पार्स्निप : (लॅ. पॅस्टिनॅका सटिव्हा कुल-अंबेलिफेरी). ही द्विवर्षांयू (दोन वर्षापर्यंत जगणारी), सुगंधी व सु. ०.३ -१.७ मी. उंच  ⇨ ओषधी   मूळची यूरोपातील असून ग्रीक व रोमन काळापासून उपयोगात आहे. १५६४ मध्ये ती वेस्ट इंडीजमध्ये व १६०९ मध्ये व्हर्जिनियात नेण्यात आली. ती हल्ली यूरोप व अमेरिका येथे विशेषेकरून पिकविली जाते. भारतात हे पीक महत्त्वाचे नाही, तथापि बागाईत जमिनीत कोठे कोठे लावतात. या वनस्पतीचे खोड सरळ व रेषांकित असून प्रधान मूळ लांब, पांढरे व मांसल असते. पाने एकांतरित (एकाआड एक), संयुक्त व पिसासारखी असून दलांची संख्या विषम, बहुधा ११ – १५ असते

पार्स्निप : पानांसह मूळ

ती दातेरी लंबगोल व क्वचित त्रिखंडी असतात. फुले लहान व पिवळी असून खोडाच्या टोकास संयुक्त चामरकल्प (चवरीसारख्या) फुलोऱ्यावर येतात. फुलांची संरचना व इतर सामान्य लक्षणे अंबेलिफेरी कुलात [चामर गणात → अंबेलेलीझ] वर्णिल्याप्रमाणे असतात. आंदोलिपाली फळ पातळ, सपाट, दीर्घवृत्ताकृती व कंगोरेदार असून त्याचे धन्याप्रमाणे दोन फलांश होतात [ → फळ]. थंड हवेत व ओलसर जमिनीत हे पीक चांगले येत असल्याने भारतात डोंगरावर मार्च ते मेमध्ये आणि सखल (मैदानी) भागात ऑक्टोबर – नोव्हेंबरात नव्या बिया वापरून पेरणी करतात.  ⇨ गाजराप्रमाणे  लागवड करतात. मुळा व मेथी यांच्याबरोबर मिसळूनही लावतात. पीक वर्षायू आहे. कोवळ्या मांसल मुळांची भाजी करतात किंवा ती कच्ची खातात. मुळात साखर व चरबी असते. मुळांचे सार करतात मद्यही बनवितात. पाळीव जनावरांना मुळे चारतात परंतु घोड्यांना कधीकधी विषबाधा होते. मूळ मूत्रल (लघवी साफ करणारे) व वायुनाशी असून पोट व मूत्राशय यांच्या विकारांवर व अश्मरीवर (मुतखड्यावर) देतात.

जमदाडे, ज.वि.