रामबुतन : (रामबुस्तन लॅ. नेफेलियम लापासियम कुलसॅपिंडेसी). फुलझाडांपैकी [ ⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] खाद्य फळाकरिता प्रसिद्ध असलेला हा सु. १० –१५ मी. उंच व शोभीवंत वृक्ष मूळचा मलेशियातील असून भारतात व उष्ण कटिबंधातील इतर देशांत याचा प्रसार झाला आहे. याच्या नेफेलियम ह्या प्रजातींत सु. ३० –३५ जाती असून भारतात दोन आढळतात. त्यांपैकी ही एक आहे. याचे सु. अकरा प्रकार लागवडीत आहेत. भारतात निलगिरी पर्वताच्या उतरणीवर काही झाडे लावली आहेत. याची साल गर्द तपकिरी-करडी व पाने एकाआड एक, संयुक्त (१० –२५ सेंमी. लांब) व पिसासारखी असून दलांच्या ५ –७ जोड्या असतात दल (सु. १० सेंमी. लांब) दीर्घवृत्ताकृती किंवा आयत, पातळ व चिवट असते. फांद्यांच्या टोकांस व पानांच्या बगलेत लहान, पांढऱ्या नियमित एकलिंगी व द्विलिंगी फुलांच्या १५ सेंमी. लांब व विरळ परिमंजऱ्या जुलै-ऑगस्टमध्ये येतात. सप्टेंबर ते नोव्हेंबरात गोलसर किंवा लंबगोल, साधारणतः अंड्याएवढ्या, काटेरी, शेंदरी, नारिंगी किंवा किरमिजी रंगाच्या मृदुफळांचे घोस येतात फळ ३·८ X १·२ सेंमी. असते. फलावरण पातळ पण चिवट असून त्यावर लांब, नरम, पिवळट ते गर्द लाल काटे असतात. फळात पांढऱ्या किंवा गुलाबी, रसाळ, आंबूसगोड मगजाने वेढलेले सु. २·५-३·५ सेंमी. लांब, चपटे व आयताकृती बी असते. बियांत ३७% – ४३% घन मेद असतो. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨सॅपिंडेसी अथवा अरिष्ट कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

फळे काहीशी ⇨लिचीसारखी असून गोड रसाळ मगजामुळे खाद्य असतात. ती कच्ची किंवा पाकात शिजवून अथवा इतर फळांत मिसळून खातात. फळांच्या सालीत टॅनीन व विषारी सॅपोनीन असते. बियांतील पांढऱ्या मेणाला ‘रामबुतन टॅलो’ म्हणतात. वितळल्यावर त्याला सुगंध येतो ते खाद्य असून साबण आणि मेणबत्त्या करण्यास उपयुक्त असते. बिया कडू व मादक असतात, त्या भाजून खातात. फळे स्तंभक (आकुंचन करणारी), दीपक (भूक वाढवणारी) व कृमिघ्न (कृमींचा नाश करणारी) असतात. त्या कंबोडियात ज्वरनाशक म्हणून वापरतात, तसेच त्यांचा काढा ज्वर व अतिसारात देतात पानांचे पोटीस डोकेदुखीवर लावतात. या वृक्षाचे लाकूड जड व कठीण, लालसर किंवा तपकिरी असून सुकताना ते चिंबते. त्यामुळे ते साध्या बांधकामासाठी वापरतात.

बिया व दाब वा गुटी कलमे लावून याची लागवड करतात. कलम लावल्यापासून सु. ६ वर्षांनी फळे येतात. दरवर्षी एका झाडापासून सु. ९ किग्रॅ. फळे मिळतात.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VII, New Delhi, 1966.

2. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol.I, Delhi, 1975.

परांडेकर, शं. आ.