भेर्लि माड: (सुरमाडी हिं. मारी, रामगोह गु. शंकरजटा, शिवजटा क. बागनी सं. माड, दीर्घ इं.

भेर्लि माड : (१) फुलोरे व पाने यांसह झाडाचा शेंडा, (२) पानचे एक दल, (३) फुलोऱ्याचा भाग, (४) फळांसह फांदी.

कित्तूल-सॅगो-टॉडी-फिशटेल-वाइन-पाम लॅ. कॅरिओटा यूरेन्स कुल-पामी). हा भव्य, सुंदर आणि उपयुक्त ताल वृक्ष भारत, मलाया व श्रीलंका येथे जंगली अवस्थेत आढळतो. भारतातील प. व. पू. किनाऱ्यांवरील घनदाट जंगलांत व छोटा नागपूर, ओरिसा, उ. बंगाल आणि आसाम (१,५०० मी. उंचीपर्यंत) येथील थंड दऱ्या-खोऱ्यांत हे वृक्ष सापडतात तसेच हिमालयात (१५५ मी. उंचीपर्यंत) आणि नेपाळ व खासी टेकड्यांतही हा आढळतो. हे खाजगी  व सार्वजनिक उद्यानांतून शोभेकरिता लावतात.

फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एकदलिकित वर्गातील ताल कुलात याचा अंतर्भाव केला जातो. याची उंची सु. १२-१८ मी. व खोडाचा व्यास सु. ४५ सेंमी. असतो. याची संपूर्ण वाढ होण्यास सु. १०-१५ वर्षे लागतात नंतर फुले येण्यास सुरुवात होते त्यानंतर सु. २०-२५ वर्षे फुले व फळे मिळतात आणि नंतर तो वठून जातो. याचे खोड सरळ, गोलसर (चितीय), गुळगुळीत व राखी रंगाचे असून त्यावर वर्तुळाकृती खुणी दिसतात. याची मोठी संयुक्त (दोनदा पिसासारखी. विभागलेली) पाने खोडाच्या टोकाकडे पण विरळपणे उगवलेली आढळतात इतर ताल वृक्षांप्रमाणे (उदा., नारळ, ताड, सिंदी इत्यादींप्रमाणे) यांचा एकच झुबका नसतो. प्रत्येक पान सु. ५-६ मी. लांब व ३-३.४ मी. रुंद असते दले त्रिकोनी, काहीशी विभागलेली व माशाच्या शेपटीप्रमाणे असल्याने त्या अर्थाचे ‘फिशटेल पाम’ हे इंग्रजी नाव पडले आहे. याला सु. ३-३.५ मी. लांबीचे मोठे व स्थूल कणिश प्रकारचे [⟶ पुष्पबंध] लोंबते चवरीसारखे फुलोरे येतात ते प्रथम पानांच्या बगलेतून खोडाच्या वरच्या भागात आणि जसजसे झाड जून होईल तसतसे अधिकाधिक खालच्या भागात येतात. फुलोरे ३-५ महाच्छदांनी (मोठ्या छदांनी) वेढलेले असतात. पानांचे तळभाग जाळीदार आवरकांचे (वेढणाऱ्या भागांचे) बनलेले असतात. फुले लहान, एकलिंगी परंतु एकाच स्थूल कणिशावर असून पुं-पुष्पे लालसर व स्त्री-पुष्पे हिरवट असतात प्रत्येक तीन फुलांच्या झुबक्यात एक स्त्री-पुष्प दोन पुं-पुष्पे असतात. किंजपुटात तीन कप्पे व प्रत्येकात एक बीजक असते [⟶ फूल]. फुलांची संरचना व ह्या माडाची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨पामीमध्ये (ताल कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फळे अश्मगर्भी (आठळीयुक्त), गोलसर, पिवळट लाल व जायफळाएवढी (१.२५-२.५ सेंमी. व्यासाची) असून जून झाल्यावर त्यांचा रंग काळपट होतो. त्यात एक किंवा दोन बिया व बियांत रेषाभेदित पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) असतो [⟶ बीज].

पानांचे देठ, आवरक तळ व फुलोऱ्यांचे दांडे यांपासून बळकट धागे मिळतात, त्यांना श्रीलंकेत ‘कित्तूल’ व ओरिसात ‘सलोप’ म्हणतात. बाजारात मिळणारे धागे गुळगुळीत, चकचकीत, चिवट, मजबूत व सु. ०.६-०.९ मी. लांब आणि गर्द तपकिरी ते काळे असतात. ते घोड्याच्या केसांसारखे दिसतात व वाहनातील गाद्या भरण्यात त्यांची भेसळ करतात. श्रीलंकेत त्यांचे दोर हत्ती व जहाजे बांधून ठेवण्यास वापरतात मच्छीमारी उद्योगात व धनुष्याच्या दोऱ्यांसही धागे उपयुक्त असतात. कुंचले (ब्रश), पायपोस व केरसुण्यांकरिता विशेषकरून ते उपयुक्त असल्याने श्रीलंकेतून धाग्यांची निर्यात होते. भारतातील कित्येक कारखाने त्यांची कुंचल्यांकरिता आयात करतात. श्रीलंकेत हल्ली कुंचल्यांकरिता व केरसुण्यांकरिता त्यांचा बराच वापर होतो.

भेर्ली माडापासून मिळणारा गोड रस [⟶ नीरा] हे त्याचे एक मोठे आकर्षण आहे. साधारणपणे फुले येण्यास सुरुवात झाल्यापासून ४-७ वर्षे म्हणजे ते झाड मरेपर्यंत हा रस मिळू शकतो. फुलोऱ्याची पूर्ण वाढ होण्यापूर्वी हा रस त्यांच्या दांड्यांपासून नेहमीच्या पद्धतीने (शिंदी, नारळ, ताड यांच्या बाबतीत वापरल्या जाणाऱ्या पद्धतीने) काढतात. झाडांचे वय व जोम यांवर रसाचे प्रमाण अवलंबून असते. ३-६ महिने सतत रस मिळतो दर दिवशी ५-१५ ते २२-२५ लिटर याप्रमाणे एक झाड वर्षाला सु. ८०० लिटर गोड रस देते. ताज्या रसात १३.६% साखर (सुक्रोज) असते तो स्वच्छ दिसतो परंतु त्याचे नंतर २४ तासांत किण्वन (आंबण्याची क्रिया) पूर्ण होते व तो गढूळ दिसतो, आंबूस व मादक होतो. त्यात फक्त १% साखर, ३-४.५% अल्कोहॉल आणि ०.३% ॲसिटिक अम्ल असते. तीच ‘ताडी’ होय. किण्वन टाळण्यास रसाच्या पात्रांना आरंभी आतून चुना लावतात किंवा धुरी देतात. नीरा उत्तेजक, सारक व आरोग्यप्रद पेय आहे. तीपासून गूळ बनवितात. ४.५ लिटर रसापासून / किग्रॅ. गुळ बनतो. श्रीलंकेतून काही प्रमाणात डबाबंद गुळाची निर्यात होते. अर्राक (मद्य), व्हिनेगर (शिर्का) व खाद्य यीस्ट (अन्नरूप किण्व) यांचेही उत्पादन नीरेपासून करतात.

भेर्ली माडाच्या खोडातील भेंडापासून उत्तम प्रतीचा साबुदाणा तयार करतात. नीरेकरिता उपयोगात न आणलेल्या झाडापासून तो अधिक प्रमाणात मिळतो. एका वृक्षापासून सु. १००-१५० किग्रॅ. पीठ मिळते. त्यापासून पेज व भाकरी बनवितात. पेज उत्तम थंडावा देते. भेंडाबाहेरील लाकूड बळकट व टिकाऊ असते. त्यापासून शेतीची अवजारे, मुसळे, पाणी वाहून नेण्यास पन्हळ, बादल्या इ. वस्तू बनवितात घरबांधणीत ते वाशांप्रमाणे वापरतात. फुलांच्या शेवटच्या बहारानंतर झाड कापून त्याचे लाकूड इमारतींकरिता वापरतात. ते वाळवीपासून सुरक्षित असते. बुंध्यापासून ढोल (ड्रम) बनवितात. मुळांपासून बनविलेला कोळसा सोनारांना उपयुक्त असतो. झाडाची शेंड्यावरची कळी कोबीप्रमाणे कच्ची, गुळाबरोबर किंवा शिजवून खातात अथवा तिचे लोणचे घालतात. फलांपासून बटने, मणी इ. वस्तू तयार करतात. मगज (गर) तिखट असून तो कातडीस लागल्यास आग होते तो तहान घालवतो व श्रमपरिहार करतो. अर्घशिशीमध्ये फळ डोक्यास लावतात. पाने हे हत्तींचे आवडते खाद्य आहे. बिया व मुनवे यांपासून याची अभिवृद्धी (लागवड) करतात.

पहा : पामी पामेलीझ.

संदर्भ : 1. Basu, B. D. Kirtikar, K. R. Indian Medicinal Plants, Vol. IV, Delhi, 1975.

            2. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II Delhi, 1950.

            3. Wyman, D. Wyman’s Gardening Encyclopaedia, New York, 1971.

पाटील, शा. दा. परांडेकर, शं. आ.