ऱ्होडोडेंड्रॉन : फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक मोठी प्रजाती. ही प्रजाती एरिकेसी कुलातील [⟶ एरिकेलीझ] असून तीमध्ये झेलिया प्रजातीतील सर्व जाती (सु. ७०) आता समाविष्ट केल्या आहेत त्यामुळे एकूण जातींची संख्या सु. ५०० होते (ए. बी. रेंडेल : ८०० जाती). काही वनस्पतिविज्ञ आणि उद्यानवैज्ञनिक झेलिया आणि ऱ्होडोडेंड्रॉन या प्रजाती ऱ्होडोडेंड्रॉनच्या दोन उपप्रजाती मानतात कारण झेलिया पानझडी असून तीतील वनस्पतींची फुले तुतारीसारखी असतात आणि ऱ्होडोडेंड्रॉन सदापर्णी असून तिच्यातील फुले घंटेसारखी असतात परंतु हे फरक काटेकोरपणे आढळत नसल्याने बहुसंख्य शास्त्रज्ञ ऱ्होडोडेंड्रॉन ही एकच प्रजाती मानतात. या प्रजातीतील जाती बहुधा झुडपे, क्कचित लहान वृक्ष आणि काही ⇨अपिवनस्पती असून त्यांचा प्रसार उ. गोलार्धातील अधिक थंड प्रदेशात व तसेच द. आशियातील उंच डोंगर, मलेशिया आणि न्यू गिनी येथे झालेला आढळतो. द. ऑस्ट्रेलियात एक जाती आहे परंतु द. अमेरिका व आफ्रिका येथे एकही नाही. हिमालयात पूर्वेकडून पश्चिमेस आणि मध्य चीनमध्ये जातींची संख्या सर्वात जास्त आहे. ब्रिटनमध्ये रानटी अवस्थेत एकही जाती नाही परंतु उद्यानांतून अनेक आकर्षक, शोभिवंत जाती लोकप्रिय आहेत. उ. अमेरिकेत अटलांटिक व पॅसिफिक किनारपट्ट्यांत उत्तम लागवड आढळते.

ऱ्होडोडेंड्रॉनच्या जातींत पाने साधी असून त्यांना देठ असतात, त्यांची किनार बहुधा अखंड असून त्यांची मांडणी  एकाआड एक असते. फुले आकर्षक, मोठी द्विलिंगी, सवृंत (देठ असलेली) असून ती बहुधा फांद्यांच्या टोकांस चवरीसारख्या झुबक्यात कमीजास्त येतात. फुलांच्या पाकळ्या बहुधा पाच, क्कचित सहा ते ऱ्होडोडेंड्रॉन कँपॅन्युलेटम : (१) फुलांसह फांदी, (२) फूल, (३) केसरदलाचा भाग, (४) किंजमंडल, (५) किंजपुटाचा आडवा छेद, (६) बोंड.दहा, कधी तळापर्यंत विभागलेल्या असून पुष्पमुकुट लाल, निळा, पिवळा किंवा पांढरा अथवा त्यांच्या मिश्रणांच्या छ्टा असलेला, काहीसा अनियमित व नसराळ्यासारखा (तुतारीसारखा) किंवा घंटाकृती असतो. त्याखालचा भाग (संवर्त) लहान व पंचभागी असतो. केसरदले ५-१० असून परागकोश छिद्रांनी तडकतात आणि ⇨पराग बाहेर येतात. किंजपुटात पाच ते दहा कप्पे असून त्या प्रत्येकात अनेक बीजके असतात. किंजल लांब असून किजल्क विस्तृत असतो [⟶ फूल]. फळ (बोंड) लंबगोल किंवा लांबट असून ते शेंड्याकडून खाली तडकते व त्याची ५-२० शकले होतात व त्यांतून अनेक बिया बाहेर पडतात.

नवीन लागवड बिया व दाबकलम वापरून करतात. भरपूर ह्यूमस असलेल्या अम्ल जमिनीत ऱ्होडोडेंड्रॉनची झाडे चांगली वाढतात. थंड व दमट हवामान त्यांना अधिक मानवते. दुमट जमिनीत लाकडाचा भुसा किंवा कुजका पालापाचोळा अथवा पीट चांगले मिसळून लागवडीस योग्य अशी जमीन तयार करतात. उन्हाळ्यात व हिवाळ्यात मुळे सुकून जाऊ नयेत म्हणून जमिनीवर आच्छादन करावे लागते. मुळे फार खोलवर जात नाहीत त्यांना मूलरोम (केस) नसतात पण कवकतंतूंच्या द्वारे त्यांची शोषणक्रिया चालते [संकवक ⟶ कवक].

अनेक जाती शोभेकरिता लावतात. ऱ्होडोडेंड्रॉन आर्बोरियमऱ्हो. कँपँन्युलेटम या हिमालयी जाती व इतर [उदा., ऱ्हो. कॉकेसिकम (कॉकेशकमधील) व ऱ्हो.पाँटिकम (भूमध्यसामुद्रिक प्रदेशामधील) या जाती] यांच्या परस्पर संकरामुळे अनेक नवीन संकरज वाण उपलब्ध झाले असून ते सर्वत्र लागवडीत आहेत.


भारतात एकूण सु. ८० जाती (काहींच्या मते ११० जाती) आढळतात त्या बहुतेक हिमालयात आहेत त्या सदापर्णी किंवा पानझडी आहेत. प. हिमालयात फक्त चार जाती आहेत. ऱ्हो. आर्बोरियम (हिं. बुरस) ही कश्मीर ते भूतान, खासी टेकड्या आणि सह्याद्री व निलगिरी येथे आढळते तिला रोझ ट्री हे इंग्रजी नाव आहे. निलगिरीतील जाती ऱ्हो. आर्बोरियमचा एक प्रकार (निलगिरिकम) असावा असे मानतात.

ऱ्होडोडेंड्रॉन प्रजातीचे नाव तालीश असे सुचविलेले आढळते. पंजाबी तालीस आणि काश्मिरी ‘तालीसफार’ यांवरून ते घेतले आहे. बुरसला (ऱ्हो आर्बोरियम) संतानक व चेराइलूला (ऱ्हो. कँपँन्युलेटम) गग्गर अशीही नावे आढळतात. 

पहा: एरिकेलीझ.

संदर्भ : 1. Bor, N. L. Manual of Indian Forest Botany, Cambridge, 1953.

           2. C. S. I. R. The Wealth of India, Raw materials, Vol. IX, New Delhi, 1972.

           3. Mittra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

परांडेकर, शं. आ.

ऱ्होडोडेंड्रॉन : ऱ्होडोडेंड्रॉन लिडीफोलियम प्रकार फीनिसियम.