ऊद: (हिं. लुबान लोबान गु. कोडयोलोबान सं. तुरष्क सयामधूप कपर्दक ऊद इं. गम बेंझोइन, गम बेंजामिन). सुगंधी धुपाकरिता वापरात असलेल्या ह्या राळेसारख्या परिचित पदार्थाचे उत्पादन मलाया, मलाक्का, जावा, सुमात्रा, इ. प्रदेशांत ‘गम बेंझोइन ट्री’ (लॅ. स्टायरॅक्स बेंझोइन) नावाच्या स्टायरेसी कुलातील लहान सदापर्णी वृक्षापासून होते व तो तेथून भारतात आयात करतात. पूर्व भारतात (बंगाल व आसाम) व ब्रम्हदेशात आढळणाऱ्या स्टायरॅक्स सेऱ्यालेटम  या दुसऱ्या मोठ्या जातीपासून कमी प्रतीचा ऊद काढतात व चांगल्या उदात भेसळ करतात.

पहिल्या जातीचा वृक्ष लहान असतो. त्याची पाने दीर्घवृत्ताकृती, भाल्यासारखी, लांबट टोकाची, एकाआड एक व साधी असून खालच्या बाजूस तारकाकृती केसांची लव असते पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या शेंड्यांवर लहान लवदार पांढरी, द्विलिंगी व आकर्षक फुले मंजरीवर येतात. संवर्त (फुलाचे सर्वांत बाहेरचे मंडल) पेल्यासारखा पुष्पमुकुट लहान, ५ पाकळ्यांचा, नलिकाकृती केसरदले १०, नलिकेच्या वरच्या भागास चिकटलेली. किंजपुट ऊर्ध्वस्थ प्रथम ३ व पुढे एकच कप्प्याचा बीजके थोडी [→ फूल]. फळ गोलसर, चिवट, ८ मिमी. व्यासाचे, लवदार, अनियमितपणे तडकणारे व संवर्ताने वेढलेले बिया सपुष्क (बियांतील गर्भाचे पोषण करणारा अन्नद्रव्ययुक्त भाग असलेल्या).

यूरोप, चीन, जपान, अमेरिका इ. प्रदेशात स्टायरॅक्सच्या काही जाती शोभेकरिता लावतात.

उदाच्या झाडाच्या सालीवर चरे पडतात व त्यांतून स्रवणारा पिवळट पदार्थ सुकून घट्ट झाल्यावर जमा करून स्वच्छ करतात. ह्यात दोन प्रकार असतात. स्टायरॅक्स टोकिनेन्स  व स्टा. बेंझाइड्स  या वृक्षापासून पिवळा किंवा तपकिरी व त्यात पांढरे ठिपके असलेला, कठीण व ठिसूळ ऊद (सयामी ऊद) मिळतो. स्टा. बेंझोइन  वृक्षापासून मिळालेला ऊद (सुमात्रा ऊद) लालसर किंवा करडा तपकिरी असतो. उदाचे खडे किंवा पूड मंदिरात किंवा घरात जाळतात. सयामी ऊद सरस असून उत्तेजक व कफोत्सारक म्हणून औषधात वापरतात. अनेक त्वचारोगांत ऊद, कोरफडीचा रस व अल्कोहॉल मिसळून लावल्यास गुणकारी असतो. यांशिवाय उदबत्ती, सुगंधी तेले, अत्तरे, साबण, सौंदर्य प्रसाधने, दंतधावने इत्यादींत आणि धूप व धुरी देण्याच्या पदार्थांतही ऊद घालतात.

परांडेकर, शं. आ.