हस्तिकर्णी (ॲलोकेशिया मॅक्रोऱ्हायझोस) : (१) मूलक्षोडासहित वनस्पती, (२) महाछदासहित स्थूलकणिश, (३) स्थूलकणिश.हस्तिकर्णी : (माना, मानकंद इं. जायंट तारो, एलिफंट इअर त. किझंगू लॅ. ॲलोकेशिया मॅक्रोर्‍हायझोस कुल-ॲरॉइडी ). साधारणपणे अळूमाणक यांसारखी, परंतु मोठी अशी ही ओषधी मूळची आशियातील उष्ण प्रदेश, ऑस्ट्रेलिया व पॅसिफिक बेटांतील असून हल्ली ती सर्वत्र आढळते. तिचा नैसर्गिक आढळ मुख्यतः श्रीलंका, भारत व मलेशिया येथील उष्ण प्रदेशातील जंगलांत आहे. मूलक्षोडापासून ( जमिनीतील जाड खोडापासून) तिचा प्रसार होतो. उष्ण प्रदेशात तिची लागवड करतात. बागेत ती शोभेकरिता व सावलीकरिता लावली जाते. ॲलोकेशिया प्रजातीत सु. ७० जाती असून भारतात १२ जाती आढळतात. उत्तर-पूर्व (ईशान्य) आशियातील सर्व जाती देशी आहेत. त्यांचे कोलोकेशिया प्रजातीशी जवळचे संबंध आहेत.

 

हस्तिकर्णी ही रसाळ ओषधीय वनस्पती सु. ४.५ मी.पर्यंत उंच वाढते. हिची पाने चकचकीत हिरवी, शराकृती, हृदयाकृती व अवाढव्य असूनती ०.९–१.८ मी. लांब व ०.६–१.२ मी. रुंद असतात. पाने हत्तीच्या कानासारखी मोठी असल्यामुळे या वनस्पतीस हस्तिकर्णी हे नाव पडले असावे. खोड विशाल, हिरवट किंवा पांढरट रंगाचे असून सु. १.३५ मी. लांब वाढते. मूलक्षोड अंशतः जमिनीत व बाहेर, उंच व भक्कम फुलोऱ्याचा [→ पुष्पबंध] महाछद २०–३० सेंमी. लांब, फिकट हिरवट पिवळाअसून लांब व भक्कम देठावर आधारलेला असतो. हिची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ॲरॉइडी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

 

हस्तिकर्णी या वनस्पतीच्या सर्व भागांचे पारंपरिक उपयोग आहेत. मूलक्षोड व कोवळे अंकुर खाद्य आहेत. मूलक्षोड खूप वेळ शिजविल्या-नंतर खातात. त्यामुळे त्यातील कॅल्शियम ऑक्झॅलेटासारख्या क्षोभकारक स्फटिकाचे विभंजन होते. मूलखोड न शिजविता खाल्ले तर तोंड व घसायांना इजा होते. मुळे सौम्य विरेचक व मूत्रल असून पोटाच्या आणि प्लीहेच्या विकारांवर उपयुक्त आहेत. मूलक्षोड इन्फ्ल्यूएंझा, हिवताप, अतिसार, विषमज्वर, संधिवात, फुप्फुसाचा क्षयरोग, विद्रधी, गजकर्ण व श्वेतपदर यांवर तसेच विषारी सर्प, विंचू , कुत्रा आणि कीटक यांच्यादंशावर उपयुक्त आहे. पाने स्तंभक आणि रक्तस्तंभक (रक्तस्रावथांबविणारी) असून मुळे व पाने चर्मरक्तकरावर उपयुक्त त्वचेची खाज तसेच अंगाची जळजळ होत असेल तर पाने व खोडाचा काढा पाण्यात मिसळून त्याने अंघोळ करतात. वनस्पतीच्या सर्व भागांत (पाने, खोडआणि मूलक्षोड यांत) पाण्यात न विरघळणारे कॅल्शियम ऑक्झॅलेट व सॅपोटॉक्सिन हे विषारी घटक असतात. त्यामुळे निर्विषीकरण पद्धतीमध्ये मूलक्षोड सात दिवस पाण्यात भिजत ठेवतात. त्यातील पाणी दररोज बदलतात. त्यानंतर मूलक्षोड वाळवितात आणि त्याचा उपयोग गंभीर भाजणे व तीव्र पोटदुखीवर करतात. तसेच मूलक्षोडामध्ये ॲलोकेसीन हे प्रथिन असून ते बॉट्रिटीस सिनेरा या कवकावर उपयुक्त आहे.

 

पहा : ॲरॉइडी.

 मगर, सुरेखा अ.