कण्हेर,पिवळी : (बिट्टी; हिं. पीला कनेर; गु. पिली कणेर; सं. अश्वघ्न, करवीर; इं. लकी नट, यलो ओलिअँडर; लॅ. थेवेशिया  नेरिफोलिया ; कुल – ॲपोसायनेसी). सु. ४.६५ – ६.२० मी. उंचीचा हा एक दुधी चिकाचा, सदापर्णी लहान वृक्ष असून त्याचे मूलस्थान दक्षिण अमेरिका व वेस्ट इंडीज आहे. पाने रेषाकृती (लांबट, अरुंद), वरून चकचकीत हिरवी, एकाआड एक, पण फांद्यांवर गर्दीने येतात. फुले साधारण मोठी, पिवळी व साधारण सुवासिक असून त्यांच्या वल्लऱ्या फांद्यांच्या टोकांकडे जवळजवळ वर्षभर येत असतात. फुलांची रचना सामान्यतः ⇨ॲपोसायनेसी कुलाच्या वर्णनाप्रमाणे. पुष्पमुकुट घंटेसारखा व परिहित (पिळवटलेला); अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ साधारण चौकोनी, लंबगोल व चपटे असून त्यात दोन-चार त्रिकोनी बिया असतात. लालसर छटा असलेल्या फुलांचा प्रकार आढळतो.

पिवळी कण्हेर

हा वृक्ष शुष्क प्रदेशातील कोणत्याही प्रकारच्या परंतु विशेषतः रेताड जमिनीत जोमाने व जलद वाढतो. बियांमध्ये औषधिद्रव्ये असल्यामुळे जास्त बिया मिळाव्या म्हणून मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. अभिवृद्धी (लागवड) छाट कलमांनी किंवा बियांपासून सहज करता येते. बकऱ्या व गुरे ही झाडे खात नाहीत; प्रमाणबद्ध वाढ व जमिनीपर्यंत पाने असल्याने ती कुंपणाकरिता लावतात.

काही जमातींतील लोक फळांतील आठळीच्या माळा गळ्यात घालतात. नाकात अगर कानात डुलासारख्याही त्या वापरतात. बी फार विषारी असल्याने जंगली जनावरांना मारण्याकरिता वापरतात. बियांतील पिवळे जर्द तेल फार धूर न निघता जळते. ते औषधी व विषारी असते. दुधी चीक फार विषारी; खोडाची साल कडू व विरेचक. थोड्या प्रमाणात पाळीच्या तापात देतात. थेवेटीन व थेवेरेसीन ही विषारी द्रव्ये या वनस्पतीत असतात. बागेत व विशेषेकरून श्री महादेवाच्या मंदिरात हे झाड लावतात.

पहा : वनस्पति, विषारी.

 

 

 

जमदाडे, ज. वि.; चौधरी, रा. मो.