झायगोफायलेसी : (गोक्षुर-गोखरू कुल). फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) ह्या वनस्पति-कुलाचा समावेश ⇨जिरॅनिएलीझमध्ये (भांड गणात) केला असून याशिवाय त्या गणात आणखी सहा-सात कुले अंतर्भुत आहेत. या कुलातील बहुसंख्य वनस्पती ओषधीय [⟶ ओषधि], क्षुपे (झुडपे) व वृक्ष असून उष्ण व उपोष्ण कटिबंधांत त्यांचे सु. सतरा वंश व शंभर जाती आढळतात. पाने बहुधा समोरासमोर, क्वचित एकाआड एक, उपपर्णयुक्त, संयुक्त, द्वि-किंवा त्रि-दलिक (२-३ दलांची) किंवा पिच्छकल्प (पिसासारखी) असतात. उपपर्णे जुळी, सतत राहणारी व कधी काटेरी असतात फुले द्विलिंगी, पांढरी, पिवळी, लाल किंवा क्वचित निळी असतात  पाकळ्या सुट्या, चार ते पाच किंवा क्वचित नसतात त्याखालची पुष्पदले (संदले) तितकीच, सुटी, क्वचित तळाशी जुळलेली केसरदले चार ते पाच किंवा पाकळ्यांच्या दुप्पट वा तिप्पट, त्यांच्यासमोर व त्यांना चिकटलेली (अपिप्रदललग्न) असतात. परागकोश विलोल (सहजच हलणारे) किंजपुट क्वचित किंजल्कावर, कोनीय किंवा सपक्ष, चार ते पाच कप्प्यांचा असतो [⟶ फूल]. बीजके बहुधा दोन, क्वचित एक फळ विविध प्रकारचे (मृदुफळ नसते), कधी दोन ते दहा खंडांत विभागणारे किंवा बोंडासारखे वा न तडकणारे व काटेरी असते. प्रत्येक कप्प्यात एक अथवा दोन बीजे, क्वचित अधिक. ⇨गोखरू (सराटा), हरमल, लिग्नम व्हिटी, धमासा इ. उपयुक्त वनस्पती  याच कुलात येतात. महाराष्ट्रात याचे  सु. आठ वंश व दहा जाती आढळतात.

चौगले, द. सी.