हायसिंथ, पाण्यातील : (इं. वॉटर हायसिंथ, लिलॅक डेव्हिल, वॉटर ऑर्किड लॅ. एकॉर्निआ क्रॅसिपस कुल-पाँटेडेरिएसी ). या सुंदर, जलद वाढणाऱ्या, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) ओषधीय जलवनस्पतीचे मूलस्थान ब्राझील असून ती उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत सर्वत्र आढळते. ती संथ वाहत्या गोड्या पाण्यात वाढणारी असून तिचा आढळ नदी, धरणे व तळ्यांमध्ये असतो. उष्ण प्रदेशांत ही वनस्पती उघड्यावर चांगली येते. ती १८९० मध्ये शोभेची वनस्पती म्हणून ऑस्ट्रेलियात आणण्यात आली. तिची वाढ २८?–३०? से. तापमानाला चांगली होते. तिच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम यांची आवश्यकता असते. तिची वाढ जलद होत असल्यामुळे पाण्याचा संपूर्ण पृष्ठभाग ती व्यापून टाकते आणि पाण्यावर गालिचा (चटई) पसरल्या-प्रमाणे दिसते. तिच्या जलद प्रसारामुळे व वाढीमुळे ती अतिशय घातक असे जलीय तण आहे. उथळ पाण्यातील चिखलात तिची आगंतुक (तंतूसारखी) लांब मुळे वाढतात.

 

हायसिंथ वनस्पती ३०–६० सेंमी. उंच असून तिच्या कक्षास्थ फांद्या धावत्या खोडाप्रमाणे असतात. त्यांवर पानांचे झुबके असतात. पाने गडद हिरवी, चकचकीत व ५–१० सेंमी. व्यासाची असून दाटीने गुच्छासारखी वाढतात. ती चमसाकृती व गोल टोकाची असून देठाच्या तळाजवळ फुगीरव सच्छिद्र असतात. त्यांत हवेने भरलेले ? वायूतक असल्यामुळे ही वनस्पती पाण्यावर तरंगते आणि जलप्रवाहाबरोबर वाहत जाते. फुलोरा कणिश १५–२५ सेंमी. लांब असून त्यात ३–१५ फुले असतात. फुले मोठी (४–६ सेंमी. लांब व ३.५–५ सेंमी. रुंद), नाजूक, द्विलिंगी, त्रिभागी, निळी किंवा जांभळी व मध्यभागी पिवळसर रंगाची असून सप्टेंबर – नोव्हेंबरमध्ये येतात. किंजपुट तीन कप्प्यांचा त्यात अनेक बीजके फळ (बोंड) १०–१५ मिमी. लांब त्यात सु. ३०० बिया असतात. बी अंडाकृती व ०.५–१.५ मिमी. लांब असून ते पाण्यात पडून रुजते. बी सु. २० वर्षे अंकुरणक्षम अवस्थेत राहते. तसेच शाकीय प्रजोत्पादनाने तिरश्चरापासून (खोडाच्या तुकड्यापासून) नवीन वाढ होते. वाढीस योग्य वातावरण असेल, तर तिरश्चरापासून प्रत्येकी ५ दिवसांनीदुप्पट या प्रमाणात वाढ झपाट्याने होते.

 

हायसिंथ वनस्पतीचा प्रसार नावा व जहाजांना चिकटून इतर ठिकाणी होतो. तिचा विस्तार झपाट्याने होत असल्यामुळे जलप्रवाहास अडथळा होतो, तळी भरून जातात, निचरा करणाऱ्या नळ्या व गटारे तुंबतात, तसेच शहराच्या पाणीपुरवठ्यात बिघाड निर्माण होतो. पाण्याच्या पृष्ठभागावर दाट तण पसरल्यामुळे सूर्यप्रकाश पाण्यात शिरत नाही, त्यामुळे तणाचे जून भाग कुजतात. जलचर प्राण्यांना सूर्यप्रकाश व प्राणवायू मिळत नाही. परिणामतः मासे व जलचर प्राण्यांची वाढ होत नाही. जलप्रदूषणामुळे पाणी मनुष्यास वापरासाठी निरुपयोगी ठरते. पाण्याच्या पृष्ठभागावर पसरलेल्या दाट तणामुळे होड्या व बोटी चालविण्यास अडथळा येतो. तसेच डासांच्या प्रजातींना अधिवास उपलब्ध होतो.

 

आशिया, आफ्रिका व उत्तर अमेरिका या ठिकाणी हायसिंथ हे अत्यंत घातक असे जलीय तण आहे. त्याचे नियंत्रण अतिशय क्लिष्ट आहे. प्रतिबंधक उपायांमध्ये रसायनांचा वापर, वनस्पतिरोधके, जैविक नियंत्रणइ. बाबी येतात. काही रसायनांच्या (उदा., २, ४-डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक अम्ल, मिथोझोन, सँटोब्राइट इत्यादींच्या) साहाय्याने हे तण मारता येते.

 

हायसिंथ बागेमध्ये तसेच लहान-मोठ्या जलाशयांत शोभेची वनस्पती म्हणून लावली जाते. ती अवर्षण सहन करू शकते, परंतु कडाक्याची थंडी (हिमवर्षाव) सहन करू शकत नाही. तसेच ती खाऱ्या पाण्यात वाढत नाही. हायसिंथमध्ये सु. ९०% पाणी असल्यामुळे ती काढून कुजू देऊन किंवा वाळवून वजाळून खत बनविता येते. खतामध्ये नायट्रोजन २%, फॉस्फरस १.१%, पोटॅशियम २.५% व कॅल्शियम ३.९% इ. घटक असतात. गुरे, घोडे व डुकरे यांना चारा म्हणून हे तण उपयुक्त आहे. फॉर्मोसा (तैवान) येथे हायसिंथची भाजी करतात.

 

पहा : जलवनस्पती.

जमदाडे, ज. वि. मगर, सुरेखा अ.