्लेष्मानाशक व ज्वरहारी असल्याने ताप, खोकला, वांत्या व दमा यांवर उपयुक्त असतात तसेच त्यांचा दशमूळ काढ्यात अंतर्भाव करतात. ती मूत्रल (लघवी साफ करणारी), आरोग्य पुनःस्थापक व पौष्टिक, परंतु कडू असतात. या वनस्पतीची सुकी खोडे व फांद्या कागदनिर्मितीत उपयुक्त असल्याचे आढळले आहे.

पहा : डेस्मोडियम लॅटिफोलियम.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. III, New Delhi, 1952.

परांडेकर, शं. आ.