नीरब्राह्मी : (१) फुलाफळांसह वनस्पती, (२) फूल, (३) दीर्घस्थायी संवर्त (पुष्पकोश) व छदके यांसह फळ, (४) बीज. नीरब्राह्मी : (बाम हिं. जलनीम, सफेद कम्मी गु. जलनेवरी, कडवीलुणी क. नीरू ब्रह्मी सं. नीरब्राह्मी इं. थाइम लीव्हड ग्रॅटिओला लॅ. बॅकोपा मोनिएरा, हर्पेस्टिस मोनिएरा कुल-स्क्रोफ्यूलॅरिएसी). ह्या सरपटत वाढणाऱ्या मांसल व नाजूक वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) ⇨ ओषधीचा प्रसार महाराष्ट्रात (कोकणात) व दख्खनमध्ये शिवाय भारतात इतरत्र ओलसर व पाणथळ जागी आहे. श्रीलंकेत व इतर उष्ण देशांतही ती कोठे कोठे आढळते. खोडापासून खाली मुळ्या व वर फांद्या फुटतात. पाने साधी, बिनदेठाची, समोरासमोर, लहान, आयत-चमसाकृती (चमच्यासारखी), मांसल असून त्यांवर काळसर ठिपके असतात. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ स्क्रोफ्यूलॅरिएसी कुलात (नीरब्राह्मी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फुले लहान, निळी किंवा पांढरी, पानांच्या बगलेत, सच्छदक, एकाकी व जानेवारी ते मे पर्यंत येतात [→ फूल]. बोंड (फळ) गोलसर व टोकदार बीजे अनेक, रेषांकित व लांबट असतात.

तंत्रिका तंत्राची (मज्जासंस्थेची) शक्ती वाढविण्यात आणि दमा, अपस्मार, वेडेपणा, घोगरेपणा इत्यादींवर ही वनस्पती उपयुक्त असते. या वनस्पतीपासून बनविलेले औषधी तूप (ब्राह्मीधृत) अपस्मार व उन्मादवायूवर देतात. ती मूत्रल (लघवी साफ करणारी) व रेचक असते. तिच्यापासून ‘ब्रह्माइन’ हे विषारी अल्कलॉइड मिळते त्याची क्रिया स्ट्रिक्निनासारखी (कुचल्यातील अल्कलॉइडासारखी) असते परंतु हे कमी विषारी आहे. पानांचा रस खनिज तेलाबरोबर संधिवातावर लावतात. हा रस मुलांना खोकल्यावर देतात व वनस्पती उकळून त्याचे पोटीस मुलांच्या छातीवर बांधतात. ती हृदयास पौष्टिक असते. पाँडिचेरीत ही वनस्पती वाजीकर (कामोत्तेजक) समजतात. अभिधान मंजरि (भिषगार्य) मध्ये या वनस्पतीचा उल्लेख आढळतो.

संदर्भ : Mooss, N. S. Ayurvedic Flora Indica, Part I, Kottayam, 1953.

जमदाडे, ज. वि.