फांजी : (फांद हिं. ढाककी वेल सं. फंजी लॅ. रिविया हायपोक्रॅटेरिफॉर्मिस कुल- कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी). हे मोठे आरोही (वर चढणारे) किंवा पसरट वाढणारे झुडूप कोकणात व दख्खनमध्ये आढळते शिवाय प. द्वीपकल्प, आसाम व सिंध येथेही सापडते. याची पाने मोठी, साधी, गोलसर, एकाआड एक, तळाशी हृदयाकृती, खालच्या बाजूस रेशमी-केसाळ फुले खाली नळीसारखी व वर समईप्रमाणे अपछत्राकृती, दालचिनीसारख्या वासाची, पांढरी, मोठी (५ सेंमी. व्यासाची), सामान्यतः एकेकटी (क्वचित अधिक) असून ती ऑगस्ट-ऑक्टोबर या काळात येतात. फळ १-२ सेंमी. व्यासाचे, गोलसर, तपकिरी, गुळगुळीत, तीक्ष्णाग्र व न तडकणारे असते बिया २- ४ पिठूळ मगजाने वेढलेल्या असतात. दुष्काळात याच्या कोवळ्या प्ररोहांची (कोंबांची) व पानांची (अळूप्रमाणे) भाजी करतात. ही वनस्पती शीतल, बलकर, तुरट, तिखट, व वृष्य (धातू पुष्ट करणारी) असून वात, पित्त, खोकला, हृद्रोग, आमदोष व वेदना यांवर उपयुक्त आहे.

फांजीच्या वंशातील दुसरी जाती फांद (रि. ऑर्नेटा) ही असून तीही फांजीप्रमाणे पण सुगंधी फुलांची वेल आहे. कोकणात ही वेल सुपरिचित असून तिचीही भाजी करतात. तिच्या पानांचा रस दूध साखरेबरोबर अर्श रोगात देतात. मुलांच्या अंगावर उठणाऱ्या पुरळावर हिच्या फांदीचा रस चोळतात. या वंशाच्या याच दोन जाती भारतात आढळतात.

पहा : कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी.

जमदाडे, ज. वि.