लोबेलिएसी : (देवनल कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक लहान कुल. या कुलाचा अंतर्भाव जे. हचिन्सन यांनीकँपॅन्यूलेलीझ अथवा घंटापुष्प गणात केला असून कँपॅन्यूलेसी अथवा घंटापुष्प कुलाशी त्याचे जवळचे नाते दर्शविले आहे. या कुलातील काही प्रजातींचा समावेश काही शास्त्रज्ञांनी कँपॅन्यूलेसी कुलात करून मूळच्या कुलाला स्वतंत्र दर्जा दिलेला नाही. कंपॉझिटी  (सूर्यफूल कुल) वकुकर्बिटेसी (कर्कटी कुल) यांच्याशीही लोबेलिएसीचे साम्य आढळते. अनेक शास्त्रज्ञांनी ‘लोबेलिऑइडी’ या नावाने या कुलाचा अंतर्भाव कँपॅन्यूलेसी कुला त केला आहे. यामुळे ते उपकुल ठरते. यातील वनस्पती बहुधा ओषधीय [नरम व लहान ⟶ ओषधि] असून त्यांचा प्रसार उष्ण व उपोष्ण कटिबंधांत आहे. काही जाती उत्तर व दक्षिण समशीतोष्ण प्रदेशांत आढळतात. या कुलात सु. ८ प्रजातींचा समावेश आहे व त्यांतील जातींत दुधासारखा रस [⟶ चीक] असतो. खोड खालच्या बाजूस (क्वचित वरच्या बाजूस) कठीण असते. पाने साधी, एकाआड एक व फुले द्विलिंगी, क्वचित एकलिंगी असतात. संवर्त (पाकळ्यांखालचा भाग) किंजपुटास खाली चिकटलेला असून वर पाच संदले स्पष्ट दिसतात. पुष्पमुकुट (प्रदलमंडल अथवा पाकळ्यांचे वर्तुळ) एकसमात्र (एका उभ्या पातळीने दोन सारखे भाग होणारे), अपिकिंज अथवा परिकिंज (स्त्री-केसराच्या वरच्या किंवा त्याच पातळीत), मुक्त प्रदल (सुट्या पाकळ्यांचे) व द्वयोष्ठी (दोन ओठांप्रमाणे) असतात. केसरदले पाच पाकळ्यांशी एकाआड एक असून कधी अपिप्रदल लग्न (पाकळ्यांवर आधारलेले) व परागकोश जुळून किंजदलाभोवती (स्त्री-केसराभोवती) नळीप्रमाणे असतात [⟶ सूर्यफूल]. किंजपुट अधःस्थ किंवा अर्धवट अधःस्थ (इतर पुष्पदलांच्या खालच्या पातळीवर पूर्णतः किंवा अंशतः), १ ते ३   कप्प्यांचा व बीजके (अविकसित बीजे) अनेक आणि अक्षलग्न असतात [⟶ फूल]. फळ मांसल किंवा शुष्क (बोंड) आणि बिया सपुष्क (दलिकाबाहेर अन्नांश असलेल्या), लहान व अनेक असतात.

ह्या कुलातील काही वनस्पती बागेत शोभेकरिता लावतात. भारतात लोबेलिया प्रजातीतील काही जाती सह्याद्री, निलगिरी, पळणी इ. टेकड्यांत आढळतात. त्या औषधी आहेत व काही विषारी आहेत [⟶ देवनळ]. कारखोही (लोबेलिया ट्रायगोना) ही जाती नेरळ. महाबळेश्वर व लोंढा येथे उगवणारी निळ्या फुलांची ओषधी आहे.

संदर्भ : 1. Lawrence, G.H.M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

           2. Rendle, A.B. The Classification of Flowering Plants, Vol.II, Cambridge, 1963.

दोंदे, वि. पं.