चौरा : (चिरा, हळदी, जंगली भेंडी क. अडिवी भेंडी, कडुबेंडे लॅ. एरिनोकार्पस निम्मोनी कुल-टिलिएसी). या लहान सुंदर वृक्षाचा प्रसार भारतात दख्खन, कोकण, उ. कारवार, बेळगावकडील मिश्र मोसमी जंगले इ. ठिकाणी व महाबळेश्वरच्या खालच्या घाटावर सर्वत्र आहे. याची साल भुरी, गुळगुळीत, धागेदार आणि भेगाळ असते. पाने गोलसर, साधी, एकांतरित (एकाआड एक), हस्ताकृती, पाच ते नऊ शिरांची, तीन ते पाच खंडयुक्त व खालच्या बाजूस लवदार असतात. उपपर्णे शीघ्रपाती (लवकर झडणारी) पिवळी फुले (५·२ सेंमी. व्यासाची) परिमंजरीवर सप्टेंबर-ऑक्टोबरात येतात. छदे (फुलाच्या तळाशी असलेली पानासारखी उपांगे) गोलसर व शीघ्रपाती. संदले व प्रदले प्रत्येकी पाच केसरदले अनेक व किंजपुटात तीन ते पाच कप्पे असतात [ → फूल ]. फळावर राठ केस असून ते कठीण, न फुटणारे, त्रिकोणी, एक ते चार कप्प्यांचे, त्रिपक्ष असते व थंडीत येते. प्रत्येक कप्प्यात एक बी असते. धाग्यांचे दोर बनवितात लाकूड नरम असून जोखडे व वासे यांकरिता वापरतात.

पहा : टिलिएसी.

जमदाडे, ज. वि.