कीटकभक्षक वनस्पति : निसर्गात अशा काही वनस्पती आहेत की, ज्यांना पोषणाकरिता कीटकासारख्या भक्ष्याची आवश्यकता भासते. अशा वनस्पतींना नायट्रोजनयुक्त पदार्थ आणि लवणे जमीन, पाणी किंवा वातावरणातून जरी मिळत असले तरी ते गरजेपक्षा कमी पडतात. ही गरज पूर्णपणे भागविण्यासाठी पूरक अन्न त्यांना शोधावे लागते. कीटकांच्या शरीरांतून त्यांना हे पदार्थ किंवा लवणे मिळू शकतात. त्यांच्या पानांचे किंवा त्यांच्या भागांचे ह्याकरिता विविध स्वरूपांत रूपांतर झालेले असते. अशा प्रकारच्या कीटकभक्षक वनस्पतींचे १५ वंश व सु. ४५० जाती असून त्यांची कुले आणि भौगोलिक विस्तार कोष्टकात दर्शविला आहे.

कीटकभक्षक वनस्पतींची कुले व त्यांचा भौगोलिक विस्तार 
कुल आणि वंश जातींची संख्या भौगोलिक विस्तार
१. सारासेनिएसी : ब्रिटिश गुयाना, व्हेनेझुएला

उ. अमेरिकेचा पूर्वभाग, लॅब्राडॉर ते अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा आग्नेय भाग

हेलिअँफोरा 
सारासेनिया  {
डार्लिंग्टोनिया  उ. कॅलिफोर्निया आणि द. ऑरेगन
२. नेपेंथेसी :
नेपेंथिस ६५ { पूर्व उष्ण कटिबंध ते श्रीलंका व मॅलॅगॅसी (मादागास्कर)
३. ड्रॉसेरेसी :
डायोनिया { अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील उ. कॅरोलिना व द. कॅरोलिनाचा उत्तर भाग
ॲल्ड्रोव्हँडा  { यूरोप, भारत, जपान, आफ्रिका, क्वीन्सलॅंड, (ऑस्ट्रेलिया)
ड्रॉसोफायलम  { द. पोर्तुगाल, नैर्ऋत्य स्पेन व मोरोक्को
ड्रॉसेरा  ९० सर्व जगभर
४. बिब्लिडेसी :

बिब्लिस

वायव्य ते नैर्ऋत्य ऑस्ट्रेलिया
५. सेफॅलोटेसी :

सेफॅलोटस

अतिनैर्ऋत्य ऑस्ट्रेलियाचा भाग
६. लेंटिब्युलॅरिएसी :

पिंग्विक्युला

         ३० उत्तर गोलार्ध
युट्रिक्युलॅरिया          २७५ सर्व जगभर
बायोव्ह्युलॅरिया           २ क्यूबा, द. अमेरिकेचा पूर्व भाग
पॉलिपोंफोलिक्स         २ दक्षिण आणि नैर्ऋत्य ऑस्ट्रेलिया
जेनलिसिया १० प. आफ्रिका, द. अमेरिकेच्या पूर्व भागातील उष्ण प्रदेश

यांशिवाय कवकांच्या (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींच्या) वीस किंवा अधिक जाती प्राणिभक्षी असून त्या सर्वत्र आढळतात. वरील कोष्टकावरून असे दिसून येईल की, फुलझाडांच्या भिन्न भिन्न कुलांतील निरनिराळ्या वनस्पती कीटकभक्षक आहेत. लेंटिब्युलॅरिएसी हे कुल सिंपेटॅली वर्गातील असून बाकीची कीटकभक्षक वनस्पतींची कुले कोरीपेटॅली वर्गात समाविष्ट आहेत. यावरून असे दिसून येईल की, कीटकभक्षक वनस्पतींचा उगम त्यांची उत्क्रांती होत असताना दोन किंवा अधिक स्थानांतून झाला असावा.

बहुतेक कीटकभक्षक वनस्पती दमट, दलदलीच्या जागी किंवा वालुकामय भागात आढळतात. कीटकाला पकडता यावे व नंतर तो निसटू नये आणि शेवटी त्याचे पचन व्हावे यांकरिता ह्या वनस्पतींत निरनिराळ्या आश्चर्यकारक योजना आढळतात. त्यांच्या पानांची आवश्यक तशी रूपांतरे होऊन त्यांचे कीटक पकडण्याच्या सापळ्यांत रूपांतर झालेले दिसते. आपले भक्ष्य पकडण्याच्या पद्धतीत कोरीपेटॅली आणि सिंपेटॅली ह्या दोन वर्गांतील कुलांत काही अंशी साम्य आहे. ड्रॉसेरा, अल्ड्रोव्हँडा हे कोरीपेटॅलीतील वंश आणि सिंपेटॅलीतील युट्रिक्युलॅरिया  वंश यांच्यात भक्ष्य पकडण्याच्या बाबतीत विशेषीकरणाची परमावधी गाठल्याचे दिसून येते. पानाचे झालेले रूपांतर पोलादी सापळ्याप्रमाणे डायोनियात दिसते, तर युटिक्युलॅरियात उंदराच्या सापळ्याप्रमाणे योजना असते. हे दोन्ही प्रकाराचे सापळे क्रियाशील असतात. पण जेनलिसियातील सापळा निष्क्रिय स्वरूपाचा असतो. हेलिअँफोरा, सारासेनिया, डार्लिंग्टोनिया, सेफॅलोटस आणि नेपेंथिस या वंशांत पानाचे रूपांतर कलशात झालेले असते. अशा प्रकारचा सापळा निष्क्रिय मानतात. सारासेनियाचा सुगंध, नेपेंथिसच्या प्रपिंडातून (ग्रंथीतून) स्रवणारा मधुरस, ड्रॉसोफायलममधील मध, डार्लिंग्टोनिया, सेफॅलोटस आणि सारासेनिया  यांतील आकर्षक रंग आणि चमकणारे गवाक्ष, ड्रॉसेरातील श्लेष्मल (बुळबुळीत) स्राव इ. गोष्टींनी कीटकांना आकर्षित करण्यासाठी केलेली योजना कौशल्यपूर्ण असते. भक्ष्याच्या पचनाकरिता वितंचकांचे (सजीवांतील रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणार्‍या प्रथिनयुक्त संयुगांचे, एंझाइमांचे) आणि अम्लाचे स्रवण कित्येकांत होते. शरीरक्रियाविज्ञानदृष्ट्या असे दिसते की, प्रथिनयुक्त पदार्थ बहुधा जीवनसत्त्वांच्या स्वरूपात आणि कदाचित पोटॅशियम व फॉस्फरस यांची लवणे मिळविणे हा मुख्य उद्देश त्यांच्यात झालेल्या रूपांतराच्या विशेषीकरणाच्या मागे असावा.

आ. १. हेलिअँफोरा : (अ) कलश, (आ) कलशाचा उभा छेद.

(१) हेलिअँफोरा : या वंशातील हे. न्यूटन्स  ही जाती ब्रि. गुयानातील रॉराइम पर्वतावरील १,८६० मी. उंच दलदलीच्या प्रदेशात आढळते. अतिवर्षा असणाऱ्या आणि दमट हवामानाच्या जागीही ही झाडे वाढतात. याची पाने मूलज (मूळापासून निघाली आहेत अशी वाटणारी) असून त्यांचा गुच्छ असतो. पुष्पबंध (फुलोरा) साधा व अकुंठित (सतत फुले येणारा) असून फुले पांढरी किंवा फिकट गुलाबी व प्रदलहीन (पाकळ्या नसलेली) असतात. सामान्य पाने ३० सेंमी.पर्यंत लांब असू शकतात. मूलक्षोडाच्या (जमिनीतील खोडाच्या प्ररोहांवरच्या (कोंबांवरच्या) शाखांवर पाने येतात व त्यांची वाढ निरनिराळ्या अवस्थेत खुंटलेली असते. पानाचे रूपांतर कलशात झालेले असते. त्याचा आकार वाकड्या नाळक्या (चाडी) सारखा असतो. घंटेसारख्या विस्तारलेल्या भागाचा म्हणजे मुखाचा शेवट चमच्याच्या आकाराच्या भागात झालेला असतो व तो ताठ उभा असतो. कलशाच्या बाहेरील पृष्ठभागावर खूप एककोशिक ताठ केश जोडीने असतात. त्यांचे बाहू उलट्या व्ही (∧) अक्षराप्रमाणे दोन्ही बाजूंस पसरलेले असतात. शिवाय त्वग्रंध्रे (त्वचेवरील सूक्ष्म छिद्रे) व मधुरस स्रवणारे बारीक प्रपिंड या पृष्ठभागावर विखुरलेले असतात. ते विशेषत: कलशाच्या पंखासारख्या भागावर जास्त संख्येने आढळतात. कीटकांना आकृष्ट करताना त्यांचा उपयोग होत असावा. चमच्यासारख्या भागाचा आतील पृष्ठभाग खोलगट आणि गुळगुळीत असतो. त्याच्यावर मोठे मधुरस-प्रपिंड असतात. ह्या भागाच्या खालील व आतील बाजूंस दाट व नाजूक केस असतात. ते खालच्या दिशेने वळलेले असतात. कलशाचा वरचा पसरट भाग आणि खालचा नळीसारखा भाग ह्यांच्यामध्ये असणाऱ्या संकोचाच्या खालच्या आतील भागास केस कमी असतात. पण ते मोठे व सरळ असतात. ह्या भागाच्या खालच्या बाजूस केस मुळीच नसतात व तेथील अपित्वचा (एकमेकींना घट्ट चिकटलेल्या कोशिकांच्या म्हणजे पेशींच्या आवरणाचा थर) चमकणारी व गुळगुळीत असते. ह्या भागाच्या खाली असलेले केस विरळ असतात व ते खालच्या दिशेने वळलेले असतात. हे केस मजबूत व पंजाच्या आकाराचे असतात. घंटेसारख्या भागातील केस जास्त लांब व लवचिक असतात.


मधुरस मिळविण्याच्या आशेने जाणारा कीटक कलशाच्या मुखालगत आला की, त्याचे पाय ह्या लांब व लवचिक केसांवर पडतात व त्याच्या घसरगुंडीस सुरुवात होते. शेवटी तो थेट कलशाच्या तळातील द्रवात जाऊन पडतो. त्याला वरील रचनेमुळे बाहेर पडणे शक्य नसते. द्रवामध्ये सूक्ष्मजंतू असतात. त्यामुळे कीटकाचे अपघटन (मूळ रेणूचे तुकडे पडून लहान रेणू किंवा अणू बनणे) होऊन त्यातील प्रथिने वनस्पतीला प्राप्त होतात. या वनस्पतीच्या कलशात पचन –प्रपिंड नसतात.

आ. २. सारासेनिया परप्युरिया : (अ) कलश, (आ) कलशाचा उभा छेद.

(२) सारासेनिया : या वंशातील सा. परप्युरिया  ही जाती विस्तृतपणे आढळते व तिच्याविषयी बरीच माहिती उपलब्ध आहे. ही सुंदर वनस्पती स्फॅग्नम  या शेवाळीबरोबर दलदलीच्या जागी आढळते. हिच्या पानांची गुच्छाप्रमाणे मांडणी असून त्यांचा उपयोग कीटकांना पकडण्यासाठी सापळ्याप्रमाणे होतो. हेलिअँफोराप्रमाणे याही वनस्पतीच्या पानांचे रूपांतर कलशात झालेले असते. कलशाचा वरचा भाग भडक रंगाचा असून मुखाजवळ मधुरस-प्रपिंड असतात. त्यांच्यामुळे कीटक कलशाकडे आकर्षित होतो. कलशाच्या आतील बाजूस वाकलेले केस असतात. त्यामुळे आत शिरलेल्या कीटकांना बाहेर पडणे शक्य नसते. शेवटी ते कलशात साठविलेल्या पाण्यात बुडून मरतात. ह्या पाण्यात प्रथिनांचे अपघटन करणारे वितंचक असतात. त्यांच्यामुळे कीटकांच्या शरीरांतील प्रथिनांचा विद्राव होतो व कलशाच्या भिंतीवर असणाऱ्या प्रपिंडांद्वारे त्यांचे शोषण होते.

आ. ३. डालिंग्टोनिया

(३) डार्लिंग्टोनिया : या वंशात फक्त डा.कॅलिफोर्निका ही एकच जाती समाविष्ट आहे. स्थानिक लोक याला कोब्रा प्लँट म्हणतात. कारण त्याची पाने फणा उभारलेल्या नागासारखी दिसतात. डार्लिंग्टोनियाच्या वृद्धीचे सर्वसाधारण स्वरूप सारासेनियाप्रमाणेच आहे. मोठी पाने ०·६-०·९ मी. लांब होतात. परिपक्व पानांच्या कलशाची नलिका निमुळती असते, ती वर रुंद असून तिच्या टोकाशी नागफण्यासारखा बाक आलेला असतो, त्यामुळे टोक घुमटासारखे दिसते. कलशाच्या तोंडाशी दुभंगलेले उपांग (अवयव) असते. त्याच्या बाहेरील पृष्ठभागावर बरीच प्रपिंडे व त्वग्रंध्रे असतात. नलिकेला डाव्या किंवा उजव्या बाजूस पीळ पडल्यामुळे शिरस्त्राणासारखा घुमट झाडाच्या अक्षापासून १८० वळलेला असतो. सर्व पाने बाहेरच्या बाजूस वळलेली असतात. ही सर्व योजना भक्ष्याच्या आकर्षणास अनुकूल असते. उपांगाचे पंख बाहेरच्या बाजूस पसरलेले असल्याने त्याला सपाट बैठकीचे स्वरूप आलेले असते. ते कलशाच्या तोंडापर्यंत गेलेले असून त्याच्या औदर भागात मधुरस स्रवत असतो. हेच कीटकांचे प्रमुख आकर्षण होय शिवाय हा भाग लालभडक असून नलिकेच्या वरच्या भागाचा पृष्ठभाग पांढऱ्या ठिपक्यांनी चित्रविचित्र झालेला असतो तसेच त्यावर प्रपिंड व केस असतात. जुनी पाने पिवळट दिसतात. कलशाच्या आतील पृष्ठभागात कीटकांचे शोषण करण्याचे सामर्थ्य असते. त्यांचे अपघटन कलशात असलेल्या पाण्यातील सूक्ष्मजंतूंमुळे होते.

आ. ४. नेपेंथिस : (अ) कलश, (आ) पानाचा देठ, (इ) पुष्पबंध.

(४) नेपेंथिस : ही वनस्पती लहान क्षुप (झुडूप) किंवा महालतेसारखी (मोठ्या वेलीसारखी) असून सु. ९-१२ मी. उंच वाढते. पुष्पबंध अकुंठित असून पानाच्या पात्याचे रूपांतर चंबूसारख्या कलशात झालेले असते. हे कलश पानाच्या टोकावर लांब देठांनी लोंबकळत असतात. देठ पात्यासारखे पसरट असतात. नेपेंथसच्या निरनिराळ्या जातींत कलशाचे विविध आकार व रंग आढळतात. त्यांना सुंदरसे झाकण असते. परंतु त्याची उघडझाप मात्र होत नाही. काहींचा रंग हिरवा असून त्यावर लाल ठिपके किंवा पट्टे असतात. आतील भाग फिकट निळा, लांबी सु. १५ सेंमी. पर्यंत व व्यास ५ सेंमी असतो. काही जातीत झाकण गर्द लाल असते. कलशात द्रव बऱ्याच प्रमाणात मावतो. कीटकाची पुष्प- भेट त्यातील मधुरसाकरिता असते. मधुस्राव करणारे प्रपिंड कलशाच्या काठावर असतात. ते गुळगुळीत व बुळबुळीत असतात. त्यामुळे कीटक त्यावर उतरताच त्यांच्या घसरगुंडीस सुरुवात होते. ते कलशात जातात व त्यातल्या पाण्यात बुडून मरतात. आत गेलेला कीटक परत येऊ नये म्हणून कलशाच्या काठाची रचना न सांडणाऱ्या दौतीप्रमाणे असते  आणि त्यावरचे राठ केस आत डोकावत असतात. कलशाचा आतील भाग छोट्या प्रपिंडांनी आच्छादलेला असतो. त्यातून स्रवत असलेल्या द्रवात प्रथिनाचे अपघटन करणारी वितंचके असतात. त्यांमुळे कीटकांतील नायट्रोजनयुक्त पदार्थ ह्या वनस्पती पचवू शकतात. पचनानंतर कलशात राहिलेले भुंगे, माशा, शलभ (पतंग) इत्यादींचे अवशेष आढळतात. कलशातील पाण्याच्या पाचकतेमुळे बोर्निओतील पुष्कळ लोक ते अपचनावर औषध म्हणून पितात.

आ. ५. डायोनिया : (अ) पानांचा गुच्छ, (आ) वल्लरी, (इ) पाते, (ई) मिटलेली पाळे.

(५) डायोनिया : या वंशातील एकुलत्या एका जातीचे नाव डा. मसायपुला आहे. ह्या लहानशा झाडाच्या मूलक्षोडापासून ४·५–१५ सेंमी. लांबीच्या पानांचे गुच्छ निघतात ती क्षितिजसमांतर असतात. मूलज पुष्पबंधाक्ष (फुलोऱ्याचा मुख्य देठ) लांब असून त्यावर फुलांच्या छोट्या वल्लऱ्या असतात. ह्या प्रत्येकीवर २–१४ फुले असतात. पानांचे दोन भाग असतात. तळाजवळचा भाग कर्णिकाकृती (कर्ण्यासारखे) असून तो मध्यशिरेने पात्यास जोडलेला असतो. पाते मांसल असून त्याची दोन अर्धवर्तुळाकृती पाळे असतात. आणि ती मजबूत मध्यशिरेने एकमेकांशी जोडलेली असतात. ती प्रपिंडीय असून त्यांच्या काठावर दातांप्रमाणे लांबट व बारीक केस असतात ह्या प्रत्येक पाळ्यावर तीन संवेदी (संवेदनशील) व ताठर केस असतात ह्यांना स्पर्श होताच पुस्तकाप्रमाणे दोन्ही पाळे एकदम मिटतात. काठावरील दात एकमेकांत अडकून राहिल्यामुळे भक्ष्य सुटू शकत नाहीत. निमिषार्धात हे सर्व घडून येते. कीटक अशा रीतीने बंदिस्त होताच प्रपिंडातून पाचक रस स्रवू लागून थोड्याच दिवसांत कीटकाच्या शरीराचे अपघटन होऊन त्यातले पदार्थ शोषले जातात.

(६) ॲल्ड्रोव्हँडा : याही वंशात फक्त व्हेसिक्युलोसा  या एकाच जातीचा समावेश आहे. भारतात कलकत्त्याच्या दक्षिणेत असलेल्या मिठागराच्या भागात ती आढळते. ही ⇨ औषधी १०–१५ सेंमी. उंच असून संथ गोड्या पाण्यात वाढते व पृष्ठभागाच्या थोडे खाली तरंगते. तिला मूळ नसून खोड बारीक व त्याच्या प्रत्येक पेऱ्यावर आठ मंडलित (वेढणारी) पाने असतात. प्ररोहाच्या टोकास ताठर केस असतात. डायोनियाप्रमाणेच ह्यात पानाचा देठ पसरट आणि पाते वाटोळे असते  व्यास ४ मिमी. असून पात्याच्या सापळ्याची रचना बहुतांशी डायोनियाप्रमाणे असते. दोन्ही पाळे अंतर्बाह्य गोल असतात. या वनस्पतीचा प्रसार मध्य व दक्षिण यूरोप, उत्तर व पूर्व आशिया आणि दक्षिणेस ऑस्ट्रेलिया (क्विन्सलँड) येथे आहे.


आ. ६. ड्रॉसेरा : (अ) पानांचा गुच्छ, (आ) प्रपिंडयुक्त केस, (इ) पुष्पबंध, (ई) फुलाचा छेद.

(७) ड्रॉसोफायलम : या वंशातील ड्रॉ.ल्युसिटॅनिकम ही फक्त एकच जाती कीटकभक्षक असून तिचा प्रसार मोरोक्को ते पोर्तुगाल व दक्षिण स्पेनमध्ये आहे. ती दलदलीत किंवा दमट जागी न वाढता अतिशुष्क प्रदेशात वाढते. तिची उंची १-१·६ मी. असून खोडाच्या वरच्या फांद्या येतात. व त्यांवर लांब व अरुंद पाने उगवतात. पुष्पबंध अकुंठित प्रकारचा असतो. पाने रेषाकृती असून त्यांच्या वरच्या बाजूस खोल खाच असते. पर्णाग्र उलट्या दिशेने गुंडाळलेले (अवसंवलित) असून पानावर दोन प्रकारचे प्रपिंड असतात:  देठ असलेले श्लेष्मल आणि बिनदेठाचे पाचक प्रपिंड, पानाच्या प्रत्येक कडेवर देठाच्या प्रपिंडाची एक दुहेरी ओळ असते. त्याच्या खालच्या पृष्ठभागावर मध्यशिरेच्या प्रत्येक बाजूस एका ओळीतदेखील हे प्रपिंड असतात. बिनदेठाचे प्रपिंड मात्र पानाच्या दोन्ही पृष्ठांवर सर्वत्र विखुरलेले असतात त्यांतून उद्दीपनाशिवाय स्राव होत नाही. भक्ष्य पकडल्यावर श्लेष्मल प्रपिंडाचे उद्दीपन होऊन स्राव सुरू होतो. ह्या वनस्पतीत सूक्ष्मजंतूक्रियेमुळे पचन घडून येत नाही. फॉर्मिक अम्लामुळे सुरुवातीस प्रथिनाचा विद्राव घडून येत असावा. श्लेष्माला (बुळबुळीत पदार्थाला) मधाचा वास असून ते तीव्र अम्लीय असते. प्रपिंडांच्या वासाने व चकाकणाऱ्या श्लेष्म बिंदूंमुळे कीटक त्यांच्याकडे आकर्षिले जातात. कीटकांचा स्पर्श होताच स्राव सुरू होतो. व त्यामुळे ते पानास चिकटून बसतात. व त्यांचे पचन सुरू होते.

(८) ड्रॉसेरा : ज्या जमिनीत फारसा कस नसतो तेथे बहुधा ही  वनस्पती उगवते. भारतात. ड्रॉ. पेल्टेटा  ही जाती सर्वत्र आढळते. ड्रॉ. बर्मानाय  सपाट प्रदेशात, हिमालयाच्या पायथ्याशी आणि १,२४०–२,४८० मी. उंचीवरील प्रदेशातही सापडते ड्रॉ. इंडिका  छोटा नागपूर (गंगेचे खोरे वगळून) आणि नर्मदेच्या दक्षिणेस असलेल्या भागात (कोकणात भातशेतात व दख्खनमध्येही ओलसर जागी) आढळते. या ओषधीचे खोड बारीक असून त्यावर मूलज पानांचा गुच्छ असतो. पुष्पबंधाक्ष मूलज (फुलोऱ्यांचा दांडा मुळापासून निघालेला). पाने लहान (३५ सेंमी.पर्यत) व त्यांच्या पात्यांवर लाल केस दाटपणे पसरलेले असतात व केसांची टोके टाचणीच्या मस्तकाप्रमाणे गोल असतात. अशा प्रकारचे प्रपिंड व केसावर एका घट्ट आणि चिकट द्रवाचे आवरण असते, त्यामुळे ते दवबिंदूप्रमाणे चमकतात. एखादा कीटक पात्यावर बसतो त्यावेळी प्रपिंडांना त्याच्या आगमनाचा संदेश पोहोचतो व त्यांच्या उद्दीपनास एकदम सुरुवात होते. त्यांच्यातील घट्ट रस स्रवतो आणि कीटक त्यात रुतून बसतो. प्रथम पानाच्या कडांवरील लांब स्पर्शक त्याला उलटून दंश करतात व त्यामुळे कीटक पानाच्या मध्यभागी येतो. या ठिकाणी जे प्रपिंड असतात ते आपल्या द्रवाने त्याचा पूर्ण निकाल लावतात  व त्यातील नायट्रोजनयुक्त अन्न पचवून टाकतात. स्पर्शामुळेच जरी स्पर्शकाचे उद्दीपन होत असले, तरी  कार्बनी (सेंद्रीय) पदार्थ किंवा कीटक यामुळेच त्यांची दीर्घ हालचाल व स्राव शक्य होतो. स्रावात पेप्सिनासारखा वितंचक असावा व शिवाय त्यात अम्लही असावे.

(९) बिब्लिस : या वंशात बि. लायनीफोलिया आणि बि. जायगँशिया ह्या दोन जाती समाविष्ट आहेत. या वनस्पती लहान क्षुपे असून दुसरे पहिल्यापेक्षा बरेच मोठे (सु. ५० सेंमी. उंच) असते. मूलक्षोड काष्ठमय असून प्रमुख खोडावर तळापासून एक ते तीन शाखा निघतात व त्यांवर लांब रेषाकृती पाने येतात. बि. लायनीफोलियात पानांची टोके ड्रॉसोफायलमप्रमाणे बाहेरच्या बाजूस गुंडाळलेली असतात. पानांवर अनेक देठ असलेले श्लेष्मल प्रपिंड असतात. पाने पिवळट हिरवी असून पृष्ठभागावर श्लेष्म-बिंदू चमकत असतात. फुले कक्षास्थ (बगलेत) असून जांभळी किंवा गुलाबी असतात. पानाचा वरचा पृष्ठभाग काहीसा पसरट आणि मध्यभागी थोडा खोलगट असतो. या पृष्ठभागावरील देठ असलेले प्रपिंड संख्येने कमी असतात आणि खालच्या भागावर मात्र बरेच असतात. बिनदेठाचे प्रपिंड पानभर विखुरलेले असतात. त्यांचा आकार छत्रीसारखा असून त्यांच्या स्रावामुळे कीटकाचे पचन होते. देठाच्या प्रपिंडांचा स्राव जास्त घट्ट आणि श्लेष्मल असल्यामुळे त्यांच्याद्वारे कीटक पकडण्यास मदत होते.

आ. ७. सेफॅलोटस : (अ) सत्यपर्ण, (आ) कलश.

(१०) सेफॅलोटस : ह्या वंशात फक्त से.फॉलिक्युलॅरिस  ह्या एकट्या जातीचाच समावेश आहे. ही दलदलीच्या ठिकाणी आढळणाऱ्या शुष्क भागात वाढते. ही गुच्छाकृती असून तिला प्रधान मूळ असते. जून झालेल्या वनस्पतीत मूलक्षोड द्विशाखी असून त्यापासून इतर लहान शाखा निघतात त्यांवर बारीक पाने व कलश येतात. फुले परिमंजरीत येतात. सत्यपर्णांची लांबी १३-१४ सेंमी., पाते अंडाकृती, चिवट व जाड, लांबी देठाइतकी, पृष्ठभाग गुळगुळीत व चकचकीत, कडा विशिष्ट प्रकारच्या रोमांनी युक्त, अग्र तीक्ष्ण व पृष्ठभागावर मधुरसाचे प्रपिंड असतात. काही पानांचे रूपांतर कलशात झालेले असते. कलशाची लांबी तीन ते पाच सेंमी. किंवा अधिक मुख लंबगोल व कडा पन्हाळी असते. सर्वसाधारण संरचना नेपेंथिसच्या कलशाप्रमाणे, पण दाते अधिक स्थूल पण प्रपिंडयुक्त नसतात. ते संख्येने २४ व वाघनखाप्रमाणे आत वाकलेले असतात. कलशाच्या मुखाजवळ तीन काटे असतात व त्यांचा उपयोग कीटकांना आकर्षित करण्याकरिता होतो. कलशाच्या मुखाची उघडी जागा फक्त हीच. एकदा कीटक येथे आला की, त्याला कलशाच्या आत जाण्याचा मोह होतो. कलशाच्या आतील बाजूस वरच्या भागास खालच्या दिशेस वळलेले केस असतात आणि त्यांच्यामध्ये मधुरस-प्रपिंड विखुरलेले असतात. खालच्या भागास मोठे प्रपिंड असतात. अशा प्रकारचे प्रपिंड वरच्या भागाच्या खालच्या बाजूसही असतात ते पचनाचे कार्य करतात.

आ. ८. युट्रिक्युलेरिया : (अ) पाने, (आ) गेळा, (इ) पुष्पबंध, (ई) फूल, (उ) गेळा (उभा छेद).

(११) पिंग्विक्युला : ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) औषधी दमट जागी वाढते व अनेकदा ती डोंगरावर आढळते. या वंशातील सर्व जातींचे बहुतेक गुण पुष्कळ अंशी सारखे असून खरी मुळे जमिनीत, खोड आखूड, उभे व त्यावरची पाने मूलज आणि गुच्छाकृती मांडलेली असतात. काही जातींत ती वाकड्या दिशेने जमिनीपासून वर वळलेली असतात. त्यांना कवकासारखा वास येतो. ती साधी अखंडित, बहुधा अंडाकृती असून त्यांच्या कडा वर वळलेल्या असतात. रंग फिकट हिरवा किंवा भडक प्रकाशात पिवळसर आणि सावलीत गर्द हिरवा दिसतो. ती अतिशय मऊ असून लवकर फाटतात. मूलज पुष्पबंधास पर्णहिन, कक्षास्थ व एकपुष्पी असतात. पानाचा खालचा पृष्ठभाग गुळगुळीत व चमकदार आणि वरच्या पृष्ठभागावर असंख्य सूक्ष्म श्लेष्मल प्रपिंड असतात. दोन्ही पृष्ठांवर असंख्यत्व ग्रंध्रे असतात. पानावरचे प्रपिंड देठाचे व बिन देठाचे असे दोन प्रकारचे असतात. खालच्या पृष्ठावर बिन देठाचे प्रपिंड संख्येने पुष्कळ कमी असतात. त्या प्रपिंडातून चिकट स्राव बाहेर पडतो आणि पानांच्या कडा आत वळतात त्यामुळे जास्त प्रपिंडांशी कीटकांचा संपर्क होतो. अशा रीतींने लहान कीटक पकडण्याचा सापळा तयार होतो. प्रपिंडातील स्रावाने प्रथिनयुक्त पदार्थाचा विद्राव होतो व मग तो वनस्पतीत शोषला जातो.

(१२) युट्रिक्युलेरिया : या वंशातील बहुसंख्य जाती जलवासी असून पाण्याच्या पृष्ठभागाखाली बुडलेल्या पण तरंगत राहतात. (उदा, यु. व्हल्गॅरिस) काही जाती अपिवनस्पती [दुसऱ्या झाडाला चिकटून वाढणाऱ्या पण परजीवी नसलेल्या वनस्पती, → अपिवनस्पति] असून त्या ओलसर शेवाळ्याच्या सान्निध्यात वाढतात. (उदा, यु. रेनिफॉर्मिस) काही जाती पाणथळ किंवा ओलसर वालुकामय जमिनीत आढळतात (उदा., यु. ग्लॉब्युरिफोलिया) ह्या वनस्पती लहान किंवा मोठ्या, दणकट अथवा नाजूक, वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) किंवा बहुवर्षायू असल्या तरी त्यांच्या खोडांतील व पानांतील फरक अस्पष्ट असून मुळे नसतात. पाने सूक्ष्म विभागलेली (खंडित) व त्यांवर सूक्ष्म (५ सेंमी.) गेळ्यासारखी इंद्रिये (पानांची रूपांतरे) असतात इंग्रजीत त्या अर्थाचे नाव (ब्लॅडरवर्ट) आहे, त्यावरून मराठीत ‘गेळ्याची वनस्पती’ असे कोणी म्हणतात. गेळ्याचे तोंड एकांगी दारामुळे (झडपेमुळे) बंद असते ते आत उघडते. उघडण्याची क्रिया तोंडाजवळ असलेल्या चार संवेदी केसांमुळे उद्दीपन झाल्यावर होते व नंतर तोंड ताबडतोब बंद होते. मोठ्या कीटकांना पकडण्याचे काम एखाद्या उंदराच्या सापळ्याप्रमाणे हा गेळा उत्कृष्टपणे बजावतो. कीटकाचे आत अपघटन झाल्यावर निर्माण होणाऱ्या पदार्थाचे शोषण गेळ्याच्या आतील भिंतीवर असणाऱ्या प्रपिंडीय केसांच्या द्वारे होते. गेळ्यात डासांच्या अळ्या सापडतात, त्यावरून वनस्पतींचा उपयोग डास कमी कर‍ण्यासाठी होऊ शकतो. फुले लांब व अकुंठित फुलोऱ्यावर पाण्याबाहेर असतात.


भारतात यु. स्टेलॅरिस  जाती सर्वत्र आढळते. भातशेते, सरोवरे इ. ठिकाणी ती उगवते. यु. फ्लेक्सुओझा  ही जातीदेखील सर्वत्र पाणथळ ठिकाणी दिसून येते. यु. एक्झोलेटा  वायव्य हिमालयापासून आसामपर्यत व यु. मायनर  प. हिमालयात आढळते. महाराष्ट्रात आढळणाऱ्या काही जातींपैकी यु. अल्बो-सिरूलिया, यु. आरक्युएटा, यु.‌ अफिनस आणि यु. हिर्टा  ह्या होत. या सर्व जलवासी आहेत. स्थलवासी जातीय यु. सिरूला, यु. रेटिक्युलेटा  आणि यु. उलिग्नोझा (खंडाळा येथे आढळणारी) यांचा समावेश होतो. ह्या महाराष्ट्रातही आढळतात. यु. स्ट्रायेटुला  ही अपिवनस्पती मसूरी येथे आढळते.

(१३) बायोव्ह्युलॅरिया : ह्या वंशातील दोन जाती बा. ओलिव्हेसी  आणि बा. मिनिमा  होत. ह्या पाण्यात तरंगत राहणाऱ्या लहान वनस्पती आहेत. त्यांच्यात व युट्रिक्युलेरियात बरेच साम्य आहे. मुख्य फरक हा की, बायोव्ह्युलॅरियातील किंजपुटात (ज्यात बीजांडे तयार होतात अशा फुलाच्या फुगीर भागात) फक्त दोन संयुक्त बीजके (बीजांची पूर्वावस्था) असतात. व फळ एकबीजी न फुटणारे बोंड असते. सापळ्याच्या बगलेजवळ शाखा म्हणून फुलोरा उगवतो. खोड धावते व त्याच्या पेऱ्यापासून सहा-सात चितीय (दंडगोलाकार) शाखा निघतात, त्यांच्या द्विपार्श्व व मर्यादित उपशाखांवर टोकास सापळे असतात  ते युट्रिक्युलेरियातल्याप्रमाणेच असतात, परंतु येथे सापळ्यातील दरवाजाचा मध्यभाग खोलीपेक्षा अर्धा असतो आणि त्याच्या वरच्या काठावर सहा ताठ केस असतात पाने नसतात.

आ. ९. जेनलिसिया : (अ) पाने, (आ) कलश.

(१४)‌ पॉलिपोफोलिक्स : जमिनीवर वाढणाऱ्या युट्रिक्युलेरियासारख्याच ह्या वनस्पती दिसतात. फुलाेरा आद्यघन कंदाच्या (कंदासार‍ख्या संरचनेच्या) मस्तकापासून निघतो किंवा दुय्यम शाखातून निघणाऱ्या पुष्पबंधाक्षापासून निघतो. फुलात चार बाह्य प्रदले असतात सापळा युट्रिक्युलेरियातल्याप्रमाणे असतो.

(१५)जेनलिसिया : या वंशातील वनस्पती छोट्या असून दलदलीत किंवा उथळ पाण्यात पृष्ठभागाखाली वाढतात. फक्त पुष्पबंध पाण्याबाहेर असतो. पाने दोन प्रकारची असतात. सामान्य पाने दाटीने वाढतात व त्यांचे गुच्छ असतात. जमिनीसपाट असणारी पाने कलशाप्रमाणे असतात. त्यांच्या खालच्या भागाचे चंबूसारख्या कलशात रूपांतर झालेले असते. कलशाच्या मानेसारख्या भागाचा शेवट पसरट पात्यात झालेला असतो. पात्याचा पृष्ठभाग नलिकाकार मानेच्या आतील भिंतीप्रमाणे ताठ केसांनी व्यापलेला असतो व ते कलशाच्या बाजूकडे वळलेले असते, त्यामुळे कीटकांना  कलशाच्या आत जाणे सोपे असते पण त्यांना बाहेर येता येत नाही. कलशाचा चंबूसारखा भाग १ सेंमी. लांब असून खालचा देठ व नलिकाही तितकीच लांब असतात. वनस्पतीचा बाहेरील पृष्ठभाग गोल व बिनदेठाच्या प्रपिंडीय केसांनी झाकाेळलेला असतो. कलशातील प्रपिंडे कीटकातील नायट्रोजनयु्क्त पदा‍र्थाचे पचन व शोषण करतात.

पहा : चयापचय जलवनस्पति  परिस्थितिविज्ञान पान.

संदर्भ : 1. Darwin, C. The Insectivorous Plants, London, 1908.

2. Lloyd, F. E. The Carnivorous Plants, Waltham, Mass, 1942.

3. Rendle, A. B. Classification of Flowering Plants, Cambridge, 1925.

ज्ञानसागर, वि. रा.