बाल्सम फर : (लॅ. अँबीस बाल्समिया कुल-पायनेसी). हा एक सरळ, ताठ, १५-२४ मी. उंच व ४२-७५ सेंमी. घेराच्या खोडाचा, त्रिकोणाकृती, सदापर्णी,

बाल्सम फर : पाने व शंकू यांसह फांदी

शंकुमंत, शोभादायक व उपयुक्त वृक्ष असून प्रकटबीज वनस्पतींपैकी ⇨कॉनिफेरेलीझ गणातील पायनेसी कुलात हा समाविष्ट आहे. याचा प्रसार अमेरिकेच्या उत्तरेकडील शंकुमंत जंगलात विशेष आहे. पाने गर्द हिरवी, वर चकचकीत आणि खाली फिकट, एकांतरित (एकाआड एक), सपाट, रेखाकृती अवृंत (देठ नसलेली) व साधारण जाड असतात. शंकूचे स्वरूप व संरचना साधारणत: फरप्रमाण[⟶ फर-१]. ते आयत, चितीय, जांभळे, ६–१० सेंमी. लांब असून खवल्यांपेक्षा छदे बहुधा आखूड असतात. या झाडाचे लाकूड कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींमुळे) कुजते ते हलके, नरम व ठिसूळ असल्याने खोकी, करंड्या व कागदाचा लगदा बनविण्यास उपयुक्त असते. ‘कॅनडा बाल्सम’ नावाचे टर्पेंटाइन (ओलिओरोझीन) सालीतून पाझरून त्याचे चिकट, फोडासारखे थेंब बनतात. झाडाला भांडे बांधूनही ते जमा करतात. एका झाडापासून वर्षाला २२५ ते २७५ ग्रॅम कॅनडा बाल्सम मिळते. [⟶ बाल्सम]. याचे औषधी गुणधर्म इ. स. १६०७ पासून माहीत आहेत ते दाहक (आग करणारे), उत्तेजक व जंतुनाशक असते. हा वृक्ष थंड व ओलसर हवामानात (पर्वतावर) चांगला वाढतो परंतु उष्ण व रुक्ष हवेत त्याचे आयुष्य कमी होते.

पहा : पाइन फर-१ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग.

परांडेकर, शं. आ.