मालपीगीएसी : (माधवी कुल). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दले असलेल्या) वनस्पतींचे एक मोठे कुल. यांचा अंतर्भाव ⇨ जिरॅनिएलीझ (तेरडा गण) मध्ये केला जातो (जे हचिन्सन यांनी मालपीगीएलीझ ह्या स्वतंत्र ‘माधवी गणात’ केला आहे). यामध्ये सु, साठ प्रजाती व आठशे जाती (ए. बी. रेंडेल यांच्या मते छप्पन प्रजाती) समाविष्ट असून त्या उष्ण कटिबंधात सर्वत्र पसरलेल्या आहेत द. अमेरिकेत त्यांचा विशेष प्रसार आहे. ह्या वनस्पती झुडपे किंवा लहान वृक्ष अथवा काष्ठमय मोठ्या वेली [→ महालता] आहेत. यांच्या खोडात असंगत (अनित्य प्रकारची) द्वितीयक वृद्धी [→ शारीर, वनस्पतींचे] आढळते. पाने समोरासमोर व उपपर्णयुक्त, कधी कधी प्रपिंड बिंदुयुक्त (ग्रंथिरूप कोशिका – पेशी – असलेली) तसेच वनस्पतींच्या शरीरांवर अनेक विशिष्ट प्रकारचे शाखायुक्त व एककोशिका केस असतात. फुलोरे अकुंठित [→ पुष्पबंध] फुले द्विलिंगी व त्यांतील अक्ष सपाट किंवा फुगीर व कधी  कधी त्यांवर किंजमंडल (किंजधर) असते. संवर्ताचे पाच भाग जुळलेले व त्यांवर मधुप्रपिंड (मधाचा स्त्राव करणाऱ्या ग्रंथी) असतात पाच सुट्या पाकळ्यांना तळाशी निमुळता (नखरासारखा) भाग असून पाच केसरदलांची दोन मंडले असतात बाहेरचे मंडल पाकळ्यांसमोर कधी काहींचा ऱ्हास झालेला दिसतो. परागकोशात दोन किंवा चार कप्पे (पुटक) तीन किंजदलांचा संयुक्त ऊर्ध्वस्थ किंजपुट व तीन कप्प्यांत एकूण तीन बीजके [→ फूल] फळ पालिभेदी (फुटून तुकडे पडणारे), अश्मगर्भी (आठळीयुक्त) किंवा कपाली (कवचयुक्त) बिया अपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश नसलेल्या). फळांच्या भागांवर (फलांशावर) कधी पंख असतात (उदा., माधवलता किंवा मधुमालती). यांच्या हिप्टेज, ॲस्पिडॉप्टेरिस मालपीगीया इ. प्रजातीतील १२ जाती भारतात आढळतात. हिप्टेजच्या तीन जातींपैकी एक बागेत [→ माधवलता] लावतात ॲस्पिडॉप्टेरिच्या नऊ जंगली जाती आहेत मालपीगीयाच्या चार जातींपैकी एक लाल बोर [→ बोर, लाल] व दुसरी ‘बार्बेडोस चेरी’ खाद्य फळांकरिता बागेत लावतात. मालपीगीयाच्या इतर काही जाती शोभेकरिता लावतात थ्रियालिसच्या बारापैकी एक जाती ⇨ गाल्फिमिया ग्लॉका सुंदर पिवळ्या फुलांकरिता बागेत लावतात.

पहा : जिरॅनिएलीझ.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vols. V and VI, New Delhi, 1959 and 1966.

             2. Rendel, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II, Cambridge, 1963.

परांडेकर, शं. आ.