सिल्व्हर ओक : पानाफुलांसह फांदी.

सिल्व्हर ओक : (सिल्क ओक लॅ. ग्रेव्हिलिया रोबस्टा कुल-प्रोटिएसी). शंकूप्रमाणे पर्णसंभार असलेला हा सदापर्णी वृक्ष मूळचा उपोष्ण कटिबंधीय ऑस्ट्रेलियामधील असून तेथे तो सु. ४५ मी. उंच वाढतो. परंतु भारतात मध्यम आकाराचा असतो व सस.पासून ६२०— १,८६० मी. उंचीपर्यंत आढळतो. पाने एकाआड एक, १५—३० सेंमी. लांब नेचासारखी, काहीशी खंडित व पिसासारखी, वरुन गर्द हिरवी व खालून रुपेरी असल्यावरुनच इंग्रजी नाव पडले. खोडाच्या जून भागावर वाढलेल्या पर्णहीन फांद्यांवर नारिंगी फुले एकाकी किंवा पुष्कळ मिळून ७— १० सेंमी. मंजिऱ्यांवर मार्च—मे मध्ये येतात. पेटिका फळ तिरपे व चिवट असून त्यात एक किंवा दोन बिया असतात.

नवीन लागवड बियांपासून सहज होते व वृक्षांची वाढ जलद होते. वृक्ष जोराच्या वाऱ्यास टिकत नाही परंतु दहिवर किंवा पाण्याच्या दुर्भिक्षाला टिकून राहतो. त्याची पाने नेचासारखी रुपेरी व झाडाचा आकार वैशिष्ट्यपूर्ण असल्याने बागेत किंवा रस्त्यांच्या दुतर्फा लावतात, तसेच सावलीसाठी चहा व कॉफीच्या मळ्यांतही लावतात. सालीपासून पिवळा डिंक मिळतो व तीत टॅनिन असते पानांचे खतही करतात. लाकूड तांबूस भुरे, कठीण, हलके, लवचिक व टिकाऊ असून त्यापासून कपाटे, सजावटी सामान, प्लायवुड, खेळणी, तक्ते, पिपे, बॉबिन, कागदाचा लगदा इ. बनवितात.

सिल्वहर ओक

जमदाडे, ज. वि.