ब्लॅकरॉबिनिया : (कुल-लेग्युमिनोजी उपकुल-पॅपिलिऑनेटी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांमध्ये दोन दलिका असलेल्या) वनस्पतींच्या वर्गातील एका प्रजातीचे नाव. तीमध्ये १५−२० जाती असून त्या सर्व शोभिवंत पानझडी वृक्ष किंवा झुडपे आहेत. त्या सर्वांनाच इंग्रजीत ‘लोकस्ट’ म्हणतात. ब्लॅक लोकस्ट ही सर्वांत मोठी व मूळची अमेरिका जाती असून ती यूरोपात १६३६ मध्ये आली व आता तेथील निसर्गाशी समरस झाली आहे ही रॉबिनिया प्रजातीतील एक प्रातिनिधिक जाती (रॉ. स्यूडोॲकॅशिया) असून हिचे वर्णन खाली दिले आहे. त्यावरून इतरांच्या लक्षणांची स्थूलमानाने माहिती मिळते. हिलाच ‘फॉल्स ॲकॅशिया’ असेही म्हणतात.

ब्लॅक लोकस्ट हा सु. २४−३० मी. उंच व सु. २·८ मी. घेर असलेला वृक्ष असून याचा प्रसार उ. अमेरिकेत, मेक्सिकोत व भारतात (प. हिमालयात) झाला आहे. ग्रेट ब्रिटनमधील सौम्य हवामानात याची मोठी लागवड आहे. याची साल जाड, गर्द तपकिरी व भेगाळ असून फाद्या काटेरी असतात. हे काटे जोडीने पानांच्या तळाशी येतात व ती उपपर्णे होत. लहान फांद्या गुळगुळीत वा क्वचित लवदार असून पाने संयुक्त, एकाआड एक, विषमदली व पिसासारखी असतात. दले ७– १९ (क्वचित २३), दीर्घवृत्ताकृती ते लंबगोल, गुळगुळीत, कोवळेपणी लवदार व २·५–५ सेंमी. लांब असतात. फुले १·८ सेंमी. लांब, पांढरी व फार सुगंधी असून ती पानांच्या बगलेत, लोंबत्या, १०−१२ सेंमी. लांब मंजरीसारख्या [⟶ पुष्पबंध] फुलोऱ्यावर मे−जूनमध्ये येतात. शिंबा (शेंगा) सपाट, लांबट, १२·५×१·८ सेंमी., लालसर तपकिरी, गुळगुळीत व आयात असून त्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये येतात. प्रत्येक शिंबेत सु. १६ बिया असतात. हिवाळ्यात फांद्यांवर शिंबा तशाच राहतात. फुलांची संरचना [पतंगरूप ⟶ फूल] व इतर सामान्य शारीरिक लक्षणे शिंबावंत कुलात [⟶ लेग्युमिनोजी] वर्णन केल्याप्रमाणे असतात. रॉबिनियाच्या अनेक प्रकारांत फुलांच्या रंगांत फरक असून काहींना काटे नसतात.

जम्मू व काश्मीर येथे सु. ५० वर्षांपूर्वी रॉबिनियाच्या या जातीच्या वृक्षांची शोभेकरिता लागवड केली होती. त्यांचे मृदासंधारण (मातीची धूप थांबविणे) व वनरोपण या दृष्टींनी असलेले महत्त्व लक्षात घेऊन पुढे त्यांचा प्रसार प.हिमाल्यात झाला.

ब्लॅक लोकस्टचे लाकूड महत्त्वाचे असून त्याला उत्तम झिलई होते व जमिनीच्या संपर्कामुळे वा वाळवीमुळे ते खराब होत नाही. शेतीची अवजारे, क्रीडासाहित्य, शिळेपाट, खोकी, कागदाचा लगदा, जळण वगैरेंसाठी ते वापरतात. त्यात रॉबेनेटिक हे रंगद्रव्य व टॅनीन असते. पाने सारक असून पचन विकारांवर उपयुक्त आहेत. या प्रजातीमधील वृक्ष रस्त्यांच्या दुतर्फा लावण्यात येतात.

पहा : लेग्युमिनोजी.

संदर्भ : 1. Bailey, L.H. Standard Cyclopedia of Horticulture, Vol. III, New York, 1961.

2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.

जमदाडे, ज.वि. परांडेकर, शं. आ.