अंजीर. (१) पान, (२) फुलोरा (कुंभासनी), (३) पुं-पुष्प, (४) स्त्री- पुंष्प (गुल्म-पुष्प), (५) स्त्री-पुष्प (जननक्षम), (६) फळे, (७) सुके अंजीर.

अंजीर : (क. अंजुरा सं. अंजीर इं. फिग लॅ. फायकस कॅरिका कुल-मोरेसी). हा लहान पानझडी वृक्ष मूळचा बलुचिस्तान, पूर्वभूमध्ये समुद्राभोवतालचा प्रदेश व पश्चिम आशिया येथील आहे. ग्रीकांनी तो कॅरिआ (आशिया मायनर) मधून आणला. लॅटिन नावातील ‘कॅरिका’  हा जातिवाचक शब्द त्यावरून आला असावा. याची पाने ह्रदयाकृती, किंचित खंडीत, ३ ते ५ मुख्य शिरांची, दातेरी व १०-२० सेमी. लांब असतात, फुले एकलिंगी व फारच लहान, काही स्त्री-पुष्पे फलनशील व कार्यक्षम काही वंध्य व फक्त लहानशी गुठळी बनविणारी असतात, त्याना ‘गुल्म-पुष्पे’ म्हणतात. सर्वच फुले ‘कुंभासनी’ नावाच्या विशिष्ट फुलोऱ्यात [→ पुष्पबंध] सदैव राहणारी, हा पुष्पबंध कुंभाप्रमाणे असून त्याच्या पोकळीत पृष्ठभागावर फार लहान फुले व वरच्या बाजूस अति-लहान छदांनी [→ फूल] संरक्षिलेले छिद्र असते, येथे पुं-पुष्पे व गुल्म-पुष्पे एकत्र असतात, स्त्री-पुष्पे कधी त्या सोबत तर कधी दुसऱ्या झाडावर व कक्षास्थ (पानाच्या बगलेतील) कुंभासनीत असतात. फुलांची लक्षणे मोरेसी कुलाप्रमाणे. फुलातील स्त्री-लिंगवाचक भागातील तळाचा फुगीर भाग म्हणजे किंजपुट, त्यावरचा तंतूसारखाभाग तो किंजल व किंजलाचे टोक म्हणजे किंजल्क होय परागण (फुलातील परागकण किंजल्कावर ठेवणे) ‘वरट’ (ब्लॅस्टोफॅगा) नावाच्या कीटकाकडून घडविले जाते. याची मादी प्रथम कुंभासनीत गेल्यावर तेथील गुल्म-पुष्पाच्या आखूड किंजलांच्या किजपुटांत अंडी घालते, लांब किंजलाची स्त्री-पुष्पे तेथे असल्यास त्यांत अंडी घालता येत नाही, कारण त्यांच्या किंजपुटावर केस असतात. अशी लांब किंजले अंडी घालण्यास गैरसोयीची असतात. गुल्म-पुष्पातील अंडी फुटून बाहेर आलेल्या नरांचा व माद्यांचा संबंध येतो व फलित माद्या आता पक्व झालेल्या पुं-पुष्पातील पराग अंगावर घेऊन बाहेर येतात व दुसऱ्या कुंभासनीत जाऊन तेथील स्त्रीपुष्पांच्या लांब किंजलाच्या किंजल्कावर परागण करतात. तेथे गुल्म-पुष्पे असल्यास वरीलप्रमाणे अंडी घालतात व सर्व प्रकार पुनः पूर्वीप्रमाणे घडून येतो. पुं-पुष्पे व स्त्री-पुष्पे एकाच वेळी एक होत नाहीत. परागगणानंतर कुंभासनीतील पुं-पुष्पे पक्व होऊन नवीन माद्यांवर परागकण पडेपर्यंत माद्यांना आत कोंडून रहावे लागते, कारण छिद्राजवळची छदे ते बंद ठेवतात. पुढे ती छदे वाळून मार्ग मोकळा होतो. या यंत्रणेस ‘कारा-यंत्रणा’ म्हणतात. वड, पिंपळ, उंबर इ. जातींत हाच प्रकार सामान्यतः आढळतो. परागणानंतर कुंभासनीचे रुपांतर संयुक्त फळात होते,त्यास औदुंबरिक (औदुंबराच्या फळासारखे उंबरासारखे) म्हणतात व यातील स्त्री-पुष्पात ‘कुत्स्नफल’ [ →फळ] व बी तयार होते हेच अंजीर होय. 

अंजिराचे चार प्रकार आहेत. यूरोपातील सामान्य प्रकारात परागणाशिवाय होणारे, बिया नसलेले फळ वर्षातून दोनदा बनते. दुसरा अतिशय उत्तम फळ बनविणारा ‘स्मर्ना’ प्रकार यात स्त्री-पुष्पांची कुंभासनी असून रानटी अंजिराच्या साहाय्याने परागण केल्याशिवाय फळ बनत नाही. तिसऱ्या ‘रानटी’ प्रकारात पुं-पुष्पे, स्त्री-पुष्पे व गुल्म-पुष्पे एकत्र असलेल्या कुंभासनी असतात. चौथा प्रकार ‘सान पेद्रो’ हा कॅलिफोर्नियात पिकवतात याला वर्षातून दोनदा बहार येतो, पहिल्या बहरास परागणाची जरुरी नसते पण दुसऱ्यास असते. ‘स्मर्ना’ अंजिराच्या झाडावर रानटी अंजिराच्या कुंभासनी बांधल्यावर त्यातून आलेल्या वरटाच्या माद्या स्मर्नाच्या कुंभासनीत शिरून तेथे परागण झाल्याने पुढे त्यात बी बनते ‘सामान्य’ प्रकारात बी नसलेली फळे बनवण्याचे कारण यावरून लक्षात येईल. तेथे परागण नसते. औदुंबरिक फळे उघडल्यावर त्यात अनेकदा जे बारिक किडे (केंबरे) दिसतात ते वरटच होत.

पहा : पुष्पबंध फळ.                                             

ज्ञानसागर, वि. रा.

उपयोग : पिकलेली ताजी अंजीरे फार रुचकर असतात. तसेच सुकविलेली गोड फळे व मुरंबा उत्तम खाद्य आहे. ती सारक, शामक, शक्तिवर्धक व वेदनाहारक आहेत. झाडातील चीक कटुतिक्त असून चामखिळीवर लावतात. अंजिराचे पोषणमूल्य उच्च प्रकारचे असते. त्यांच्यामध्ये सु. ८४% गर आणि १६% सालपट असते. भारतातील पिकलेल्या अंजिरांमध्ये रासायनिक घटकांची सरासरी शेकडेवारी पुढे नमूद केल्याप्रमाणे असते : पाणी ८०·८, प्रथिन १·३, वसा ०·२, खनिजद्रव्य ०·६, कार्बोहायड्रेट १७·१, कॅल्शियम ०·०६, फॉस्फरस ०·०३, लोह १·२०, आणि शिवाय कॅरोटीन, निकोटिनिक अम्ल, रिबोफ्लाविन, ॲस्कॉर्बिक अम्ल इ. जीवनसत्त्वे असतात. पूर्ण पिकून गळून पडलेल्या अंजिरांपासून खाण्यासाठी सुकी अंजिरे तयार करतात. ती इराण, अफगाणिस्तान आणि ग्रीसमधून भारतात आयात करण्यात येतात. भारतातही थोड्या प्रमाणात सुकी अंजिरे बनवितात सुके अंजीर बरेच दिवस टिकते. परदेशी पाठविण्यासाठी अंजीर सुकविताना ते चपटे करून गवताच्या दोऱ्यात ओवून त्यांच्या माळा तयार करतात. सुक्या अंजिरांची प्रतवारी त्यांच्या रंगावरून आणि आकारावरून ठरवितात.

हवामान व लागवड : अंजीर हे साधारण थंड हवामानात वाढणारे मध्यम आकाराचे फळझाड असून त्याची वाढ, उंची आणि विस्तार हे त्यांची जात, लागवड केलेल्या जमिनीचा मगदूर व झाडाला दिलेली छाटणी यांच्यावर अवलंबून असतात. महाराष्ट्रातील हवामानात त्याची पानगळ पावसाळ्यात होते उत्तर भारतात ती हिवाळ्यात म्हणजे डिसेंबर-फेब्रुवारी या काळात होते.

भूमध्य समुद्रालगतच्या इटली, स्पेन, तुर्कस्तान, ग्रीस, पोर्तुगाल व अल्जेरिया या देशांमध्ये अंजिराची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. त्याचप्रमाणे अफगाणिस्तान व अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथेही मोठ्या प्रमाणावर लागवड होते. भारतातील म्हैसूर राज्याच्या बंगलोर, श्रीरंगपट्टम्, बेल्लारी आणि अनंतपूर जिल्ह्यांत अंजिराची लागवड होत असते.

हे पानगळ होणारे फळझाड असल्यामुळे ह्याच्या विश्रांतिकालात हवेतील उष्णतामान -२° से. पर्यंत खाली गेले तरी त्याला ते दाद देत नाही. मात्र नवीन फूट निघण्याच्या वेळी ०·३° ते २·०° सें.च्या खाली हवेतील उष्णतामान गेल्यास नवीन निघणाऱ्या फुटीला अपाय पोचतो. भारतातील अंजिराच्या लागवडीच्या प्रदेशात १ ° से. खाली उष्णतामान बहुधा उतरत नाही. फळे पिकण्याच्या काळात उष्ण व कोरडे हवामान असल्यास लागवड यशस्वी होते. या काळात हवेत आर्द्रता आल्यास फळे तडकतात.

जाती : भारतातील निरनिरळ्या भागांत अंजिराच्या निरनिराळ्या जाती लावल्या जातात. पुणे भागात (महाराष्ट्र) होणाऱ्या अंजिराचा आकार घंटेसारखा, आकारमान मध्यम प्रकारचे व रंग फिकट तांबूस असतो. दक्षिण भारतात ‘मार्सेलिस’ नावाची जाती लावतात. तिच्या फळाचा रंग फिकट हिरवा असतो, आकारमान मध्यम, चव गोड व फळातल्या गराचा रंग पांढरा असतो. ‘ब्लॅक इश्चिया’ नावाची आणखी एक जाती दक्षिण भारतात लावतात.

जमीन : अंजिराचे पीक भारी जमिनीपासून ते हलक्या रेताड, एक मीटरपर्यंत खोलीच्या जमिनीत येऊ शकते. पाण्याचा निचरा चांगलाहोणाऱ्या जमिनीत हे फळझाड चांगले वाढते. भारी व पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीतील झांडापासून मिळणारी फळे गोडीला कमी असतात. हलक्या जमिनीत अंजिराची लागवड करावयाची असल्यास तिच्यामध्ये जैव पदार्थांचा पुरवठा भरपूर करतात. अंजिराकरिता मध्यम भारी, थोडे चुनखडीचे प्रमाण असलेली जमीन उत्तम समजतात.

अंजिराची अभिवृद्धी : छाट-कलमांपासून करतात. छाट-कलमे छाटणीच्या वेळेस फांदीच्या टोकाकडील भागापासून कमीतकमी एक वर्षाच्या जून असलेल्या वाढीपासून घेतात. उत्तर भारतात छाट-कलमे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये घेतात कारण त्यावेळी तेथील हवामानाप्रमाणे ह्या झाडाचा विश्रांतिकाल असतो. ही छाट-कलमे ओल्या रेतीत रुजवितात व रुजल्यानंतर कायम जागी लावतात. पुणे भागात, रुजलेली छाट-कलमे जुलै-ऑगस्टमध्ये कायम जागी लावतात. छाट-कलमे रुजण्यासाठी लावताना ती पक्व फांदीपासून घेतात व त्यांच्यावरची पाने काढून टाकतात त्यांची लांबी २० सेंमी. ठेवतात. पन्हेरी बागेत छाट-कलमे रुजविण्यासाठी लावताना वाफ्यात दोन ओळीत अर्धा मी. आणि ओळीतील प्रत्येक छाट-कलमात २०-३० सेंमी. अंतर सोडून लावतात. काही बागायतदार ही छाट-कलमे जून-जुलैमध्ये कायम जागी लावतात. मात्र प्रथम एका जागी २-३ छाट-कलमे लावतात. ती रुजल्यानंतर त्यांतले चांगले जोमदार वाढीचे एक ठेवून बाकीची काढून टाकतात. अंजिराच्या झाडापासून गुटी कलमदेखील तयार करतात. उंबराच्या खुंटावर अंजिराचे भेट कलम करता येते. जंगली अंजिराच्या झाडाचे चांगल्या जातीच्या अंजिरात रूपांतर करावयाचे असल्यास बगल-कलम पद्धतीने ते करता येते.

मशागत : लागणीपूर्वी जमीन चांगली खोल नांगरून वखराच्या पाळ्या देतात. लागणीकरिता ठराविक अंतरावर अर्धा मी. लांब,रुंद व खोल खड्डे करतात व त्यांत खतमाती टाकून ते भरून काढतात. दोन खड्डयांमधील अंतर जमिनीच्या मगदुरावर अवलंबून ठेवतात. आंध्र व तामिळनाडू राज्यात ते ३·५ मी. आणि महाराष्ट्रात ३·५ ते ४·५ मी ठेवतात. उत्तर भारतात जानेवारीच्या सुमारास लागण करतात, महाराष्ट्रात ती पावसाळ्यात म्हणजे जुलै-ऑगस्ट महिन्यांत आणि दक्षिण भारतात ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यांत करतात. लागण करताना कलम लावण्यापूर्वी प्रत्येक खड्ड्यात ४५ किग्रॅ. शेणखत घालतात. शिवाय १ किग्रॅ. हाडांचा चुरा त्यात मिसळतात. पुढे बहार धरण्याच्या वेळी प्रत्येक झाडाला ४५ किग्रॅ. चांगले कुजलेले शेणखत देतात.

 पाणी : अंजिराच्या लागवडीच्या सुरुवातीच्या काळात नियमितपणे पाणी देतात. उत्तर भारतातील हवामानात अंजिराच्या झाडांचा हिवाळ्यातील विश्रांतीकाल असतो. अशा वेळी त्यांना पाण्याची आवश्यकता नसते. पश्चिम व दक्षिण भारतात मात्र अंजिराला नियमित पाणी द्यावे लागते. झाडावर फळे असताना पाणी नियमितपणे देतात. पुढे फळे पिकत असताना पाण्याचे प्रमाण कमी करतात. या काळात पाणी जास्त दिल्यास फळे बेचव होतात.

छाटणी : अंजिराच्या लागवडीमध्ये छाटणीला फार महत्व असते. जर झाडाच्या वेळच्या वेळी योग्य प्रकारे छाटणी केली नाही तर खालून बुंध्याकडून पुष्कळ फूट फुटून ते झाड झुडपासारखे वाढू लागते. जमिनीलगत फुटव्यांची अशी वाढ झाली पाहिजे खोड-किड्याचा उपद्रव वाढतो. शिवाय या वाढीमुळे आंतर-मशागतीला अडचण उत्पन्न होते. त्याकरिता सुरुवातीपासूनच अंजिराचे एकच खोड वाढू देतात व त्याला दीड मी. उंचीपासून वर फांद्या फुटू देतात.अंजिराच्या झाडास वाढ कमी असल्यास फांद्यांवरच्या सुप्त (मुक्या) डोळ्यांच्या (कळ्यांच्या) वर चाकूने खाचा पाडतात, त्यामुळे मुके डोळे फुटून त्यांतून नवीन फांद्या निघतात. एका फांदीवरील दोहोंपेक्षा अधिक डोळ्यांच्या वर खाचा पाडीत नाहीत.

बहार : अंजिराच्या दोन बहारांपैकी पावसाळ्यात येणाऱ्या बहाराला ‘खट्टा बहार’ म्हणतात. उन्हाळ्यात येणाऱ्या बहाराला ‘मीठा बहार’ म्हणतात. खट्ट्या बहाराची फळे आंबट व पाणचट म्हणून ती कोवळेपणीच काढून टाकतात. फक्त मीठा बहाराची फळे खाण्यालायक रुचकर गोड असतात, म्हणून त्यांना मागणी असते. 

बहार धरण्यापूर्वी महाराष्ट्रात जून-जुलैमध्ये पाणी देणे बंद करतात. फळासाठी बहार दुसऱ्या वर्षापासून धरतात. ॲड्रियाटिक प्रकारच्या फुलोऱ्यांतील स्त्री-पुष्पांना परागणाची आवश्यकता नसते. महाराष्ट्रातील अंजिरेही अशाच प्रकारची असतात. जून-जुलैमध्ये पश्चिम महाराष्ट्रात अंजिराच्या झाडांच्या विश्रांतिकाल असतो. या काळात त्याची पाने गळून पडतात. सप्टेंबर मध्ये झाडाच्या बुंध्याभोवतालची जमीन खणून मुळ्या उघड्या करतात. एका आठवड्यात प्रत्येक झाडाला सु. ४५ किग्रॅ. शेणखत किंवा कंपोस्ट खत घालून मुळ्या झाकून वाफे करतात. खत खोडापासून दूर पसरून मातीत चांगले मिसळून घेतात. पहिले पाणी हलके देतात. दुसरी पाळी तिसऱ्या दिवशी आणि तिसरी पाचव्या दिवशी नेहमीप्रमाणे देतात. पुढे फळे झाडावर असतील तोपर्यंत दर ८-१० दिवसांनी पाणी देतात. पाणी न दिल्यास फळे गळून पडतात.

उत्पन्न: महाराष्ट्रात मार्च ते मे या काळात फळ तयार होते. उत्तर भारातात मे ते जुलैमध्ये तयार होते. महाराष्ट्राच्या पुरंदर भागात एक हेक्टरमधील झाडांपासून ९,८०० – १४,८०० किग्रॅ. पक्व फळे मिळतात. फळे एक दिवसाआड काढतात. लागणीपासून १२ वर्षेपर्यंत अंजिराची झाडे चांगली फळे देतात. त्यानंतर उत्पन्न कमी कमी येऊ लागते. २० वर्षांनंतर झाडे पोसणे फायदेशीर ठरत नाही.

 पाटील, अ. व्यं.

कीड: अंजिराचे खोड पोखरणारा किडा खोडाच्या जमिनीलगतच्या भागात भोक पाडून खोडात शिरतो. ती जागा खोडाबाहेर पडलेल्या भुश्यावरून ओळखता येते. हा खोडातील किडा तारेच्या आकड्याने ओढून बाहेर काढून मारतात, किंवा खोडातील भोकात रॉकेलचा बोळा बसवून ते वरून मातीने लिंपून टाकतात. याशिवाय तुडतुडे, देवीकीड, पिठ्या वगैरे कीटकांचा अंजिराला उपद्रव होतो. पिठ्या कीटकांपासून फांद्यांना डोळ्यांना आणि फळांना उपद्रव पोचतो. त्यापासून बचाव करण्याकरिता डायझिनॉनचा फवारा मारतात.

रोग : अंजिराच्या पानावर तांबेरा पडतो, तो सिरोटीलियम फिसाय या कवकामुळे उद्भवतो. त्याच्यामुळे पानाच्या खालच्या बाजूवर तपकिरी पुटकुळ्या दिसतात. त्याच्यामुळे २० ते ८० टक्के उत्पन्न घटते. थंडीच्या दिवसांत हवेत आर्द्रता वाढल्यास रोगाची वाढ व प्रसार होतो. पाने व अपक्व फळे गळून पडतात. या रोगावर उपाय म्हणून ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत बोर्डो मिश्रण ( ३ : ३ : ५०० कसाचे ) किंवा इतर कवकनाशक फवारतात. अंजिरावर बांडगूळही आढळते.

कुळकर्णी, य. स.

संदर्भ : 1. Governmen of India, Directorate of Extension, Ministry of Food and  AgricultureHorticulture in Central India, New Delhi, 1960.

           2. Hayes, W. B. Fruit Growing in India Allahabad 1960.