कोलंबाइन : (लॅ. ॲकि्कलेजिमा कुल-रॅनन्क्युलेसी). ह्या इंग्रजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या सु. ३० (विलिस यांच्या मते १००), ओषधीय [→ ओषधि], बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या), काटक व सुंदर वनस्पतींचा प्रसार विशेषेकरून उत्तर गोलार्धात आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभी सुंदर, मोठी, आकर्षक फुले व पुढे नाजूक पर्णसंभार यामुळे ह्या जाती आणि त्यांपासून काढलेले संकरज (दोन जातींच्या संयोगातून निर्माण झालेली संतती) फार लोकप्रिय आहेत. खोड लहान (०·६ – ०·९मी.) व शाखायुक्त असून फुले शाखांच्या टोकास येतात. पाने संयुक्त, १–३दली व दले गोलसर टोकांची असतात. फुले पंचभागी, पाकळ्या शुंडिकायुक्त, संदले पाकळ्यांसारखी, केसरदले अनेक [→ फूल] व फळ पाच पेटिकासम भागांचे व अनेकबीजी असते. क्किलेजिया व्हल्गॅरिस ही जाती समशीतोष्णहिमालय, यूरोप व आशिया येथे सापडते. हिचे पांढरे, फिकट गुलाबी, अंजिरी, जांभळे, दुहेरी, किरमिजी असे विविध प्रकार लागवडीत आहेत. सर्व शोभिवंत संकरज काहीसे सावलीत किंवा उघड्यावर लावतात. निळे कोलंबाइन . सेर्यूलिया हे अमेरिकेतील संयुक्त संस्थानांतील कोलोरॅडो राज्याचे राज्य-पुष्प आहे. व्हल्गॅरिसचा सेर्यूलियाशी संकर करतात. . व्हल्गॅरिस विषारी आहे. 

पहा : रॅनेलीझ

जमदाडे, ज. वि.

कोलंबाइन