भुईतेरडा : (भुई गेंद लॅ. लेपिडॅगॅथिस क्रिस्टॅटा कुल – ॲकँथेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति,

भुईतेरडा : (१) फुलोरा व पाने यांसह वनस्पती, (२) फूल (उघडलेले), (३) फळ, (४)बीज.

आवृतबीज उपविभाग]ह्या ताठर व लहान झु़डपाप्रमाणे पसरून वाढणाऱ्या वनस्पतीचा प्रसार भारतात दख्खन, कोकण, गुजरात, राजस्थान, दिल्ली, कर्नाटक इ. भागांतील रूक्ष व खडकाळ जागी झालेला आढळतो. याच्या वंशात एकूण १०० जाती असून त्यांपैकी भारतात सु. २५ जाती आहेत. भुईतेरड्याचे कठीण व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) खोड जमिनीत वाढते व त्यापासून जमिनीवर फुलोरा व अनेक पसरट फांद्या येतात. पाने साधी (२-४ × ०.३-१ सेंमी.), बिनदेठाची, समोरासमोर, रेषाकृति-आयत असतात. फुले लहान, द्विलिंगी, सच्छद (तळाशी लहान उपांग असलेली), पांढरी किंवा फिकट गुलाबी असून त्यांवर तपकिरी किंवा जांभळे ठिपके असतात. प्रदलमंडल (पुष्पमुकुट) दोन ओठांसारखा आणि केसरदले चार व द्वयोन्नत (दोन मोठी व दोन लहान) असतात किंजपुटात दोन कप्पे आणि प्रत्येकात एक बीजक असते [⟶ फूल]. फळ (बोंड) शुष्क, लहान, अंडाकृती व निमुळत्या टोकाचे असते त्यावर दोन्ही बाजूंस एक खोबण असते. बीजे दोन व लंबगोल असून त्यांवर लांब व जलशोषक केस असतात. वनस्पतीची इतर लक्षणे ⇨ॲकँथेसीत (वासक कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

भुईतेरड्याचा उपयोग तापावर एक कडू, पौष्टिक औषध म्हणून करतात. अंगाच्या खाजेवर ही वनस्पती बाहेरून लावतात. सुक्या वनस्पतीची राख जखमांवर लावतात. पाने चारा म्हणून उपयुक्त असतात. वनस्पतीत प्रतिशत पुढील घटक असतात : प्रथिन ९.२५, मेद ३.९०, कार्बोहायड्रेटे ४०.८५, चोथा (तंतू) ३२.५६, राख १३.४४ वगैरे. ले. इन्कर्व्हा, ले. ट्रायनर्व्हिसले. हॅमिल्टोनियाना इ. भारतीय जात औषधी आहेत. ले. हॅमिल्टोनियानाची मुळे चुरगळून स्त्रियांच्या स्तनांवर घासल्यास दूध येणे सुरु होते. फुले व बिया कुटून व करंजेलात भाजून खाजेवर व मुलांच्या डोक्यावरच्या जखमांवर चोळून लावण्यास वापरतात. ले. इन्कर्व्हाची पाने खोकला थांबविण्यासाठी चघळतात. ले ट्रायनर्व्हिसचे गुण भुईतेरड्याप्रमाणे असतात.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.

जमदाडे, ज. वि.