डायर, विल्यम थिसल्टन : (१८४३–१९२८). ब्रिटिश वनस्पतिवैज्ञानिक. त्यांचा जन्म वेस्टमिन्स्टर येथे व शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले. सायरनसेस्टर आणि रॉयल कॉलेज ऑफ सायन्स (साउथ केंझिंग्टन) येथे त्यांनी अध्यापनाचे काम केले व त्यानंतर प्रसिद्ध क्यू उद्यानाचे (१८८५–१९०५) ते संचालक होते. जगातील सर्व पादपजातीय विभाग (विशिष्ट प्रदेशातील वनस्पती) व पादपजाती [⟶ पादपजात] यांसंबंधी त्यांनी संशोधन केले व टी. एच्. हक्स्ली यांना ‘न्यू बॉटनी’ चा प्रथम साउथ केंझिंग्टनमध्ये व नंतर ब्रिटनमध्ये प्रसार करण्यास मदत केली. क्यू येथील जॉडेल प्रयोगशाळेत त्यांच्यामार्फत शारीर, आकारविज्ञान (वनस्पतींचा आकार, संरचना इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र), क्रियाविज्ञान इ. शाखांत मौलिक संशोधन केले गेले आहे. क्यू बुलेटिन (१८८७) चे ते संस्थापक होते.

जमदाडे, ज. वि.