दालचिनी: (१) फांदी, (२) फुलाचा उभा छेद, (३) केसरदल, (४) फळ.

दालचिनी : (दारुचिनी क. लवंगे हक्के सं. तमालपत्र, गुडत्वक इं. सीलोन सिनॅमॉन, सिनॅमॉन ट्री, लॅ. सिनॅमोमम झेलॅनिकम कुल–लॉरेसी). वराहमिहिर यांच्या बृहत्संहितेत (सहावे शतक) सुगंधी द्रव्यांच्या यादीत दालचिनीचा उल्लेख आला असून तत्पूर्वीही हीरॉडोटस यांच्या काळात (इ. स. पू. पाचव्या शतकात) ती भारतातून ग्रीसमध्ये आयात होत असावी, असा उल्लेख आढळतो. दालचिनी ही एके काळी सोन्याहून मौल्यवान होती. ईजिप्तमध्ये तिचा उपयोग प्रेते टिकविण्यासाठी व जादूटोण्यासाठी करीत. मध्ययुगीन यूरोपात ती धार्मिक संस्कारांत व स्वादासाठी वापरीत. डच ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारात दालचिनी ही सर्वांत फायदेशीर मसाल्याची वस्तू होती.

सुमारे ६–७·५ मी. (क्वचित १८ मी.) उंचीचा हा सदापर्णी वृक्ष मूळचा श्रीलंका व द. भारत येथील आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरची जंगले (उ. कारवार), मलेशिया, ब्रह्मदेश व तेनासरीम येथेही तो आढळतो. समुद्रसपाटीपासून सु. ३०–३०० मी. उंचीपर्यंत विपुल प्रमाणात आणि १,०००–१,८०० मी. उंचीपर्यंत तुरळकपणे आढळतो. अंबोली व खंडाळा घाटांतही तुरळकपणे दिसतो. फांद्या काहीशा चपट्या व त्यांवर बारीक व खोलगट रेषा असतात. साल पिंगट व जाड असून पाने समोरासमोर किंवा काहीशी तशी, ७·५ ते २० X ४ ते ८ सेंमी., साधी, चिवट, दीर्घवृत्ताकृती, भाल्यासारखी, टोकदार, प्रथम लाल, नंतर हिरवी व चकचकीत त्यांच्या तळातून ३–५ प्रमुख शिरा निघून टोकाकडे जातात फुलोरा टोकाकडे [परिमंजरी  → पुष्पबंध], लवदार असून त्यावर लहान, असंख्य, बहुधा द्विलिंगी, दुर्गंधीयुक्त फुले जानेवारीमध्ये येतात. परिदलनलिका सूक्ष्म, परिदले सहा, आतून व बाहेरून लवदार केसरदले सात, शिवाय एक वंध्य केसरदल परागकोश झडपांनी उघडतात व त्यात चार कप्पे असतात. ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व त्यात एकच बीजक असते [ → फूल]. मृदुफळे गर्द जांभळी, लांबट (१·२–१·८ सेंमी.) साधारण मांसल, एकबीजी, रुंद परिदलाने वेढलेली व लहान असून मे–ऑगस्टमध्ये पिकतात. फळ उघडल्यावर ⇨ रुमा मस्तकीसारखा वास येतो आणि त्याची चव ⇨ जूनिपरच्या फळासारखी असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लॉरेसी कुलात (तमाल कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

मसाल्यात व इतर पदार्थांत वापरली जाणारी ‘दालचिनी’ खोड व फांद्या यांच्या सालीपासून मिळते. पाने चुरल्यावर दालचिनीचा वास येतो कारण पानांत बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल असलेल्या कोशिका (पेशी) असतात.

रानदालचिनी : (हिं.जंगली दार्चिनी लॅ. सिनॅमोमम  इनर्स). हा मोठा वृक्ष वर वर्णन केलेल्या दालचिनीचा एक प्रकार असावा असेही कोणी मानतात. हा द. तेनासरीममधील असून प. घाटातील सदापर्णी जंगलात म्हैसूर व कूर्गपासून ते अन्नमलाई व त्रावणकोर, कर्‌नॅटिक आणि शेवराय व कोलिलमलई टेकड्यांत आढळतो. याचे लाकूड फिकट तपकिरी, मध्यम कठीण व चकचकीत असते. त्याला बादियाणाचा (ॲनिसीडचा) वास येतो. ते रंधून गुळगुळीत करता येते, ते लहानमोठी कपाटे करण्यास फार उपयुक्त असते. या झाडाच्या सालीत बाष्पनशील तेल ५% असते आणि त्याला लवंग व कस्तुरीचा वास येतो.

व्यापारी महत्त्वाची दालचिनी : सि. झेलॅनिकम या प्रथम वर्णन केलेल्या जातीपासून ही काढतात. कोवळ्या फांद्या आणि खोड यांपासून काढलेली साल गुळगुळीत व फिकट असते, परंतु जून फांद्या व खोडावरची साल गर्द पिंगट व खरबरीत असते. श्रीलंकेत याचे पाच प्रकार ओळखले जातात. द. कारवारात वाफेच्या ऊर्ध्वपातन क्रियेने [ → ऊर्ध्वपातन] पानांतून सुगंधी तेल काढतात व चवीनुसार त्याचे चार प्रकार (गोड, पांचट, तिखट व कडू) ओळखतात दालचिनी–तेलाकरिता तिखट व कडू प्रकारच्या पानांच्या जातींची आणि वाणांची निवड करतात.

जमीन व लागवड : दालचिनीकरिता श्रीलंकेत सि. झेलॅनिकम जातीची फार मोठी लागवड केली असून सर्व जगाला मुख्यतः तेथूनच पुरवठा होतो. त्याखालोखाल सेशेल बेटांतून होतो. द. भारत, जमेका, मार्तिनिक आणि कायएन इ. ठिकाणीही लागवड केली जाते परंतु उत्पादन फार कमी होते. भारतात तेलिचेरीतील झाडांची साल चांगली असते, तथापि श्रीलंकेतील सालीपेक्षा तिची प्रत कमी असते. जमीन व परिस्थिती यांवर सालीची गुणवत्ता अवलंबून असते. श्रीलंकेतील पांढऱ्या रेताड जमिनीवर वाढणाऱ्या झाडांची साल उत्कृष्ट ठरली आहे. उंचावरच्या जांभ्या किंवा कठीण जमिनीवर वाढलेल्या जातींची साल कमी प्रतीची असते. रेताड जमिनीत कुजकट भाग (ह्यूमस) भरपूर घातल्यास त्यावरच्या झाडांची साल चांगली मिळते. तसेच सु. ४५० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशातील हवामान लाभदायक ठरते. या झाडांना भरपूर पाऊस चालतो, गुरे ही झाडे खात नाहीत परंतु आगीचे भय मात्र असते. पक्ष्यांपासून फळांचे रक्षण करणे आवश्यक असते. पक्व फळे काढून सावलीत ठेवतात व मगज (गर) काळा झाल्यावर कुजतो त्यानंतर ती फळे तुडवून, धुऊन वाळवितात व अशा रीतीने मिळालेले बी लागवडीकरिता वापरतात.

प्रथम बी पन्हेरीत रुजवून रोपे तयार करतात व ती योग्य ठिकाणी (लागवडीच्या क्षेत्रात) लावतात किंवा चार-पाच बिया प्रथमपासूनच तेथे सु. तीन मी. अंतरावर लावतात. सु. २–३ आठवड्यांत बी रुजते. पन्हेरीतील रोपे सु. १ वर्षानंतर काढून ऑक्टोबर–नोव्हेंबरात लावतात. दोन रोपांतील अंतर सु. दोन मी. ठेवतात. कलमानेही अभिवृद्धी करतात. वर्षातून दोनचार वेळा तण काढून तेथेच जमिनीत गाडतात, त्यामुळे जमीन खतावली जाते. त्याशिवाय गायीचे शेण आणि नारळाचे (पूनाक) खत द्यावे, अशी शिफारस करण्यात आलेली आहे.


दालचिनीकरिता प्रक्रिया : दोन-तीन वर्षांनी प्रमुख खोड छाटतात व नंतर आलेल्या नवीन फाद्यांपैकी पाच-सहाच पुढे दोन वर्षे वाढू देतात. त्या सु. दोन मी. उंच वाढल्या म्हणजे त्यांची साल त्वक्षायुक्त (मृत कोशिकांचा संरक्षक थर असलेली) व पिंगट तपकिरी झालेली आढळते त्या वेळी त्यांचा व्यास सु. पाच सेंमी. असतो ही पक्व साल पावसाळ्यात काढणे सोयीचे असते कारण ती सहज सुटून येते. प्रत्येक पेऱ्याजवळ तीक्ष्ण चाकूने वाटोळे पण कांड्याभोवती चर पाडतात दोन चरांतील अंतर सु. ३० सेंमी. ठेवतात, त्यानंतर कांड्यांवर थोडे उभे चर पाडून सालीचे उभे तुकडे अलग करतात आणि त्यांचे जुडगे करून व काथ्यात गुंडाळून तसेच ते चोवीस तास ठेवतात. या मुदतीत वितंचनामुळे (सूक्ष्म जीवांद्वारे अथवा जटिल नायट्रोजनयुक्त कार्बनी पदार्थांद्वारे घटक अलग होण्याच्या मंद क्रियेमुळे) बाहेरील अपित्वचा (खोडाच्या पृष्ठभागावरील आवरणासारखा कोशिकांचा थर) त्वक्षा व हिरवी ⇨ मध्यत्वचा उरलेल्या भागापासून अलग करण्यास सोपे होते ते वाकड्या चाकूने खरडून करतात व ते तुकडे सुकवितात त्यांच्या लांबट सुरळ्या बनवितात त्या एकमेकींत अडकवून सु. एक मी. लांब मोठी सुरळी बनवितात व अनेक सुरळ्या चटयांवर ठेवून सावलीत तीन दिवस वाळवितात. पूर्णपणे वाळल्यावर कधीकधी सल्फर डाय–ऑक्साइडाने विरंजन (रंग काढून टाकण्याची क्रिया) करतात. याखेरीज झाडाच्या फांद्यांच्या भिन्न भागांपासून दालचिनीचे वेगळे लहान व मोठे तुकडे काढण्यात येतात. सुरळ्या व सुरळ्या न झालेल्या सालीचे जाड तुकडे, चुरा, त्यांचा वास इत्यादींप्रमाणे प्रतवारी करतात. दालचिनीतेलाकरिता सुरळ्यांखेरीज सर्व माल वापरतात शिवाय पानांतून कमी प्रतीचे तेलही काढतात.

उत्पादन व उपयोग : लागवडीनंतर तीन ते चार वर्षांनी मिळणारे पहिले पीक हेक्टरी सु. ६०–७५ किग्रॅ. असून ते पुढे वाढत जाते दहा वर्षांनी सु. ७५–१०० किग्रॅ. पीक मिळते. व्यापारी महत्त्वाची दालचिनी (सुरळ्या) सु. ०·५ सेंमी. जाड असून बाहेरून फिकट पिंगट तपकिरी व आतून अधिक गडद रंगाची असते व तीवर बारीक उभ्या रेषा असतात. तिला मंद सुवास येतो व तिची चव गोडसर असते. दालचिनीचे तुकडे किंवा पूड मसाल्यात फार पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात उपयोगात आहे. ती सुवासिक, उत्तेजक व वायुनाशी असून मळमळ व ओकारीवर गुणकारी आहे. मासिक पाळीतील अतिस्राव व कठीण प्रसूती यांवर दालचिनी गुणकारी आहे. स्पेनमध्ये चॉकोलेटच्या पदार्थांत दालचिनीची पूड घालतात तसेच बेकरीमध्ये तयार करण्यात येणारे पदार्थ, मिठाई, डिंक, धूप, दंतधावने व अत्तरे यांतही तिचा भरपूर वापर आहे.

दालचिनीच्या झाडाच्या सालीत सु. ०·५–१·०% तेल असते, तथापि वर सांगितल्याप्रमाणे ते तुकडे व चुरा यांतूनच मुख्यत्वेकरून काढतात भारतात सालीचे तेल सहसा काढीत नाहीत. श्रीलंकेतून आयात केलेल्या सालीपासून ते यूरोप व अमेरिका येथे ऊर्ध्वपातनाने काढतात. प्रथम ते फिकट पिवळे असते, परंतु नंतर ते लाल होते. त्यात सिनॅमाल्डिहाइड (सिनॅमिक आल्डिहाइड) ६०–७५% असते. पानांचे तेल व संश्लेषित (घटक एकत्र आणून कृत्रिम रीत्या तयार केलेले) सिनॅमाल्डिहाइड यांची सालीच्या तेलात भेसळ करतात त्यात फेरिक क्लोराइड घातल्यास गर्द निळा रंग येतो, यामुळे ती भेसळ ओळखता येते. अस्सल सालीच्या (दालचिनीच्या) तेलाचा उपयोग मिठाईमध्ये, औषधे, साबण व दंतधावने इत्यादींत घालण्यासाठी करतात ते कवकनाशक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा नाश करणारे) आणि जंतुनाशकही आहे पोटाच्या तक्रारीवर व वायुनाशी म्हणून त्याचा औषधात बराच उपयोग होतो. दातदुखी, डोकेदुखी, तंत्रिकाशूल (मज्जातंतुव्यथा) यांवर बाहेरून लावण्यास वापरतात. हिरव्या पानांतून ऊर्ध्वपातनाने १% तेल निघते. त्याकरिता अतितिखट व तुरट प्रकारची पाने वापरतात. श्रीलंकेत तेल काढण्यापूर्वी ती पाने समुद्राच्या पाण्यात भिजवतात. द. कारवारात तेलाचे प्रमाण ०·७५% असते उ. मंगळुरात (या तेलाच्या प्रमुख केंद्रात) वार्षिक उत्पादन सु. १,८०० किग्रॅ. आहे. ते पिंगट व तिखट असून त्याला लवंगेसारखा किंवा काहीसा कापरासारखा वास येतो [कापूर दालचिनीच्या वंशातील एका झाडापासून, सिनॅमोमम कँफाेरापासून काढतात कापूर]. त्यात ७०–९५% युजेनॉल व सिनॅमाल्डिहाइड, बेंझाल्डिहाइड इ. अनेक रासायनिक पदार्थ असतात. कारवार व मलबार येथे काढलेले पानांचे तेल निर्यातीसाठी मुंबईस पाठवितात. लवंग–तेलातील युजेनॉलाचे प्रमाण दालचिनीच्या पानांतील तेलाइतके असते. त्यामुळे दालचिनीच्या पानांचे तेल अत्तरे व स्वाद–उद्योग यांत उपयुक्त असते. व्हॅनिलिनाच्या संश्लेषणाकरिता वापरण्याच्या युजेनॉलाकरिता अमेरिकेत सेशेलमध्ये बनविलेले स्वस्त तेल व साबणाकरिता श्रीलंकेतील उच्च प्रतीचे तेल वापरतात ते मिठाईकरिताही वापरतात मुळांवरील सालीत सु. ३% तेल असून ते सालीतील व पानांतील तेलांहून भिन्न असते. ते रंगहीन असून त्याला कापरासारखा वास येतो ते काही वेळ तसेच ठेवल्यास कापूर अलग होतो मात्र त्याला व्यापारी महत्त्व नाही. त्यात कापूर, पायनीन, सिनीओल, बोर्निओल इ. अनेक रसायने असतात. बियांत सु. ३३% स्थिर तेल असते. पूर्वी त्याच्या मेणबत्त्या करीत असत.

दालचिनीचे लाकूड मध्यम जड, भुरेकरडे किंवा पिवळट पिंगट, चकचकीत, मंद सुगंधी व साधारण मजबूत असते ते चिंबते व डागळते कमी प्रतीच्या फळ्यांकरिता ते वापरतात. लवंगांत मिसळण्याकरिता दालचिनीची फळे वापरतात त्यांपासून औषधी तेल बनवितात. तमाल वृक्षाच्या (सि.तमाला) सालीची दालचिनीत भेसळ करतात.

श्रीलंकेतून तेल, सुरळ्या, चुरा, तुकडे व पाने अशा विविध स्वरूपांत दालचिनीची निर्यात होते. १९६९ साली ही निर्यात ३·३८ कोटी रुपयांची झाली होती. सेशेल बेटांतून १९७२ साली सालीचे तुकडे ५७,८८,५११ रु. (१,९८९ टन), सुरळ्या ४५,२७५ रु. (९,०६२ टन) व पानांचे तेल २,०१,६४० रु. (६,८०९ किग्रॅ.) निर्यात झाले.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, New Delhi, 1950.

          2. Kirtikar, K. R. Basu, D. B. Indian Medicinal Plants, Delhi, 1975.

           ३. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.

कानिटकर, उ. के. परांडेकर, शं. आ.