कौशी : (काशी, खवस हिं. बोदला, सामारी गु. कोदारो इं. स्कार्लेट स्टर्क्युलिया लॅ. स्टर्क्युलिया कोलोरॅटा  कुल-स्टर्क्युलिएसी). अंदमान बेट, पेगू, आसाम, मध्य प्रदेश, सह्याद्री घाट व दक्षिण भाग श्रीलंका इ. ठिकाणी सामान्यपणे आढळणारा हा मोठ्या आकाराचा पानझडी पण शोभिवंत वृक्ष आहे. साल राखी व शाखा पसरट पाने साधी, तळाशी ह्रदयाकृती व त्रिखंडी फुलोरा (लाल परिमंजरी) शेंड्याकडे येतो फुले साधारण तीन सेंमी. लांब असून मार्च एप्रिलमध्ये येतात. नारिंगी-लाल केसांनी आच्छादलेला नाळक्यासारखा (नसराळ्यासारखा) संवर्त व त्यात एकसंध केसरदलाच्या दांड्यावर टोकास सु. ३० परागकोश असतात पाकळ्या नसतात. द्विलिंगी फुलात किंजधराच्या टोकास ३० परागकोश व नंतर किंजदले किंजले आखूड व वाकडी [→ फूल] पेटिकाफळांपैकी प्रत्येक ७·५ सेंमी. लांबीचे, पिकण्यापूर्वीच तडकून (पेटीप्रमाणे) उघडणारे असते. अशा बहुधा पाचांचा एक झुबका (घोसफळ) येतो फळाची साल पातळ, पानासारखी असते. बहुधा प्रत्येक फळात दोन सपाट, लंबगोल व पिवळ्या बिया असतात. सालीतील धाग्यांपासून दोऱ्या, दोरखंडे करतात व पाला गुरांना खाऊ घालतात. रस्त्यांच्या दुतर्फा व बागेत ही झाडे लावतात.

पहा : स्टर्क्युलिएसी.

पराडकर, सिंधु अ.

कौशी