मुद्रा-१ :(मुद्रिका, पेटारी, कांगोरी हिं.कंघी गु.कांसकी क. हेत्तुटी सं. अतिबला, कंकतिका इ. कंट्री मॅलो लॅ. ॲब्युटिलॉन इंडिकम कुल-माल्व्हेसी) ही लहान झुडपासारखी वनस्पती जास्वंद, कापूस, भेंडी इत्यादींच्या कुलातील असल्याने त्यांच्याशी साम्य दर्शविते. हिच्या ॲब्युटिलॉन या प्रजातील एकुण सु.१५० जाती असून त्या उष्ण आणि उपोष्ण कटिबंधांत आढळतात. भारतात सु. ११ जाती असून त्या सर्वत्र उष्ण भागात आढळतात. विशेषतः दक्षिण पठारावर व कोकण भागात मुद्रा सामान्यपणे आढळते. हिची पाने साधी, एकाआड एक, ९ X ५ सेंमी., सोपपर्णयुक्त (तळाशी लहान उपांगे असलेली), पातळ, लांब देठाची, थोडी विभागलेली, दातेरी, केसाळ, तळाशी हृदयाकृती व लांबट टोकाची असतात. फुलाखाली अपिसंवर्त (संदलाखालच्या छदांचे वर्तुळ) नसते फुले नियमित, द्विलिंगी, २·५ सेंमी. व्यासाची, एकेकटी व पानांच्या बगलेत साधारण वर्षभर येतात ती पिवळी असून सायंकाळी उमलतात. फुलात १५–२० किंजदले व एकसंघ (एकत्र जुळलेली) केसरदले असतात [⟶ फूल]. फळ बसकट, शुष्क व पालिभेदी (तडकून अनेक खंड होणारे) असून त्याचे एकबीजी फलांश (फळांचे खंड) अलग होतात. बी गर्द तपकिरी असते. फुलाची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ माल्व्हेसी अथवा भेंडी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. फळ वरून मुद्रे (चक्रा) प्रमाणे दिसते म्हणून या वनस्पतीची मुद्रा, मुद्रिका ही नावे आलेली असावीत.

मुद्रा : (१) पाने, फुले व फळे या सह फांदी (२) पाकळ्या काढलेले फूल (3) फळांचा उभा छेद (४) बी.

हिच्या खोडापासून निघणाऱ्या धाग्यांपासून ⇨ चिनी तागाप्रमाणे उपयुक्त दोर बनविता येतात पण त्यांना व्यापारी महत्त्व नाही.

पाने, मुळे, खोड व बीजे औषधी आहेत. पानांत श्लेष्मल पदार्थ भरपूर असून ती पौष्टिक असतात तसेच ती शामक (दाह कमी करणारी) असून खोकला, परमा, मूत्राशयदाह, छातीचे विकार, ताप इत्यादींवर वापरतात. दातदुखीवर पानांच्या काढा चुळा भरण्यास देतात. गळवे व जखमा यांवर पानांचे पोटीस बांधतात. साल व मूळ मूत्रल (लघवी साफ करणारी) आहेत. मुळे ज्वरहर (ताप कमी करणारी) असून बीजे (यांना ‘कंगई बीजे’ म्हणतात) कामोत्तेजक, कफोत्सारक (कफ पाडून टाकणारी), शामक आहेत मूळव्याध, परमा इत्यादींवरही ती गुणकारी आहेत. तापात पानांचा वा मुळांचा फांट [विशिष्ट प्रकारे करण्यात आलेला अर्क ⟶ औषधिकल्प] थंडावा येण्यास पिण्यास देतात. कुष्ठातही मुळांचा फांट देतात. बिया सारक म्हणून वापरतात. सुमात्रात संधिवातावर पानांचे गरम धावन वापरतात. मुद्रेच्या प्रजातीतील काही जाती उद्यानात शोभेसाठी लावतात. ⇨ कसीली ही मुद्रेच्या प्रजातीतील जाती धाग्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ‘कंट्री मॅलो’ हे इंग्रजी नाव व ‘मुद्रा’ हे मराठी नाव दुसऱ्या एका जातीला अनुलक्षून वापरलेले आढळते तिचे शास्त्रीय नाव अँ. एशियाटिकम असून ती भारतात, श्रीलंकेत आणि आफ्रिकेत सामान्यपणे आढळते. तिच्या बीजात मेद व प्रथिन विपुल असल्याने आफ्रिकेतील भटक्या जमाती त्यांचा खाण्यास वापर करतात.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. I, Delhi, 1948.

परांडेकर, शं. आ.